'राजू शेट्टी हे तर आता सरकारी आंदोलक'

    दिनांक  01-Aug-2020 16:07:46
|

devendra fadnavis_1 


'दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्या' : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसमुंबई :
दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज राज्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये राज्यातील विरोधी पक्ष असलेला भाजपही आक्रमकपणे उतरला आहे. राज्यातील अनेक भागात भाजपाच्या नेत्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.


देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले. तसेच दूध दरवाढीसंदर्भात बोलताना दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली. महाविकास आघाडीचे नेते केंद्र सरकारने दूध भुकटीची आयात केल्याचा आरोप करत आहेत. मात्र केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही. असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. राजू शेट्टी हे आता सरकारी आंदोलक झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दूध उत्पादकांना प्रति लिटर दुधामागे दहा रुपये अनुदान मिळावे तसेच दूध पावडरला पन्नास रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी भाजपच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्यातील औरंगाबाद, जालना, अमरावती, सांगली, अकोला, पंढरपूर, पुणे, अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, मुंबई आदी भागात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या दूध आंदोलनामध्ये महायुतीमधील घटक पक्षही सभागी झाले आहेत. शेतकऱ्यांच्या गाई व म्हशीच्या दुधाला व शेत मालाला रास्त भाव मिळावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.