आर्थिक स्वतंत्रतेच्या दृष्टीने वाटचालीचा संकल्प...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Aug-2020
Total Views |
12_1  H x W: 0



पुढील २० वर्षांत भारताच्या प्रगतीचा रथ कोणी रोखू शकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा त्याच्या बरोबरीने मला माझाही उत्कर्ष साधायचा आहे, असा विचार नव्हे, संकल्प प्रत्येकाने आज करण्याची गरज आहे. येत्या १० किंवा २० वर्षांत माझ्या आयुष्यात आर्थिक स्वतंत्रता आलीच पाहिजे, याचा विचार करणे आवश्यक आहे.


भारतीय स्वातंत्र्याचा ७४वा वर्धापन दिन आज आपण आता साजरा करीत आहोत. २०२० मध्ये भारत आजही विकसनशील देशांमध्ये गणला जातो. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता आता आपला क्रमांक सहावा आहे. भारतीय अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने मार्गक्रमण करीत आहे, तसे पाहता आपले भविष्य सुखकर आहे, यात शंका नाही. भारताची घौडदौड सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणूनच आज जगात भारताची मान उंचावली आहे. मात्र, जगाच्या तुलनेत आपले दरडोई उत्पन्न जेमतेम दोन हजार डॉलरच्या घरात आहे, ते वाढण्याची गरज आहे. तसेही केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहेच. त्यामुळे आपले दरडोई उत्पन्न येत्या काही दिवसांत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


माझे व्हिजन २०३०-२०४०

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी साधारणपणे २०-२२ वर्षांपूर्वी एक संकल्पना मांडली होती. त्यांनी ‘इंडिया २०२०’ या पुस्तकाच्या रुपाने ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न पाहिले होते. २०२० मध्ये भारत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसा समृद्ध होईल आणि जगात त्याचे नाव होईल, यासंबंधी केलेले भाकीत, तसेच त्यासंदर्भात मांडलेली भूमिका आज काही अंशी खरी होताना दिसत आहे. एकूणच काय तर भारताची विविध क्षेत्रांमध्ये प्रगती होत असताना आर्थिक क्षेत्रात प्रगती होणे क्रमप्राप्त आहे. भारताच्या प्रगतीसोबत माझी प्रगती झाली पाहिजे, असे स्वत:चे एक आर्थिक ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. भारतासाठी ‘व्हिजन २०२०’ होते. मी माझ्यासाठी ‘व्हिजन २०३०’ किंवा ‘व्हिजन २०४०’ ठरवू शकतो का... आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी मला त्यासंबंधी एक स्वप्न पाहावे लागेल.


कमी होणारे व्याजदर

भारताची प्रगती होत असताना प्रत्येक भारतीय नागरिकाचा उत्कर्ष होणे आवश्यक आहे. आपण स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की, मी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे का किंवा ‘आत्मनिर्भर’ आहे का? गेल्या ३० वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे, भारताचा विकास होत आहे, तसा व्याजदर दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या ३० वर्षांचा विचार केला तर १६ टक्क्यांपासून पाच टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आपल्यापैकी अनेकांना दामदुप्पट योजना आठवत असतील. एक काळ होता, जेव्हा पाच वर्षांत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात पैसे दुप्पट होत होते. आता तर दामदुप्पट योजना जवळपास इतिहासजमा झाल्या आहेत. बँकांचे व्याजदर जसे कमी होत आहेत, तसे अनेक वरिष्ठ नागरिकांचे अंदाजपत्रक डळमळत आहे. महिन्याचे व्याज दिवसेंदिवस कमी होत असल्याने, आता आपले कसे होणार अशी अनेकांना चिंता लागली आहे. सध्या काही सरकारी योजना, एलआयसी तसेच पोस्टाच्या योजनांमध्ये सात टक्के किंवा त्यापेक्षा अधिक व्याज मिळत आहे. तो मिळणारा व्याजदर त्वरित लॉक करणे आवश्यक आहे.


वॉरेन बफेटचा सल्ला आणि संपत्ती निर्धारण

जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी गुंतवणूकदारांना एक सल्ला दिला आहे. ते म्हणतात, “Don’t put your all eggs in one basket” अर्थात सर्वच गुंतवणूक एकाच ठिकाणी करु नका. भारतीय व्यक्ती आजही एकाच प्रकारात गुंतवणूक करण्यात धन्यता मानणारा आहे. गुंतवणूक पर्यायांचा विचार आता काही प्रमाणात करण्यात येऊ लागला आाहे. भारतात साधारणपणे बँकांमधील मुदती ठेव योजना तसेच पोस्टातील विविध योजना या अतिशय लोकप्रिय आहेत. आजघडीला बँकांचे व्याज दर, असलेला महागाईचा दर आणि व्याजावर द्यावा लागणारा आयकर याचा विचार केला, तर गणित कुठेतरी चुकते आहे, याचा अंदाज घेता येऊ शकतो. सूूज्ञ वाचकांनी आपल्याजवळ असणार्‍या संपत्तीचा हिशोब करुन स्वत:चे गणित मांडून पाहावे. फरक सर्वांनाच लक्षात येईल.


आधुनिक गुंतवणूक शास्त्राचा विचार केला, तर वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. या प्रकाराला संपत्तीचे निर्धारण (Asset Allocation) असे संबोधले गेले आहे. यात बँक, सोनं, बॉण्ड, शेअर्स, म्युच्युअल फंड, आंतरराष्ट्रीय फंड, गव्हर्मेंट सेक्युरिटीज यासारख्या विविध गुंतवणूक प्रकारात आपली क्षमता आणि कालावधी याचा विचार करुन आर्थिक ध्येयपूर्तीच्या दृष्टीने गुंतवणूक करण्याला प्राधान्य देण्यात येते. प्रत्येक व्यक्तीने आपली गुंतवणूक करताना या सर्व प्रकारांचा विचार करणे आवश्यक आहे. आजपासून २० वर्षांच्या आधी त्यामानाने पर्याय उपलब्ध नव्हते. त्या काळात फक्त बँक आणि पोस्ट हे दोनच पर्याय सर्वसामान्यांसाठी होते. शेअर बाजाराची गुंतवणूक अगदी बोटावर मोजण्याइतके लोक करीत होते. आता मात्र काळ बदलला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक सर्वांना समजेल अशी झाली आहे. त्याबरोबर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तज्ज्ञ फंड मॅनेजरच्या ज्ञानाचा वापर करुन आपण श्रीमंत होऊ शकतो.


बँक, सोनं, शेअर बाजार आणि महागाई

भारतामध्ये कोणत्याही बँकेतील मुदती ठेव ही सर्वात सुरक्षित समजली जाते. त्याचप्रमाणे सोन घेणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. त्यामानाने शेअर बाजारात जेमतेम दोन टक्के भारतीय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबधित आहेत. बँकेत फिक्स डिपॉझिट प्रत्येक भारतीय करतो, त्याचप्रमाणे सोनं खरेदी करणेही भारतीयांना आवडते. त्यामुळे आज प्रत्येकाजवळ बँकेतील मुदत ठेव आहे. तसेच काही प्रमाणात सोनं आहे. भारतीयांना खात्रीलायक गुंतवणूक हवी असते. त्यांना सहसा गुंतवणुकीच्या बाबतीत जोखीम घ्यायला आवडत नाही. त्यामुळेच शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक योजनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय निराळा असतो. काळाच्या ओघात आपण गुंतवणूक करताना महागाईचा विचार करीत नाही. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये महागाईचा खूप मोठा अडथळा गुंतवणूक करताना आहे, मात्र त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते.


गुंतवणुकीचा विचार करताना आपण महागाई, भारतीय स्टेट बँकेतील मुदती ठेव, सोनं आणि शेअर बाजार या चार घटकांचा विचार करुन तुलना करणार आहोत. ही तुलना करताना १९८० ते २०२० या ४० वर्षांचा विचार करण्यात आला आहे. गेल्या ४० वर्षांतील महागाईचा दर सरासरी ७.७२ टक्के इतका राहिला आहे. त्याचवेळी भारतीय स्टेट बँकेतील फिक्स्ड डीपॉझिटने सरासरी ८.२८ टक्के व्याज आपल्या ग्राहकांना दिले आहे. ज्या भारतीयांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली, त्यांना ८.४६ असा व्याजदर पडला. याच ४० वर्षांच्या काळात ज्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली आणि चढ-उतारांना न घाबरता संयम ठेवत गुंतवणूक कायम ठेवली, त्यांना १५ टक्के व्याजापोटी मिळाले आहेत. विशेष म्हणजे, शेअर बाजारातील व्याज बर्‍यापैकी आयकर मुक्त आहे, हे विशेष.


तुलनात्मक अभ्यास

हा विषय अधिक स्पष्ट करण्यासाठी आता आपण प्रत्यक्ष उदाहरण पाहूया. ४० वर्षांतील महागाईचा विचार करता ७.७२ टक्के सरासरी दराने १९८० मध्ये असणार्‍या एक लाख रुपयांची किंमत आता १९ लाख रुपये झालेली आहे. याच दरम्यान १९८० मध्ये भारतीय स्टेट बँकेत एक लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट केलेला गुंतवणूकदार ती रक्कम पुन्हा पुन्हा गुंतवणूक करत गेला, तर २०२० मध्ये त्याच्या एक लाखांचे २४ लाख रुपये झाले आहेत. १९८० मध्ये एक लाख रुपयांचे सोनं विकत घेणार्‍या गुंतवणूकदाराच्या सोन्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ३१ लाख रुपये झाली आहे. आता याच ४० वर्षांत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने एक लाख रुपयांचे २ कोटी, २९ लाख रुपये केले आहेत. बाजारात आलेल्या अनेक चढउतारांमुळे कुठेही विचलित न होता संयम कायम ठेवल्यामुळे हे शक्य होऊ शकले. शेअर बाजाराच्या गुंतवणुकीची ही ताकद आहे, त्यामुळे त्याचा फायदा आपण सर्वांनी घेतला तरच श्रीमंत होता येऊ शकते.


आर्थिक स्वतंत्रतेचे स्वप्न

प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा असतो. आयुष्यात काही स्वप्न पाहिलेली असतात. मात्र, धकाधकीच्या जीवनात सर्वच स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी आपण आपल्या मनाशीच ठरवत असतो, मी निवृत्त झाल्यावर मी माझ्या पद्धतीने आयुष्याचा आस्वाद घेईल. राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी बर्‍यापैकी पैसा लागतो. त्यासाठी आधीच्या २५-३० वर्षांपासून नियोजन असेल तर निवृत्तीनंतरचे आयुष्य चांगले घालवता येऊ शकते. जोपर्यंत आपल्याजवळ पर्याप्त पैसे जमा होत नाही, तोपर्यंत आपण पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालो, असे छातीठोकपणे सांगू शकत नाही.


पुढील २० वर्षांत भारताच्या प्रगतीचा रथ कोणी रोखू शकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा त्याच्या बरोबरीने मला माझाही उत्कर्ष साधायचा आहे, असा विचार नव्हे, संकल्प प्रत्येकाने आज करण्याची गरज आहे. येत्या १० किंवा २० वर्षांत माझ्या आयुष्यात आर्थिक स्वतंत्रता आलीच पाहिजे, याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले स्वत:चे ‘व्हिजन २०३०’ किंवा ‘व्हिजन २०४०’ निश्चित करावे आणि आजच नियोजनपूर्वक संपत्तीचे निर्धारण करुन आर्थिक स्वतत्रतेचे स्वप्न पाहावे.



- प्रसाद फडणवीस
(लेखक आर्थिक विषयाचे अभ्यासक आणि सल्लागार आहेत.)


@@AUTHORINFO_V1@@