‘आत्मनिर्भर भारत’ आणि भारतीयांची भूमिका

14 Aug 2020 13:21:57
10_1  H x W: 0




आमचं ज्ञान, विज्ञान, संस्कृती किती महान आहे. पण हे सिद्ध व्हायला, आम्हाला हे काय परकीयांनीच सांगितलं पाहिजे का? आमचे आम्हीच हे का मानू शकत नाही. इथे पण मानसिकतेमध्ये बदल होणं आवश्यक आहे. हा बदलच आम्हाला ‘आत्मनिर्भरते’कडे घेऊन जाईल.



परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या २६ एप्रिल २०२०च्या बौद्धिक वर्गामध्ये प्रथम भारताला ‘आत्मनिर्भर’ व्हायला लागेल, असा संदेश दिला. त्याची पुनरावृत्ती सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संबोधनामध्ये केली आणि त्यानंतर ‘आत्मनिर्भर’ याविषयी विस्तृत प्रमाणावर सर्व स्तरांवर चर्चा सुरु झाली. दोघांनीही आपल्या संबोधनामध्ये भारताने ‘आत्मनिर्भर’ व्हायला पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधानांनी ‘व्होकल फॉर लोकल’ असा एक संदेश दिला.


हा संदेश, सीमेवर भारत आणि चीन यांच्यामधील संघर्ष सुरू होण्याआधी दिला गेला. म्हणून याचा संदर्भ हा चीनचा विरोध म्हणून केला गेला नव्हता. परंतु, त्यानंतर काही काळातच भारत-चीन संघर्ष सुरू झाला आणि त्या धर्तीवर हा संदेश म्हणजे चीनचा विरोध असा सर्वसामान्यांचा समज झाला. परंतु, दोघांच्याही वक्तव्याचा संदर्भ हा खूप विस्तृत होता आणि फक्त बहिष्कारापुरता सीमित कधीच नव्हता.


याचा संदर्भ हा केवळ आणि केवळ बहिष्काराशी नसून प्रत्येक व्यक्तीच्या आत्मनिश्चयाशी आहे आणि म्हणूनच ‘आत्मनिर्भर’ हा विषय प्रत्येक व्यक्तीशी निगडित आहे आणि प्रत्येकजण हे ‘मिशन’ यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. बऱ्याच जणांचा असाही एक समज आहे की, ‘आत्मनिर्भर भारत’ हा विषय उद्योगापुरता मर्यादित आहे. उद्योजकांनी भारतात वस्तू बनवाव्यात आणि सामान्य नागरिकांनी त्या विकत घ्याव्या, असा अनेकांच्या मनात ‘आत्मनिर्भर’ या विषयासंबंधी समज आहे. सामान्य नागरिक म्हणून विदेशी आणि विशेष करून चीनच्या मालावर बहिष्कार आणि स्वदेशी वस्तूंची खरेदी असा एक समज आहे. पण, एक लक्षात घेतले पाहिजे की, बहिष्कार हा तात्कालिक आणि प्रतीकात्मक असतो. त्यामुळे त्याचे परिणामही तात्कालिक असतात. त्यामुळे एकप्रकारची तात्कालिक मानसिकता निर्माण होण्यास मदत होते, की जी एखाद्या कायमस्वरूपी अभियानासाठी फार महत्त्वाची असते. परंतु, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो, तो आत्मनिश्चय आणि उत्कृष्टताचा दृढनिश्चय आणि म्हणूनच सामान्य नागरिकांचे दायित्व हे ‘आत्मनिर्भर भारता’मध्ये खूप मोठे आहे. कारण, वर म्हटल्याप्रमाणे सामान्य नागरिकच प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्कृष्टतेचा आग्रह धरू शकतो. आपलं जीवनमूल्य बनवू शकतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील लागणारे वस्तू उत्पादन, सेवा आदी उत्कृष्ट असेल असा आत्मनिश्चय करू शकतो. सामान्य नागरिकच या सर्व वस्तूंचे उत्पादन करतो अथवा सेवा पुरवतो. त्या कशा उत्कृष्ट, जागतिक स्तराच्या होतील असा प्रयत्न करू शकतो.


विनोदाचा भाग म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही आपल्याकडील ‘जुगाड’ किंवा ‘जुगाड तंत्रज्ञान’ यासंबंधी बोलतो, ते संदर्भ आता प्रत्येक नागरिकाने पुसून टाकले पाहिजेत आणि प्रत्येकाच्या वागण्या, बोलण्यात भारताविषयी अपार असा अभिमान असला पाहिजे. असे उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन हे भारताला जागतिक स्तरावर अग्रेसर बनवतील आणि ही जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे.


सामान्य नागरिक हा नेहमीच या देशाची शक्ती आणि बलस्थान राहिला आहे, त्याने एखादा निश्चय केला तर तो दृढनिश्चय कोणीही बदलू शकत नाही. आजपर्यंत या जबाबदारीची जाणीव कधी कोणी करून दिली नाही. आज जेव्हा नागरिकांना साद घातली गेली, त्यावेळी प्रत्येक नागरिकाने त्याला दाद दिली. आपण काही उदाहरणे बघू शकतो, उदा. गॅस सबसिडी सोडण्याची वेळ असो की, जीएसटी राबवण्याची वेळ असो अथवा स्वच्छ भारत मिशन असो, या सर्वामध्ये सर्वसामान्य नागरिकांनाच साथ दिली आणि हे ‘आत्मनिर्भर’च्या दिशेने पडलेले पाऊल होते.
 
 
इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, त्यातील पहिली गोष्ट म्हणजे फक्त वर म्हटलेल्या गोष्टींचे अनुसरण करणे म्हणजे ‘आत्मनिर्भर’ होणे नाही, तर ‘आत्मनिर्भर भारता’साठी समाजाची मानसिकता बदलणे, हे फार महत्त्वाचे आहे. शेवटी समाज हा वैयक्तिक नागरिक आणि व्यक्ती या घटकांनीच बनतो. त्यामुळे वैयक्तिक मानसिकता बदल हा फार महत्त्वाचा आहे. आपल्यामध्ये ना जाणे का पण एक भावना रुजवली गेली आणि तिला खतपाणी दिल गेलं, ती भावना म्हणजे ‘आपलं ते हीन दर्जाचं.’ आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात आपण हे रोज अनुभवतो. आपण काही उदाहरण बघूया. आपण जर बाजारात एखादी वस्तू खरेदी करायला गेलो, तर आपण विदेशी वस्तू आहे का ते बघतो, जर ती वस्तू ‘इम्पोर्ट’ केली गेली असेल तर ती घेण्याला आपली प्राथमिकता असते. ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूची किंमत विचारतो आणि ती अवाजवी वाटली आणि दुकानदाराला तसे म्हणले तर म्हणतो की, स्वस्त पण आहे, पण ती भारतीय देशी बनावटीची आहे. एकाच झाडावरून जर आंबे काढले गेले आणि दोन बॉक्समध्ये भरले. एकावर ‘एक्स्पोर्ट क्वालिटी’ असा स्टॅम्प मारला तर तो बॉक्स खरेदी करण्याची इच्छा बाळगतो. हे सर्व असे दर्शवते की, आम्ही स्वतःच आपल्या उत्पादनाबद्दल साशंक आहोत. कारण, आमची तशी मानसिकता बनवली गेली आहे. आम्हाला, इथल्या प्रत्येक नागरिकाला ही स्वतःमधील ‘स्वदेशी’बद्दल असलेल्या हीन भावनेला बदलावं लागेल आणि ‘इम्पोर्टेड म्हणजेच चांगलं’ आणि ‘स्वदेशी म्हणजे कामचलाऊ’ या भावनेला पूर्णविराम द्यायला लागेल. चीनसारख्या देशाच्या विरोधासाठी आता ‘स्वदेशी’चा वापर हे खूप ‘रिअॅक्शनरी’ आहे. आम्हाला हे कधी सांगितलं गेलं नाही आणि आम्हाला पण याचा कधी आत्मनुबोध झाला नाही. आज आम्हाला हे पटवून सांगितलं जातं आहे आणि त्यातच शेजारील चीनसारख्या देशाशी झालेल्या संघर्षामुळे आज आम्ही हे जबरदस्तीने स्वीकारत आहोत. पण, हे सर्व आतून येणे जरुरी आहे.


दुसरी गोष्ट म्हणजे, हे सांगणार व्यक्तिमत्त्व पण तसेच आदर्श पाहिजे की, ज्याचं अनुसरण केलं जाईल. आज ते उपलब्ध आहे आणि स्वतःच्या कृतीमधून दाखवून देत आहे आणि म्हणूनच त्याचं अनुकरण करणं शक्य आहे. जर नेतृत्वाला ‘आत्मनिर्भर’वर विश्वास असेल, तरच नागरिक त्याची पुस्ती जोडतील आणि आत्मनिश्चयाने प्रभावित नागरिक प्रत्येक गोष्ट ही उत्कृष्ट करतील, मग ती उत्पादित करणे असो अथवा खरेदी करणे असो अथवा सेवा देणे, व्यापार करणे असो.


त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने आमच्याकडील चांगल्या गोष्टींसंबंधी अभिमान बाळगणे आवश्यक आहे, उदा. आमचा आयुर्वेद, आमचा योग, आमचं तत्त्वज्ञान, आमची संस्कृती, आमचं शिक्षण, आमची जीवनमूल्य इ. ‘आम्ही’ यासंबंधी कधीच अभिमान बाळगत नाही आणि नंतर जेव्हा याच गोष्ट परकीय अवलंबतात तेव्हा आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. जेव्हा ‘योग’ हा ‘योगा’ म्हणून आमच्याकडे येतो, जेव्हा भगवद्गीतेचे पाठ विदेशात होतात, तेव्हा आम्हाला वाटते की, आमचं ज्ञान, विज्ञान, संस्कृती किती महान आहे. पण हे सिद्ध व्हायला, आम्हाला हे काय परकीयांनीच सांगितलं पाहिजे का? आमचे आम्हीच हे का मानू शकत नाही. इथे पण मानसिकतेमध्ये बदल होणं आवश्यक आहे. हा बदलच आम्हाला ‘आत्मनिर्भरते’कडे घेऊन जाईल.


आम्ही भूमीला माता मानतो, गाईला माता मानतो. कृषी हा आमच्या देशाच्या उत्पादनाचा प्रमुख स्त्रोत राहिला आहे. या दोन्ही मातांची सेवा जर आमच्याकडून घडली तर आपोआप आम्ही ‘आत्मनिर्भर’ बनू. म्हणून गोसेवा, गोउत्पादन, गोआधारित शेती इत्यादीवर मोठ्या प्रमाणात काम होणे आणि शेतीला उत्पनाचे प्रमुख साधन मानून प्रामाणिकपणे आणि मोठ्या प्रमाणावर त्यावर काम करणे, हे फार ‘आत्मनिर्भरते’च्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.


हे सर्व करत असताना समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन, त्यांचा सर्वसमावेशक स्तर वाढवणे की, ज्यामध्ये शैक्षणिक, कौशल्य आदी प्रशिक्षण देऊन त्यांना त्या त्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट बनवणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. असा उत्कृष्टतेने प्रभावित झालेल्या समाजातील प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी स्वतःहून स्वीकारून, ‘आत्मनिर्भर भारत, उत्कृष्ट भारत’ हे ब्रीद घेऊन भारताला विश्वगुरु बनवण्याच्या मार्गावर पादाक्रांत होईल.




- संजय ढवळीकर

Powered By Sangraha 9.0