अध्यात्म रामायण - आत्मारामाच्या कथागंगेचा दिव्य प्रवाह

15 Aug 2020 23:06:19


Ram_1  H x W: 0

 



 

जनसामान्यांना दुर्बोध किंवा कंटाळवाण वाटणारं अध्यात्म तत्त्वज्ञान, इष्टदेवतेच्या चरित्राच्या माध्यमांतून सहज सुलभपणे समजावून देण्याचा एक अभिनव प्रयोग अध्यात्म रामायणाच्या माध्यमातून केला गेला. त्यानंतरच्या काळामध्ये या ग्रंथाचे प्रारूप डोळ्यासमोर ठेवून, अनेक रचना संस्कृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये केल्या गेल्या. आधुनिक भाषेत सांगायचं झाल्यास, अध्यात्म रामायण हे तत्कालीन धार्मिक वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये एक ‘Trend Setter’ ठरले.



रामायण आणि महाभारत, भारतीय संस्कृतीच्या संचितामधील दोन अमूल्य रत्न. संस्कृतीची तिच्या सर्वोच्च शिखरबिंदूकडे झालेली चढण आणि त्यानंतर अपरिहार्यपणे होणारी तिची उतरण, या दोन्हींची प्रतिबिंब अनुक्रमे रामायण आणि महाभारत यांमध्ये पाहायला मिळतात. काव्यस्वरूपात अवतरलेल्या तरीही धार्मिक आणि ऐतिहासिक मूल्यवत्ता अबाधित असलेल्या, जगातील अगदी मोजक्या साहित्यकृतींमध्ये अग्रगण्य अशी ही दोन आर्ष महाकाव्य आहेत. विशेषत्वाने या दोन्हींमधील रामायण हे जनमानसातील भक्ती आणि आदर्शवादाची आशा यांना सदैव साद घालते. रामाचे ‘अयन’ म्हणजे रामाचा मार्ग; रामाचा-रामाच्या पाऊलखुणांचा घेतलेला मागोवा म्हणजेच रामायण. आदिकवी वाल्मिकींच्या प्रतिभेतून अवतरलेली ही दाशरथी रामाची पावन कथा, भारतीय उपखंडाच्या अधोर्ध्व विस्ताराला व्यापून उरलेली आहे. नानाविध प्रदेशांतून तेथील भाषा, धारणा, काव्यशैली यांचे कालानुरूप साज लेवून पुन्हापुन्हा साकार होणारी ही रामकथा, आपले ‘शतकोटीप्रविस्तर’ हे विशेषण यथार्थ ठरवते. रामकथेचा मूलस्रोत हे वाल्मिकी रामायण मानले जात असले तरीही ‘आनंदरामायण’, ‘अद्भुतरामायण’, ‘महारामायण’ आणि ‘अध्यात्म रामायण’ या चार उत्तरकाळातील संस्कृत रचनांचा, जनमानसावरील प्रभाव लक्षणीय आहे. यांतही ‘अध्यात्म रामायण’ हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल.

 


‘अध्यात्म रामायण’ हा ब्रह्मांडपुराणाच्या उत्तरखंडाचा भाग आहे असे परंपरेने मानले जाते. काही आवृत्त्यांच्या पुष्पिकांमध्ये (अध्यायाच्या अंती येणार्‍या समाप्तिदर्शक ओळीत) तसा स्पष्ट उल्लेखही आढळतो. मात्र, हा मूळ पुराणाचा भाग असावा की प्रक्षेप, यांवर अनेक मतभेद आहेत. तसंच या ग्रंथाच्या कर्त्याविषयीही एकमत नाही. परंपरागत धारणेनुसार महर्षी व्यासकृत पुराणाचा भाग असल्यामुळे याचे कर्ते वेदव्यासच ठरतात, तर अन्य एका मतानुसार रामानंदाचार्यांचा शिष्य रामशर्मा याने या ग्रंथाची रचना केली असावी. इसवी सनाच्या पंधराव्या शतकांत याची रचना झाली असावी, असे आधुनिक अभ्यासक मानतात. अध्यात्म रामायणामधील स्तोत्रबहुल रचना आणि त्यांतून वारंवार व्यक्त होणारे दार्शनिक विचार यांच्या आधारे, रचनेवर भागवतपुराणाच्या शैलीचा मोठा प्रभाव असावा, असा काही विद्वानांचा निष्कर्ष आहे.

 


रामकथेच्या माध्यमातून अध्यात्मविचार सांगणे, रुजवणे हा या ग्रंथाच्या मूळ रचनेमागील उद्देश, ‘ग्रंथानामा’तूनच व्यक्त होतो. शिव-पार्वतीच्या संवादप्रसंगातून संपूर्ण रामचरित्राचे आणि त्यामागील आध्यात्मिक रहस्यांचे विवरण हे या ग्रंथाचे स्वरूप आहे. यामध्ये पाल्हाळीक वर्णने फार येत नाहीत. उलटपक्षी २४ हजार श्लोकांमध्ये आदिकवींनी वर्णिलेले रामचरित्र, यांत केवळ ४ हजार ५०० श्लोकांत सर्वसमावेशक तरीही संक्षिप्त पद्धतीने येते. सात कांडे आणि ६५ सर्गांमध्ये या ग्रंथाची विभागणी केलेली आहे. वैष्णव संप्रदायांपैकी विशेषत्वे रामोपासक पंथांमध्ये अध्यात्म रामायणाला आकरग्रंथाचे स्थान आहे.

 


वाल्मिकी रामायणामध्ये ‘राम’ हा लोकोत्तर पुरुष म्हणून दिसत असला, तरी त्याच्या चरित्राला असलेली मानवी मर्यादांची चौकटही तेथे तितक्याच स्पष्टपणे दर्शविलेली आहे. मात्र, अध्यात्म रामायणामधील ‘राम’ हा साक्षात परब्रह्माचा ‘मायामानुषविग्रह’ (मायायोगाने धारण केलेला मानवी अवतार) आहे. वाल्मिकी रामायणामधील मध्यवर्ती संकल्पना धर्म ही आहे, तर अध्यात्म रामायणामध्ये भक्तितत्त्व केंद्रवर्ती आहे. वाल्मिकी रामायणामध्ये सांगितलेलं रामाचं अवतारित्व त्याच्या मानवी धर्मांमध्ये दडून गेलं आहे. याउलट अध्यात्म रामायणामध्ये रामाठायीचे ‘नरत्व’ हे त्याच्या नारायणस्वरूपामध्ये दिसेनास झालं आहे. साहजिकच श्रीराम हेच परमाराध्य दैवत असणार्‍या पंथांना वाल्मिकी रामायणापेक्षा अध्यात्म रामायण अधिक जवळचं वाटलं तर त्यांत नवल नाही. मूळ वाल्मिकी रामायणापेक्षा अध्यातम रामायणातील काही कथाभाग हे वेगळे आहेत. कौसल्या आणि कैकेयी यांनी सुमित्रेला यज्ञातील पायसप्रसाद देणे, रामाच्या बाललीला, मिथिलेला जाताना नाविकाकडून रामाचे पादप्रक्षालन, विविध प्रसंगी रामाचे केले गेलेले स्तवन, वनवासात असताना सीतेचे अग्निज्वालांमध्ये गुप्त होणे आणि तिच्याऐवजी रावणाने मायासीतेचे अपहरण करणे अशी अनेक उदाहरणे यासंदर्भात दाखवता येतात. यातील बहुतांश कथाभेद हे रामाचं देवत्व अधोरेखित करतात. त्यामुळे अध्यात्म रामायण हे कोण्या पुण्यश्लोक राजाचं काव्यात्मक चरित्र म्हणून मर्यादित न राहता, धर्मसंस्थापनेसाठी जानकी-रामचंद्रांच्या रूपांत भूतलावर अवतीर्ण झालेल्या मायाब्रह्माच्या चिद्विलासाची गाथा म्हणून ते पूजनीय झालं.

रामचरित्राच्या अनुरोधाने येणारे धर्म आणि नीती यांचे अत्युच्च आदर्श हे अध्यात्म रामायाणातही येतात, हे येथे वेगळे सांगणे नलगे. रामचरित्राच्या अवतरणिकेतून तत्त्वज्ञानाच्या कूट-प्रमेयांची अगदी हळुवारपणे केलेली उकल ही या रामायणातील खरी अपूर्वाई म्हणावी लागेल. बालकांडातील प्रथम सर्गात आलेलं रामहृदय असो किंवा उत्तरकांडात पाचव्या सर्गात येणारी राम-लक्ष्मणसंवादातील रामगीता, सर्व वेदांत-सिद्धांतांच सारसर्वस्व या ग्रंथांत मथितरूपाने ठायी ठायी हाती येत राहतं.

 


रामो न गच्छति न तिष्ठति नानुशोच-
त्याकाङ्क्षते त्यजति नो न करोति किञ्चित् ।
आनन्दमूर्तिरचलः परिणामहीनो
मायागुणाननुगतो हि यथा विभाति ॥ (अ.रा.१.१.४३)

 


यांसारख्या श्लोकपंक्तीत आलेल्या रामवर्णनातून उपनिषदुक्त परब्रह्माचीच सर्व लक्षणे व्यक्त झालेली आढळतात. या ग्रंथामध्ये साधकांसाठी पाथेय स्वरूपात बरंच काही दिलं गेलं आहे. जिथे ज्ञात्वा परात्मानमथ त्यजेत्क्रियाः।म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर कर्मकांड खुशाल सोडून द्यावं, असं प्रतिपादन या ग्रंथात येतं, तिथेच जोवर शरीराच्या ठायी आत्मबुद्धी, ममत्व आहे तोवर स्वधर्मोचित कर्मांचे आचरण अवश्य करावे, नित्यानित्यवस्तुविवेक साधल्याशिवाय कर्मसंन्यास घातक आहे, अशी धोक्याची घंटादेखील वाजवायला ग्रंथकार विसरलेले नाहीत. भगवद्गीतेप्रमाणेच ज्ञानकर्मसमन्वयाचे तत्त्वज्ञान अध्यात्म रामायणातही मांडले गेले आहे.

 


देहबुद्ध्या तु दासोऽहं जीवबुद्ध्या त्वदंशकः।
आत्मबुद्ध्या त्वमेवाहमिति मे निश्चिता मतिः॥

 


(भावार्थ - देहबुद्धीने विचार केला तर मी तुझा दास आहे. मी जीव आहे अशा धारणेतून पाहिलं तेव्हा मी तुझा छोटासा अंश झालो. आत्मबुद्धीने पाहिल्यावर मात्र तू-मी एकरूपच आहोत असा माझा निश्चय झाला.)

 


ज्ञान आणि भक्तीचा सर्वोच्च समन्वय सांगणारा, हनुमंताची उक्ती म्हणून प्रसिद्ध असणारा, मूलस्रोत अज्ञात असणारा उपरोक्त श्लोक हा अध्यात्म रामायणात असल्याचा उल्लेख अनेक विद्वान करतात. आजच्या उपलब्ध संहितेत तो सापडत नसला तरीही तो श्लोक त्यातलाच असावा असा विद्वज्जनांकडून केला जाणारा दावा, एका अर्थी अध्यात्म रामायणाच्या सुपरिचिततेची आणि लोकप्रियतेची साक्ष देतो.

 


विविध उत्सवांमध्ये अनेक ठिकाणी अध्यात्म रामायणाची पारायणे केली जातात. त्या व्यतिरिक्त यांतील जटायू, शबरी, इंद्र, ब्रह्मदेव, शिव यांनी विविध प्रसंगात केलेल्या रामस्तुती या स्वतंत्रपणे स्तोत्र स्वरूपातही म्हटल्या जातात. महाराष्ट्रातील सज्जनगड, गोंदवले या संत-क्षेत्रांमध्ये होणार्‍या नित्य उपासनाक्रमात रामहृदय, ब्रह्मकृत-रामस्तुती इ. स्तोत्रांचा समावेश केला गेला आहे.

 


सोळाव्या शतकामध्ये संत तुलसीदासांनी रचलेला, अवधी भाषेमधील ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ आज सर्व रामोपासाकांच्या गळ्यामधला ताईत झालेला आहे. रामचरितमानसामध्ये मांडल्या गेलेल्या सर्व तत्त्वज्ञानाचा पाया हा खरंतर अध्यात्म रामायणानेच घालून दिला आहे. याच काळात केरळ मधील महाकवी, मल्याळी काव्यपरंपरेचे जनक मानले गेलेले थुनचथतू रामानुजन एलूथचन यांनी संपूर्ण अध्यात्म रामायणाचा मल्याळी भाषेत ‘किलिपट्टू’ (शुक-गीत) शैलीमध्ये काव्यानुवाद केला. केरळमधील कालगणनेनुसार ‘करकिडकम’ (म्हणजे आपल्याकडील श्रावण) महिन्यात आजही या मल्याळी भाषेतील अध्यात्म रामायणाचे घरोघरी पठण केले जाते. संत एकनाथांच्या मराठी भावार्थ रामायणाचा आधारग्रंथ ‘शिवरामायण’ असल्याची ग्वाही खुद्द एकनाथांनी दिली आहे. शिवप्रोक्त अध्यात्म रामायण आणि नाथमहाराजांनी उल्लेखिलेले ‘शिवरामायण’ हे एकच की भिन्न, हा वादाचा विषय असला, तरीही भावार्थ रामायणातील सिद्धांत अध्यात्म रामायणाच्या जवळ जाणारे आहेत, हे निर्विवादपणे दाखवता येते. समर्थ रामदासांनी मांडलेल्या नाना देही एकत्वाने विराजणार्‍या आत्मारामाच्या प्रतिमेची बैसका ही एक प्रकारे ही अध्यात्मरामकथाच होती.

 


‘उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी।
लिंगदेहलंकापुरी विध्वंसोनी॥
देहअहंभाव रावण निवटोनी।
कामक्रोधादिक राक्षस मर्दोनी ॥’

 


अशा शब्ददीपांद्वारे माधवदासस्वामींनी निजबोध-रामाला ओवाळलेली ‘सहजांची’ आरती अध्यात्म रामकथेचीच अनुगामिनी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी रचलेले संस्कृत वेदांतपर-रामायण असो किंवा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला झालेल्या सुब्रह्मण्य नामक कवीचा तेलुगू भाषेमधील ‘अध्यात्मरामायणकीर्तनलु’ या नावाने प्रसिद्ध असणारा शतकीर्तनांचा संग्रह असो, अध्यात्म रामायणाशी नाळ जोडलं गेलेलं असं विपुल सारस्वत भारतभूमीच्या कानाकोपर्‍यात पसरलेलं आहे.

 


जनसामान्यांना दुर्बोध किंवा कंटाळवाण वाटणारं अध्यात्म तत्त्वज्ञान, इष्टदेवतेच्या चरित्राच्या माध्यमांतून सहज सुलभपणे समजावून देण्याचा एक अभिनव प्रयोग अध्यात्म रामायणाच्या माध्यमातून केला गेला. त्यानंतरच्या काळामध्ये या ग्रंथाचे प्रारूप डोळ्यासमोर ठेवून, अनेक रचना संस्कृत आणि प्रादेशिक भाषांमध्ये केल्या गेल्या. आधुनिक भाषेत सांगायचं झाल्यास, अध्यात्म रामायण हे तत्कालीन धार्मिक वाङ्मयाच्या क्षेत्रामध्ये एक ‘Trend Setter’ ठरले.
सांस्कृतिक अधःपतनाकडे वाटचाल करणार्‍या सध्याच्या समाजामध्ये नीतिमत्ता आणि अध्यात्म जीवंत राहण्यासाठी ईश्वराचे अधिष्ठान असणे आवश्यक झाले आहे, त्यासाठी अध्यात्म रामायणासारख्या आपल्या सांस्कृतिक ठेव्यांचे पुनरावलोकन, चिंतन, मनन मात्र साक्षेपाने करायला हवे. अंतिमतः एकच प्रार्थना की, शिवरूपी पर्वतातून उगम पावलेली, श्रीरामरूपी सागरामध्ये विलीन होणारी ही अध्यात्मरामकथारूप गंगा त्रिभुवनाला पावन करत राहो.

 


पुरारिगिरिसम्भूता श्रीरामार्णवसङ्गता।
अध्यात्मरामगङ्गेयं पुनातु भुवनत्रयम्॥
 

 

- प्रणव गोखले

(लेखक वैदिक संशोधन मंडळ, पुणे येथे साहाय्यक संचालक आहेत.)

 

Powered By Sangraha 9.0