“दिशा कायदा आणण्यासाठी अजून किती अत्याचारांची वाट पाहणार?”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2020
Total Views |

Chitra wagh_1  
मुंबई : “महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात परिणामकारक ठरणारा दिशा कायदा अंमलात आणण्यासाठी शासन विलंब करत आहे. अजून किती अत्याचार होण्याची शासन वाट पाहत आहे, म्हणजे दिशा कायदा अंमलात येईल?” असा उद्विग्न प्रश्न भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी केला आहे. “या शासनाच्या काळात जर महिला सुरक्षित नसतील तर त्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही,” असेही त्या म्हणाल्या.
 
 
महिलांवर दररोज होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे व्यथित होत चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र शासनाला पर्यायाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून ट्विट केले आहे. त्या म्हणतात की, “रोजची सकाळ आता महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांच्या बातम्यांनीच सुरू होत आहे. मनाला वेदना देणाऱ्या या घटना आहेत. आधी रोहा, पण पिंपरी, रविवारी वर्धा येथे सात आणि बारा वर्षांच्या मुलींवर अत्याचार करून त्यांना फेकून देण्यात आले. शनिवारी चंद्रपूर येथे एका १६ वर्षांच्या मुलीवर दोघांना बलात्कार केल्याने व्यथित होत त्या मुलीने आत्महत्या केली. या साऱ्या गेल्या १० दिवसातल्या मनाला वेदना देणाऱ्या घटना आहेत. प्रत्येक घटनेवर व्यक्त होणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी या घटनांबद्दल अवाक्षरही न काढणे हा असंवेदनशीलतेचा कळस आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.
 
 
चित्रा वाघ यांनी पुढे सांगितले की, “कोरोनासोबत तर आपण सगळेच लढत आहोतच, पण त्याच्याबरोबरीने महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या घटना अतिशय भयानक आहेत. रोजच कुठल्या ना कुठल्या मुलीचा, महिलेचा अशा घटनांमुळे बळी जात आहेत. मात्र छोट्या छोट्या घटनांची दखल घेणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री इतक्या गंभीर घटना होत असतानाही गप्प का? या घटनांबाबत त्यांना व्यक्त व्हावेसे वाटले नाही का? राज्यातल्या महिला, मुली अडचणीत आहेत. त्यांच्यासाठी दोन शब्द बोलण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविले नाही. याच्यासारखी असंवेदनशीलता दुसरी कुठलीही असू शकत नाही.”
 
 
“आज पन्नास टक्के असलेल्या महिलांच्या संरक्षणासाठी दिशा नावाचा कायदा अस्तित्वात येणार होता. मात्र, कोरोनाच्या नावाखाली तो कायदा आणण्यासाठी लांबड लावण्यात येत आहे. आम्ही घिसाडघाईने हा कायदा आणणार नाही, असे म्हणत हा कायदा लागू करणे पुढे ढकलले जात आहे, हे संतापजनक आहे. हा दिशा कायदा शासन केव्हा आणणार आहे? की अजून अत्याचाराच्या घटनांमुळे काही बळी जाण्याची शासन वाट पाहत आहे? दररोज लहान मुलींसोबत, महिलांसोबत, क्वारंटाईन सेंटरमध्ये आणि सेंटरच्या बाहेरही महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. मात्र अत्याचाऱ्यांविरोधात काय कठार कारवाई करणार, याचे उत्तर सरकारने द्यायला पाहिजे. महिला सुरक्षेवर तुम्ही काय ठोस पावले उचलत आहात याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे. हेही जमत नसेल तर या सरकारला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही.” असे वाघ संतप्तपणे म्हणाल्या.
 
 
@@AUTHORINFO_V1@@