बँकांची सुरक्षा रामभरोसे

13 Aug 2020 22:12:12


nashik_1  H x W



गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढले आहे. नाशिक शहरात रविवारी कारंजा या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या युको बँकेच्या भिंतीला भगदाड पाडून नुकताच लुटीचा प्रयत्न करण्यात आला. शनिवार, रविवार दोन दिवस बँका बंद असल्याने हा दरोडा नक्की कधी पडला, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र, यानिमित्ताने नाशिकमधील बँक आणि एटीएमच्या सुरक्षारक्षकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहार सुरळीत चालू होत असताना दुसरीकडे बँकेतील सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे.  
गेल्या तीन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे गोडावून फोडत सुमारे लाखो रुपयांची चोरी करण्यात आली होती. मात्र, तिथेही खासगी सुरक्षारक्षक तैनात नव्हता आणि बँकेत चोरी झाली. त्याठिकाणीसुद्धा कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याचे तपासात समोर आले आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस खाते बंदोबस्तात व्यस्त असताना दुसरीकडे शहरात गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील बँका आणि खासगी आस्थापने किती सुरक्षित यावर रविवार कारंजा येथील येथील घटनेमुळे नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी आस्थापने, एटीएम अशा जोखमीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश शहर पोलिसांच्यावतीने शहरातील आस्थापनांना वारंवार देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी सुरक्षा नसेल, त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेतसुद्धा शहर पोलिसांच्यावतीने यापूर्वीच देण्यात आले आहेत. उलटपक्षी या आदेशालाच केराची टोपली दाखवण्याचे काम बँकेच्या अधिकार्‍यांकडून केले जात असल्याचे यामुळे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात पोलीस चौक्यांचे उद्घाटन करण्यात नाशिक पोलीस व्यस्त आहे. मात्र, आपण दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्‍या बँका, खासगी आस्थापने यांच्यावर शहर पोलिसांमार्फत कारवाई होणार तरी कधी, हा प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरित आहे. त्यामुळे एकप्रकारे नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी बँक फोडण्याची झालेली घटना ही पोलिसांसमोर नक्कीच आव्हान उभे करणारी आहे, हे मात्र नक्की.
 
‘कोविड’ कक्ष की कचरा डेपो?
 

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी खास कक्षदेखील उभारण्यात आला आहे. मात्र, हा कोरोना कक्षच व्हेंटिलेटरवर ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोना कक्षाच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून कक्षा शेजारीच ‘कोविड बायोवेस्ट’चे प्रचंड साम्राज्य पसरल्याने कोरोना जाणार की आणखीच वाढणार, असा आश्चर्यकारक सवाल उपस्थित झाला आहे.

जिल्ह्याभरातून नाशिकच्या शासकीय रुग्णालयात रोज कोरोनाचे शेकडो रुग्ण दाखल होतात. या रुग्णांवर उपचार करताना वापरण्यात येणारे ‘पीपीई किट’, हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, टेस्टिंग किट, गोळ्या औषधांचे पॅकेट्स यांची विल्हेवाट योग्य रीतीने लावण्याची गरज असताना सर्व वापरलेल्या वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत भरून त्या चक्क कक्षाशेजारी फेकून देण्यात आल्या आहेत. या पिशव्या गेल्या अनेक दिवसांपासून या पिशव्या इथे पडून असल्याचे तेथील परिस्थितीवरून दिसून येते. सुमारे दोन ट्रक भरतील इतका हा ‘बायोवेस्ट’ कचरा इथे साचला आहे, त्यातच रात्री रुग्णालयाच्या आवारात असलेले भटके कुत्रे या पिशव्या फाडून त्यातील वस्तू इतरत्र घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
इतका कचरा साचलेला असताना जिल्हा रुग्णालयातील सफाई विभाग काय करतोय, हादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. हा सर्व ‘कोविड बायोवेस्ट’ कचरा असून वापरण्यात आलेल्या वस्तूंची विल्हेवाट वेळोवेळी आणि व्यवस्थितपणे लावण्याची गरज आहे.
कदाचित या कचर्‍यामुळे जिल्हा रुग्णालयातच कोरोनाचा फैलाव झाला तर याला जबाबदार कोण, हा प्रश्न नक्कीच निर्माण होऊ शकतो. सदरची बाब जिल्हा रुग्णालयाच्या लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता कचरा उचललादेखील जाईल. मात्र, सर्वत्र स्वच्छतेचा जागर होत असताना जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच असा प्रकार घडणे हे निश्चितच भीषणावह आहे. तसेच, आज जरी यावर कारवाई होत असली तरी, आगामी काळात असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची शाश्वती ती काय? त्यामुळे नाशिककर नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्यास त्यास जबाबदार कोण, हा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
 
 
 

Powered By Sangraha 9.0