इंडो-युरोपीय भाषागटांची ‘शंभरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2020
Total Views |


Language_1  H x



मागच्या काही लेखांपासून आपण ‘Linguistics’ अर्थात ‘भाषाशास्त्र’ या ज्ञानशाखेची ओळख करून घेत आहोत. तिच्या आधारे पाश्चात्त्य संशोधकांनी भाषांचे विविध गट बनवून दक्षिण आणि उत्तर भारतातल्या भाषा कशा वेगळ्या आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. अशा भाषिक वैशिष्ट्यांवरून ‘आर्य’ नावाचे लोक युरोप आणि मध्य आशियाच्या परिसरातून भारतात आले, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या भाषागटांचीही थोडक्यात ओळख आपण करून घेतली. त्यातून या मांडणीतील फोलपणासुद्धा आपण मागच्या लेखांमध्ये पाहिला. परंतु, हे पाश्चात्त्य संशोधक फक्त एवढ्यावरच थांबलेले नाहीत. त्यांनी भाषांचे वर्गीकरण करण्याचे अजूनही वेगवेगळे प्रकार शोधून काढले. त्यांच्याही द्वारे प्राचीन काळातली लोकांची स्थलांतरे दाखवून देण्याचा प्रयत्न चालूच ठेवला. त्यातलाच वर्गीकरणाचा एक प्रकार आज पाहूया.



कार्ल ब्रगमनचे भाषागट


मागच्या एका लेखात आपण ‘फ्रेन्झ बॉप’ (Franz Bopp - इ. सनाचे 19वे शतक) या एका जर्मन अभ्यासकाने केलेले काम पाहिले. ‘इंडो-युरोपीय’ भाषागटाच्या जन्मदात्यांपैकी तो एक प्रमुख मानला जातो. भाषांचा तुलनात्मक अभ्यास करताना त्याने भाषांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यात उच्चारशास्त्राच्या आधारेसुद्धा भाषांचे गट बनविता येतील, असे त्याने सूतोवाच करून ठेवले होते. परंतु, या विषयावर त्याने फारसे काम केले नव्हते. पुढे फ्रेन्झचा समकालीन असणार्‍या कार्ल ब्रगमन’ (Karl Brugmann) या अजून एका जर्मन अभ्यासकाने मात्र या विषयात खूप खोलवर जाऊन काम केले. त्याने विविध भाषांमध्ये समान अर्थाचे समान वाटणारे जे जे शब्द दिसतात, त्यांच्यात कसे बदल होत गेले असावेत, याचा अभ्यास सुरू केला. ते बदल कोणत्या कारणामुळे झालेले असावेत, त्याची उच्चारशास्त्रीय कारणमीमांसा त्याने सांगितली. एखाद्या शब्दातील मूळ धातू कोणता असावा, तो शब्द जेव्हा दुसर्‍या एखाद्या भाषेत जातो तेव्हा त्यातल्या कुठल्या वर्णांमध्ये कसे बदल होतात, कुठले स्वर आणि व्यंजने इतर दुसर्‍या कुठल्या स्वरांमध्ये किंवा व्यंजनांमध्ये परिवर्तित होऊ शकतात, अशा विविध अंगांनी कार्लने फारच सखोल अभ्यास केला. त्याच्या एका मतानुसार ‘शंभर’ या संख्येसाठी इंडो-युरोपीय गटातल्या विविध भाषांमध्ये जे प्रतिशब्द आहेत, त्यांच्या आधारेसुद्धा भाषांचे वर्गीकरण करता येते. यासाठी त्याने दोन संज्ञा सुचवल्या. एक आहे ‘Centum’ - लॅटिन उच्चार ‘केंटम’ आणि दुसरी आहे ‘Satem’ - लॅटिन उच्चार ‘सेटम / सेतम’. अर्थात अशा पद्धतीने कुठल्यातरी एकाच विशिष्ट शब्दावरून भाषांचे गट बनविणे वेडगळपणाचे ठरेल, हे कार्ल जाणून होता. परंतु या एका फरकाच्या सोबत इतरही अनेक फरकाचे मुद्दे ओघानेच येतात, हेसुद्धा कार्लने शोधून काढले होते. साहजिकच ‘शंभर’ या संख्यावाचक शब्दातील सारखेपणाच्या व्यतिरिक्त ‘केंटम’ आणि ‘सेतम’ भाषांमधील इतरही काही साधर्म्ये त्याने शोधून काढली आणि मगच भाषांचे हे दोन गट जगासमोर मांडले. तात्पर्य, ‘शंभर’ संख्यावाचक शब्द हे फक्त या गटांना नाव देण्यापुरतेच कार्लने वापरलेले दिसतात. पण, ‘उच्चारशास्त्र’ (Phonology) हाच या वर्गीकरणाचा प्रमुख आधार दिसतो.

‘केंटम’ भाषागट


इंडो-युरोपीय भाषागटातील पाश्चिमात्य भाषा - खास करून युरोपीय भाषांमधील बर्‍याच भाषा या गटात मोडतात. ढोबळमानाने हेलनिक, जर्मनिक, इटालिक आणि सेल्टिक हे चार इंडो-युरोपीय उपगट यात येतात. कार्लच्या मते ‘कंठ्य’ वर्णांच्या (क, ख, ग, घ, ङ, ह) उच्चारातील बदलांमुळे मूळच्या ‘इंडो-युरोपीय-पूर्व’ (Proto-Indo-European - PIE) भाषेतले अनेक शब्द वेगवेगळे होत गेले आणि त्यातूनच हे चार भाषिक उपगट तयार झाले. ‘शंभर’ ही संख्या दाखवण्यासाठी यातल्या अनेक भाषांमध्ये Centum (लॅटिन), Cent (फ्रेंच), Centinaio (इटालियन), Cead (आयरिश), Cien (स्पॅनिश) अशा स्वरूपाचे शब्द वापरले जातात. पण, काही भाषांमध्ये मात्र ब्रगमनच्या नियमांनुसार यात काही बदल झालेले दिसतात.

‘सेटम/सेतम’ भाषागट


इंडो-युरोपीय भाषागटातील पौर्वात्य भाषा - खास करून भारतीय आणि इतर काही आशियाई भाषांमधील बर्‍याच भाषा या गटात मोडतात. जसे केंटम भाषांमधील शब्दोच्चारांच्या फरकाचे कारण कंठ्य वर्णांच्या उच्चारातले फरक, असे कार्ल सांगतो, तसेच या सेटम भाषांमधील शब्दोच्चारांच्या फरकाचे कारण ‘मूर्धन्य’ (ट, ठ, ड, ढ, ण, र, ष), ‘तालव्य’ (च, छ, ज, झ, ञ, य, श) आणि ‘दन्त्य’ (त, थ, द, ध, न, ल, स) वर्णांच्या उच्चारातले फरक, असे तो म्हणतो. यामुळे शंभराचे संख्यावाचक शब्द ‘केंटम’ भाषांमध्ये जसे ‘क’ या ध्वनीने सुरू होताना दिसतात, तसे सेटम भाषांमध्ये ते ‘स’ किंवा ‘श’ या ध्वनीने सुरू होताना दिसतात. जसे ‘सेतम’ (झेंद - अवेस्ता), ‘शतम’ (संस्कृत), ‘शत’ (बंगाली, ), ‘सो’ (गुजराती), ‘स्तो’ (सर्बियन, बल्गेरियन, पोलिश, बोस्नियन), ‘सोत्न्य’ (युक्रेनियन) अथवा हिंदी आणि तिच्या काही उपभाषांमध्ये ‘शत/सत/सौ/सो/सउ’ इत्यादी अर्थातच, इथेही ब्रगमनच्या नियमांनुसार काही बदल झालेले दिसतातच.

मग यात समस्या कुठे आहे? असा एखाद्या विद्वानाने अभ्यासपूर्ण मांडणी करून भाषांचा विकास आणि प्रवास जगासमोर आणला, तर ते समजून घेणे खूपच रंजक आणि माहितीत भर घालणारे ठरेल. परंतु कार्ल ब्रगमन फक्त एवढेच मांडून थांबला नाही. त्याने याच्याही पुढे जाऊन काही निष्कर्ष काढले. ते जगासमोर ठेवताना कार्ल म्हणतो, “तालव्य किंवा दन्त्य ‘श/स’ पेक्षा कंठ्य ‘क’ वगैरे वर्ण उच्चारणे जास्त नैसर्गिक आहे. त्यामुळे ‘क’प्रधान केंटम भाषा आधी अस्तित्वात आल्या आणि नंतर कधीतरी कालांतराने ‘श’प्रधान सेतम भाषा विकसित झाल्या. ओघानेच हेही लक्षात घेतले पाहिजे की, केंटम भाषा बोलणारे युरोपीय आणि मध्य आशियन लोक कधीतरी स्थलांतर करून आग्नेयेला गेले आणि इराण व भारतात स्थायिक झाले. त्यामुळेच काळाच्या ओघात ‘क’चा ‘श’ होऊन त्यातून या लोकांच्या ‘सेतम’ भाषा विकसित झाल्या. हा भाषा विकास हे दाखवून देतो की, इराण आणि उत्तर भारतीय लोकांचे पूर्वज मूळचे युरोप आणि मध्य आशियातील होते. समस्या इथे आहे! ब्रगमनने तुलनात्मक भाषाशास्त्रावर पाच खंडांचे अभ्यासपूर्ण लेखन करून शेवटी जो निष्कर्ष मांडला तो फ्रेन्झ बॉप आणि सर विल्यम जोन्ससारख्या त्याच्या पूर्वसूरींचीच ‘री’ ओढणारा आहे.
वर्गीकरणाचा गोंधळ


ब्रगमनच्या निष्कर्षात काही विवाद आणि अपवादही आहेत. जगातल्या सर्वच विद्वानांना ही मांडणी पटत नाही. खरे तर ही नित्याचीच बाब आहे, पण इथे मात्र याचे प्रमाण आणि गांभीर्य जास्त आहे. अनेक भाषांच्या बाबतीत त्यांना नेमके कुठल्या गटात ठेवायचे याचा प्रश्न पडतो. उदाहरणार्थ प्राचीन तोखारीयन (Tocharian) किंवा अनातोलियन (Anatolian) सारख्या भाषांमध्ये शंभरवाचक शब्दांचा विचार करावा तर कंठ्य आणि तालव्य वर्णांचा ब्रगमनचा नियम बिघडतो आणि नियमांचा विचार करावा तर भाषागटच बदलतो.

मनुष्यप्राण्याच्या क्रमिक विकासात लहान मुले निसर्गत: बोबडे बोलतात आणि पुढे मोठी होताना प्रयत्नपूर्वक शुद्ध व स्पष्ट बोलायला शिकतात. हे फक्त इराण आणि उत्तर भारतातच नाही, तर सगळ्या जगात घडते. यात मुले आधी ओष्ठ्य (प, फ, ब, भ, म) किंवा दन्त्य वर्ण बोलायला शिकतात आणि नंतर क्रमाने प्रयत्नपूर्वक मूर्धन्य, तालव्य आणि कंठ्य वर्ण शिकत जातात. खरेतर हेच जास्त नैसर्गिक आहे. सामान्य लोकांना सहजपणे शक्य असलेले उच्चारच आधी वापरात येणे आणि नंतर गरजेनुसार प्रयत्नाने करायचे उच्चार सर्वत्र रुळणे, हेच भाषांच्या विकासात सुद्धा घडलेले असण्याची शक्यता आधुनिक अभ्यासक मांडतात. त्यामुळे आधी ‘सेटम’ भाषा आणि मग ‘केंटम’ भाषा, हाच विकास जास्त नैसर्गिक ठरतो. एका अर्थाने यातून ‘भारतातून बाहेर’ (Out of India Theory - OIT) स्थलांतरे झाल्याच्या सिद्धान्तालाच पुष्टी मिळते. आधी आपण पाहिलेले इंडो-आर्यन भाषा आणि द्राविडी भाषा हे वर्गीकरण जितके भरकटलेले आहे, तितकेच हे ‘सेटम’ आणि ‘केंटम’ प्रकारचे वर्गीकरणही निरर्थक आहे.
 
 

- वासुदेव बिडवे
 

@@AUTHORINFO_V1@@