'मुख्यमंत्र्यांना शेतीतलं कळतं नसेल तर अभ्यास करावा'

01 Aug 2020 16:55:08

uddhav thackeray ch patil



पुणे :
महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकट काळात राज्यभरातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. हे आंदोलन झोपलेल्या राज्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी केले आहे. त्यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.



पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात नायगाव येथील शासकीय दूध संकलन केंद्र येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन झाले. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, पक्षातील किंवा राज्यातील ज्या नेत्यांना शेतीतलं कळतं त्यांच्याकडून शेतीतील, ग्रामीण अर्थव्यवहाराची माहिती घ्यावी अभ्यास करावा. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेच लागतील असे म्हणत मुख्यमंत्र्यांना  टोलाही  लगावला.




तसेच ते म्हणतात, राज्यात भाजपाचे सरकार असताना दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीस सुद्धा अनुदान दिले जात होते. आता तर दुधाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मात्र राज्यातील नाकर्ते सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाय योजना राबवली नसून त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे भाजपा महायुतीच्यावतीने २१ जुलैला शासनाला दूध भेट करून १ ऑगस्ट रोजी राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दूध प्रश्नांवर तोडगा न निघाल्याने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, अविनाश महाटेकर आणि विनायक मेटे आम्ही सर्वांनी मिळून बैठकीत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच आजच्या दिवशीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे 'महाएल्गार आंदोलन' करण्यात आले.



दूध उत्पादकांना प्रति लिटर दुधामागे दहा रुपये अनुदान मिळावे तसेच दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्यातील औरंगाबाद, जालना, अमरावती, सांगली, अकोला, पंढरपूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, मुंबई आदी भागात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दूध आंदोलनामध्ये महायुतीमधील घटक पक्षही सभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या गाई व म्हशीच्या दुधाला व शेत मालाला रास्त भाव मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0