महाविकासआघाडी विरोधात प्रकाश आंबेडकरांचे 'डफली बजाव' आंदोलन!

10 Aug 2020 11:20:40
prakash ambedkar_1 &

बससेवा तात्काळ सुरू करण्यासाठी शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर वाजवणार डफली!


मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्याप काही ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र लॉकडाऊन विरोधात आता वंचित बहुजन आघाडी अत्यंत आक्रमक झाली आहे. लॉकडाऊनचा निषेध म्हणून वंचितकडून १२ ऑगस्ट रोजी राज्यभरात डफली बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजे, या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.


राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही पुरती कोलमडलेली आहे. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपोसमोर दिवसभर डफली वाजवून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.


तसेच या आंदोलनात राज्यभरातील बाजार समिती, व्यापारी, रिक्षा, दुकानदार, फेरीवाले, लोहार, न्हावी, चांभार या संघटनांनीही सहभागी व्हावे, असेही आवाहन आंबेडकर यांनी यावेळेस केले आहे. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व आणि लॉकडाऊनला विरोध का आहे? हे देखील समजावून सांगावे, असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0