‘त्या’ बियांमागचं काळंबेर...

12 Aug 2020 01:20:02

dd_1  H x W: 0  
 


  अमेरिका, इंग्लंड, कॅनडा तसेच कित्येक युरोपीय देशांसह भारतातही अशी बियांची पार्सल्स एकाएकी हजारोंच्या संख्येने दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. पण, या बियांमागचे नेमके रहस्य अजूनही गुलदस्त्यात असून अमेरिकेचे कृषी मंत्रालय याचा कसून शोध घेत आहे.   

ऑनलाईन काहीही न मागवता दारावर धडकलेले पार्सल. त्यावर रीतसर पत्ता आणि संपर्क क्रमांकही अगदी ठळक अक्षरात. म्हणजे, ‘हे पार्सल आपले नाही’ म्हणण्याचा प्रश्नच नाही! पण, न मागवता कुणी काय पाठवले असेल बरं? घरातल्या कोणी आपल्या अपरोक्ष काही मागवले असेल का आपल्यासाठी? सरप्राईझ वगैरे. मग हे पार्सल वर-खाली करूनही पाहिले. कोणाच्या पार्सलवर लिहिलेले हे कानातले आहेत, तर कुठे ब्रेसलेटचा उल्लेख. काही पार्सलवर तर कुठलाच उल्लेख नाही.
 
 
 मग हे पार्सल आले तरी कुठून? पाठवणार्‍याचा पत्ता पाहिला तर कुठे सिंगापूर, तर कुठे तैवान, तर कुठे थेट चीन. समजायला काहीच मार्ग नाही. पण, धोकादायक तर नाही ना, म्हणून ते पार्सल उलटसुलट हलवूनही पाहिले. पण, वजनाला पिसासारखे. कसलाही आवाज नाही की खुडखुड नाही. सुरक्षितच असावे म्हणून ही पार्सल्स जगाच्या कानाकोपर्‍यातील  लोकांनी उत्सुकतेपोटी उघडली खरी आणि त्यांना आश्चर्याचा एकच धक्काच बसला. या पार्सलमध्ये ना कानातले होते, ना ब्रेसलेट ना ईअरफोन; त्यात होत्या प्लास्टिकच्या छोट्या पिशव्यांमध्ये रीतसर सीलबंद केलेल्या बिया.
 
कशाच्या बिया म्हणाल, तर मोहरी, कोबी, मॉर्निंग ग्लोरी, पुदिना, जास्वंद, गुलाब वगैरे. आता या बियांचा खोलवर शोध अजूनही सुरू आहे. पण, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा तसेच कित्येक युरोपीय देशांसह भारतातही अशी बियांची पार्सल्स एकाएकी हजारोंच्या संख्येने दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. पण, या बियांमागचे नेमके रहस्य अजूनही गुलदस्त्यात असून अमेरिकेचे कृषी मंत्रालय याचा कसून शोध घेत आहे.

या बियांना सध्या ‘मिस्ट्री सीड्स’ म्हणून संबोधले जाते. नागरिकांनी हे अनोळखी पार्सल्स उघडू नयेत किंवा उघडले तरी त्यातील बियांचा कुठल्याही प्रकारे वापर करू नये. लहान मुलांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या संपर्कात या बिया येणार नाहीत, याचीही खबरदारी घेण्याचे आवाहन जगभरातील देशांनी केले आहे. कारण, या बिया म्हणजे एक प्रकारे संभाव्य जैविक शस्त्रप्रयोगही असू शकतो, असा कयास समोर आला.
 
 
या बियांमुळे स्थानिक मृदा, वनस्पती, प्राणी आणि पर्यावरणाला धोका लक्षात घेता, या बिया सरकारकडे जमा करण्यास अमेरिकेत सांगण्यात आले. पण, काही अतिउत्साही मंडळी तत्पूर्वीच त्या फुकट मिळालेल्या बिया आपल्या अंगणात पेरून मोकळीही झाली. पण, परिणाम मात्र शून्य. त्या बियांना साधे कोंबही फुटू नये, म्हणून निराशाच हाती आली, तर काहींनी त्या बियांची ऑनलाईन ओळख पटते का, हे बघण्यासाठी विचारपूसही सुरू केली. परंतु, याविषयी बर्‍याच ऑनलाईन पोस्ट्स व्हायरल झाल्यानंतर आधीच कोरोनाच्या महामारीत पिचलेल्या लोकांनी अतिशय सावध भूमिका सध्या घेतलेली दिसते.


अमेरिकेतील एका संशोधकांच्या वर्गाने हा ‘बायोटेररिझम’ अर्थात ‘जैवदहशतवादा’चा प्रकार नसल्याचे स्पष्ट केले असून, यामध्ये त्यांना ‘ब्रशिंग स्कॅम’चा वास येतोय. ‘ब्रशिंग स्कॅम’ म्हणजे अशाप्रकारे फुकट ऑनलाईन वस्तू लोकांना पाठवून, त्या त्यांनी वापराव्या आणि त्याचे चांगलेचुंगले ऑनलाईन रिव्ह्यू द्यावे, म्हणून केलेला हा अट्टाहास. पण, सगळ्यांच्या भुवया उंचावल्या त्या मुख्यत्वे पार्सलवरील चीनच्या पत्त्यांमुळे. अमेरिकन सरकारने चिनी सरकारला याबद्दल सूचित केले असून, चीनने मात्र हा आमच्या नावाचा गैरवापर केल्याचा कांगावा करून हे सगळे पार्सल्स तपासासाठी चीनच्या ताब्यात देण्याची मागणीही केली आहे. पण, कोरोनाचे उगमस्थान ठरलेल्या चीनवर आता कुणीही काडीचा विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत अजिबात नाही. त्यात कोरोना हेच मुळी चीनकडून वापरण्यात आलेले जैविक अस्त्र होते, यासंबंधीचे दावे-प्रतिदावे वेळोवेळी समोर आले. तेव्हा, अमेरिकेचा आणि पर्यायाने चीनविरोधी एकवटलेल्या जगाचा सूड उगवण्यासाठी, चीन आता कुठल्याही थराला जाऊ शकतो, याबद्दल दुमत नसावे.
 

ते काहीही असो, पण सामान्य नागरिकांनी ऑनलाईन विश्वात वावरताना, वाटाघाटी, व्यवहार करताना ‘अलर्ट’ राहायलाच हवे. अशाप्रकारे एखादे फुकट बियांचे अथवा अन्य कुठलेही पार्सल दारावर दाखल झाले, तर ‘फुकट ते पौष्टिक’चा हव्यास नको. लक्षात ठेवा, हे जग आता एक जागतिक बाजारपेठ आहे. त्याचे जितके फायदे आहेत, किंबहुना तितकेच त्या माध्यमातून फसवणुकीचे धोकेही आहेत. तेव्हा, ऑफलाईन असो वा ऑनलाईन, एक कर्तव्यदक्ष नागरिक, एक जागरूक ग्राहक आणि एक जबाबदार नेटिझन ही तिहेरी भूमिका आपण आपल्यासाठी, समाजासाठी निभवायलाच हवी.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0