वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही मुलीला मालमत्तेत समान वाटा : सर्वोच्च न्यायालय

11 Aug 2020 14:18:36

SC_1  H x W: 0


नवी दिल्ली :
वडिलांच्या मृत्यूनंतरही मुलींना संपत्तीत समान वाटा मिळणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हिंदू वारसा (दुरुस्ती) अधिनियम २००५ अस्तित्वात आला, त्यावेळी वडील हयात असोत किंवा नसो, मुलींना त्यांच्या संपत्तीमध्ये मुलाप्रमाणे समान वाटा मिळणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.


तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने असे म्हटले आहे की, ९ सप्टेंबर २००५ रोजी हयात असलेल्या सर्व मुलींना सुधारित कायद्याचे अधिकार लागू होतील. संबंधित मुलीचा जन्म कधी झाला, याने फरक पडणार नाही. हिंदू वारसा कायद्याच्या कलम ६ मध्ये ९ सप्टेंबर २००५ रोजी महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी दुरुस्ती केंद्र शासनाकडून करण्यात आली होती. वडिलोपार्जित संपत्तीत (स्थावर मालमत्तेतही) मुलांच्या बरोबरीने मुलींनाही जन्मत:च समान भागीदार म्हणून हक्क प्राप्त करून देण्याबाबतची ही दुरुस्ती आहे. परंतु कायदा दुरुस्ती अस्तित्वात आली, त्यापूर्वी म्हणजेच २००५च्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असेल, तर मुलींना याचा लाभ मिळेल की नाही, हे स्पष्ट नव्हते. वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान हक्क प्रदान करणारा हिंदू वारसा (दुरुस्ती) कायदा २००५ हा पूर्वलक्षी प्रभावाने आहे का, या मुद्द्यावर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी निकाल सुनावला.
Powered By Sangraha 9.0