पावसात उभ्या ‘त्या’ महिलेला पालिका अधिकाऱ्यांची शिविगाळ

10 Aug 2020 17:39:53
kanta Murti _1  
 
मुंबई : मुसळधार पावसात मॅनहोलसमोर उभी राहून वाहनांना मार्ग दाखवणाऱ्या महिलेचा व्हीडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. कांता मूर्ती, असे या महिलेचे नाव आहे. व्हीडिओमध्ये खुल्या असलेल्या मॅनहोलच्या समोर उभी राहून अपघात होऊ नये म्हणून वाहनांना रोखण्याचे काम त्या भर पावसात सात तास उभ्या राहून करत होत्या. सोशल मीडियावरही या व्हीडिओला प्रचंड प्रतिसाद मिळीला होता.
 
 
 
४ ऑगस्ट रोजी मुंबईतील माटुंगा विभागातील एका रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूकीला अडचणी येत होत होत्या. या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून त्यांनी झाकण खुले केले. पाणी निचरा होईपर्यंत पावसात त्या तिथेच उभ्या होत्या. हा सर्व प्रकार सात तास सलग सुरू होता. आपल्या हाताने मार्गबदल सुचवत होत्या. मुंबईत गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसात ठिकठिकाणी पाणी साचले होते. यामुळे वाहतूकीलाही अडथळे निर्माण झाले होते.
 
 
 
“मी पाणी जाण्यासाठी मॅनहोलचे झाकण हटवले होते. त्यानंतर तिथेच उभी होती. मात्र, मुंबई महापालिका अधिकारी आले आणि मला शिव्या देण्यास सुरुवात केली,” असा आरोप त्यांनी केला आहे. कांता या माटुंगा भागात फुले विकण्याचे काम करतात. स्वतःसह घरातील पाच मुलांचा खर्च त्या या धंद्यातून चालवतात. संपूर्ण कुटूंबात त्या एकट्याच कमावत्या आहेत. त्यांचे पती लकवा मारल्यामुळे काम करू शकत नाहीत. एका रेल्वे दुर्घटनेमुळे त्यांच्यावर ही वेळ आली आहे.
 
 
 
गेल्या आठवड्यात मुंबईत झालेल्या तुफानी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. माटुंग्यात ज्या भागात कांता राहतात तिथेही पाणी साचले होते. घरांचे मोठे नुकसान झाले होते. विभागातील पाण्याचा लवकर निचरा व्हावा यासाठी त्यांनी झाकण काढले असावे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, पालिका नियमानुसार अशाप्रकारे झाकण खोलण्यास मनाई केली असल्याने त्यांना दमदाटी झाली असावी, असे बोलले जात आहे. पालिकेने यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
 


 
Powered By Sangraha 9.0