शिवसेनेला दुटप्पी भूमिकेची किंमत मोजावीच लागेल : प्रवीण दरेकर

    दिनांक  01-Aug-2020 13:48:31
|

praveen darekar_1 &nमुंबई :
'गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांबाबत शिवसेनेने दुटप्पीपणाची भूमिका घेतल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल,' असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या विधानामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'कोकणात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे गरज असेल तर गणपतीसाठी कोकणात या. तसेच, बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाइनचा नियम पाळावाच लागेल, असेही ते म्हणाले. या वक्तव्यावरून विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, विनायक राऊत यांचे वक्तव्य दुट्टपीपणाचे असून एका बाजूला भावना आणि दुसरीकडे वास्तव आहे. ज्या कोकणी जनतेच्या भावनेवर स्वार होऊन शिवसेनेला राजकीय यश मिळाले. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढवली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला आता शिवसेना पायदळी तुडवत आहे. याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल,' असा संताप दरेकरांनी व्यक्त केला आहे.गणेशोत्सवासाठी राज्याच्या विविध भागांतील चाकरमान्यांना व कोकणवासी बांधवांना गावी जाण्याची ओढ लागली आहे. गावी पोहोचण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. मात्र, करोनाचा फैलाव आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांच्या प्रवासात अनेक अडथळे येत आहेत. ई पास, क्वारंटाइनबाबत राज्य सरकारने अजूनही कोणतीच ठोस भूमिका न मांडल्याने त्यांच्यातील असंतोष व संभ्रम वाढतो आहे. अशातच प्रवासाचे कोणतेही साधन उपलब्ध करून न दिल्याने गोंधळात असणाऱ्या नागरिकांना कोकणातील गावागावांत बनविलेल्या नवनव्या नियमांचा सामना करावा लागत आहे. लोकांना प्रवेश देण्यावरून गोंधळ सुरू आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.