भोंग्यांविरोधातील पहिला लढा यशस्वी!

    दिनांक  13-Aug-2020 22:33:15
|

azan_1  H x W:
 
 
 
 

मुंबई : नमाजाआधी वाजविण्यात येणार्‍या अजानच्या मोठ्या आवाजाच्या त्रासाबाबत थेट मशिदीत जाऊन जाब विचारण्याचे धाडस करणार्‍या मानखुर्द येथील तरुणी करिश्मा भोसले यांचा पहिला लढा अखेर यशस्वी झाला आहे.

 

मानखुर्दमधील मशिदीसमोरील मुंबई महानगरपालिकेच्या खांबावर गेल्या २० वर्षांपासून अनधिकृतपणे लावण्यात आलेला ध्वनिक्षेपक अखेर हटविण्यात आला. मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात प्रशासनाकडून झालेली ही कारवाई म्हणजे हे एक मोठे यश मानले जाते. मानखुर्दमधील मशिदींविरोधातील अनधिकृत भोंग्यांविरोधात थेट मशिदीत जाऊन जाब विचारण्याचे धाडस करिश्मा भोसले या तरुणीने केले होते. करिश्मा यांच्या या धाडसाचे चहुबाजूंनी कौतुक करण्यात आले होते. त्यांनी सुरु केलेल्या या लढ्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळाल्यानंतर मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटविण्याच्या मागणीला जोर धरला होता. त्यानंतर उशिरा का होईना अखेर प्रशासनाने हा भोंगा हटविल्याने करिश्मा भोसले यांचा लढा यशस्वी झाला आहे.

 

या पार्श्वभूमीवर गुरुवारी करिश्मा भोसले यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “अनेक महिन्यानंतर अखेर प्रशासनाने गुरुवारी येथील महापालिकेच्या खांबावरून हा अनधिकृत ध्वनिक्षेपक हटवला. सकाळी ११च्या सुमारास पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांनी संयुक्तपणे कारवाई करत येथील अनधिकृत ध्वनिक्षेपक हटविला. प्रशासनाने कारवाई करत ध्वनिक्षेपक हटविल्याचे समाधान नक्कीच आहे. मात्र, या कारवाईसाठी प्रशासनाने खच्ची घातलेल्या वेळेचीही चिंता वाटते. गेल्या महिन्यात ३० जुलै रोजी हा ध्वनिक्षेपक हटविण्याबाबत येथे प्रशासनाने नोटीस जारी केली होती. मात्र, अद्याप कारवाई झाली नव्हती. बकरी ईद, रक्षाबंधन, दहिहंडी आधी सणांच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र गुरुवारी अखेर ध्वनिक्षेपक हटवत प्रशासनाने आपले आश्वासन पूर्ण केले आहे, ” असे त्यांनी सांगितले.

 

पुढे त्या म्हणाल्या की, “प्रशासनाकडून आज कारवाईसाठी मुहूर्त काढण्यात येईल, असे वाटले नव्हते. आज सकाळी कामानिमित्त बाहेर असताना पोलिसांनी फोन करून ध्वनिक्षेपक हटविल्याची माहिती दिली. ही कारवाई होणार याबाबत आधी कळविले नव्हते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई झाली आणि फोन आला. ऐकून समाधान वाटले,” असे करिश्मा यांनी सांगितले. येथील अनेक नागरिक या मशिदीवरील भोंग्यांमुळे होणार्‍या सततच्या ध्वनिप्रदूषणामुळे त्रस्त असल्याचे करिश्मा यांनी सांगितले. सर्वांच्या हितासाठीच आपण हे पाऊल उचलल्याचे सांगत आगामी काळात मानखुर्दमधील सर्व मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी संघर्ष करणार, असा निर्धार करिश्मा यांनी यावेळी केला.

 

करिश्मा भोसले या सर्वसामान्य कुटुंबातील रहिवासी असून मानखुर्द येथे त्या आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत. आपले आई-वडील आणि दोन लहान भाऊ यांच्यासोबत मानखुर्दमधील इमारतीत त्या राहतात. करिश्मा यांनी आपले एमएससीचे शिक्षण नुकतेच पूर्ण केले असून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘नीट’च्या परीक्षेची तयारी करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न असून यासाठी दररोज सकाळी उठून त्या अभ्यासाला बसतात. मात्र, सकाळीच भल्या मोठ्या आवाजात होणार्‍या अजानमुळे यात वारंवार व्यत्यय येतो. इतक्या मोठ्या आवाजातील अजानमुळे केवळ आपल्यालाच नाही तर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना त्रास होतो. अजानचा आवाज एकदाच नाही तर दिवसातून अनेकदा होत असल्याने परिसरातील अनेक नागरिक यामुळे त्रस्त आहेत. मानखुर्द परिसरात अशा अनेक मशिदी असून प्रत्येक मशिदीवर वाजणार्‍या भोंग्यांच्या आवाजांमुळे अनेकदा अभ्यास करताना अडचणीचा सामना करावा लागतो. परिसरात जवळपास १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या मशिदीवरील भोंगेही इतक्या मोठ्या आवाजाने भल्या पहाटे वाजवले जातात की, कर्कश आवाजामुळे कान बंद करावे लागतात. नित्यनियमाचा हा त्रास असल्याच्या कारणातूनच मी याबाबत तोडगा काढण्यासाठी थेट मशिदीत जाऊन थेट त्यांना जाब विचारला होता, असे करिश्मा यांनी यावेळी सांगितले.

 

अन्यायाविरोधात आवाज उठवणे गरजेचे

 

कोणत्याही अन्यायाविरोधात आवाज उठवणे गरजेचे असते. मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवल्यानेच प्रशासनाने अखेर कारवाई केली. एकदा का जर आपण सहन केले तर अन्याय सहन करावाच लागतो. मात्र, याविरोधात आवाज उठविल्यास अन्याय मोडूनही काढता येतो. हेच यावरून सिद्ध झाले आहे. आपण सर्वांनी एकोप्याने लढा दिला तर सर्व काही साध्य करता येते.

 

- करिश्मा भोसले, मानखुर्द

 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.