ससून डाॅकवर आढळलेल्या व्हेल शार्क प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल: मच्छीमाराचा शोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2020
Total Views |

whale shark _1  

बंदर यंत्रणा निद्रिस्त

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईतील ससून डाॅकवर बुधवारी पहाटे २५ फुटांचा मृत व्हेल शार्क मासा आढळून आला. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत व्हेल शार्क संरक्षित असल्याने या प्रकरणी वन विभागाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा मासा बंदरावर वाहून आणणेल्या मच्छीमाराला शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे ससून बंदरावर कायद्याने संरक्षित आणि दुर्मीळ सागरी प्रजातींचा व्यापार सुरू असल्याचे समोर आले असून बंदर यंत्रणा निद्रिस्त असल्याचेही उघड झाले आहे. 
 
 
 
भारतात 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत सुरक्षित असलेल्या सागरी जीवांची मासेमारी किंवा त्यांचा व्यापार करणे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्याअंतर्गत व्हेल, शार्क, पाकट, कासव, डाॅल्फिन प्रजातींमधील जीवांना संरक्षण देण्यात आले आहे. मुंबईतील ससून डाॅक हे महाराष्ट्रातील प्रमुख मासेमारी बंदर आहे. बुधवारी सकाळी याठिकाणी मृत व्हेल शार्क मासा आढळून आला. या घटनेची माहिती 'मत्स्यव्यवसाय विभागा'च्या अधिकाऱ्यांना कळल्यानंतर त्यांनी बंदरावर धाव घेतली. मात्र, अधिकारी बंदरावर पोहोचण्यापूर्वीच व्यापाराने या माशाला कापून त्याचे तुकडे केले होते. या माशाला बंदरावर आणलेल्या मच्छीमाराने माशाला व्यापाराला विकले. वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'चे (मॅंग्रोव्ह सेल) अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी या व्यापाराला आणि मांस वाहून नेण्यासाठी आणलेल्या ट्रॅम्पो चालकाला ताब्यात घेतले. 
 
 
whale shark _1   
 
 
'वन्यजीव संरक्षण कायद्या'च्या प्रथम श्रेणीत व्हेल शार्कला संरक्षण मिळाले आहे. म्हणजेच त्याला वाघाऐवढे संरक्षण आहे. अशा परिस्थितीत या माशाचा व्यापार करणे गुन्हा असल्याने आम्ही व्यापारी आणि ट्रॅम्पो चालकावर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी दिली. या दोघांना अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांना हा मासा विकणाऱ्या मच्छीमाराचा शोध घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा मासा मादी प्रजातीचा आहे. व्हेल शार्कच्या परांना आणि यकृताला आंतराराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी असल्याने त्यांचा व्यापार होतो. ससून डाॅकवर घडलेल्या प्रकरणामध्ये माशाचे यकृत आणि शरीरावरील पर शाबूत असले तरी, पोहण्यासाठी वापरले जाणारे मागील पर गायब असल्याची माहिती वन विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळे या पराचे नेमके काय झाले, याविषयीही जाणून घेणे आवश्यक आहे. तसेच बंदरावर कायद्याने संरक्षित आणि दुर्मीळ प्रजातीचा मासा दाखल होईपर्यत आणि त्याची खरेदी-विक्री होईपर्यंत बंदर यंत्रणा झोपली होती का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
 
 
 
ससून डाॅकमध्ये सापडलेले माशाचे तुकडे ऐरोलीतील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात हलविण्यात आले आहेत. गुरुवारी पशुवैद्यकाव्दारे त्याचे शवविच्छेदन केले जाईल. या मासा व्यापाराला विकला जाणून त्याचा व्यापार झाल्याने मासा पकडणाऱ्या मच्छीमारावरही गुन्हा दाखल करण्यात येईल. - विरेंद्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष 



व्हेल शार्क माशाविषयी 
 
समुद्रामध्ये आढळणाऱ्या मत्स्य प्रजातींमधील व्हेल शार्क हा सर्वात मोठा मासा आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये त्याला वाघाऐवढे म्हणजे प्रथम श्रेणीचे संरक्षण लाभले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या आययूसीएनच्या लाल यादीत हा मासा संकटग्रस्त प्रजाती म्हणून घोषित करण्यात आला आहे. व्हेल शार्क भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर आढळतात. गर्भधारक माद्या आणि त्यांची पिल्ले गुजरातच्या किनाऱ्यावर आढळली आहेत. या माशांमध्ये प्रजननासाठी प्रौढ कालावधी अंदाजे वीस ते सत्तावीस वर्षांचा आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@