'वर्ल्ड्स बेस्ट CM' जनतेला पुरावा द्या म्हणतायत : कंगना राणावत

    दिनांक  01-Aug-2020 18:13:37
|
uddhav_1  H x W

सुशांत प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर संतापली कंगना!

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना राणावतने त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. कंगनाच्या वतीने ट्विट करताना तिच्या टीमने लिहिले की, ‘जगातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ज्यांनी हत्येला दोन मिनिटांत आत्महत्या असल्याचे सांगितले, ते आता लोकांकडे पुरावे मागत आहेत. यापूर्वी उद्धव यांनी मुंबई पोलिसांचा बचाव करत मुंबई पोलिस हे कार्यक्षम आहेत’, असे म्हटले होते.


शनिवारी सकाळी कंगनाच्या टीमने या मुद्द्यावर ट्विट केले. पहिल्या ट्विटमध्ये "कंगनाला गप्प करण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या जात आहेत. या हत्येसाठी चित्रपट माफिया आणि राजकीय माफियांनी हातमिळवणी केली आहे. कंगनाला कशाची भीती वाटत नाही, मृत्यूदेखील ती घाबरत नाही, असा अंदाज ते बांधत आहेत." म्हटले होते.


तर, दुसऱ्या ट्विटमध्ये कंगनाच्या टीमने उद्धव ठाकरेसंदर्भातील एक बातमी शेअर करताना लिहिले, “जगातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री मला पुरावा द्या असे म्हणत आहेत, आता जनतेने त्यांना पुरावे देण्याची गरज आहे, परंतु मुंबई पोलिस अजून गुन्ह्याचे ते ठिकाणदेखील सील करु शकली नाही. किंवा तपासणीसाठी तिथून केस किंवा बोटाचे ठसेही गोळा केले नाहीत, पण चित्रपट माफियांच्या सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांना आमच्याकडून पुरावे हवे आहेत', असे या ट्विटमध्ये म्हटले गेले आहे.


तिसर्या ट्विटमध्ये या टीमने लिहिले की, “सुशांतचे कुटुंब आणि मैत्रीण स्मिता यांनी सुशांतला इंडस्ट्री सोडायची इच्छा होती, असे सांगितले आहे. त्याचा येथे जीव गुदमरत होता आणि तो घाबरला होता. मला येथे मारुन टाकली, असे तो सतत म्हणायचा. आणि जगातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांनी २ मिनिटांत त्याची हत्या आत्महत्या म्हणून घोषित केली आणि चित्रपट माफियाशी संबंधित गिधाडांनी मानसिक नैराश्याची मोहीम सुरू केली", असा हल्लाबोल कंगनाने केला आहे.


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. “जर कोणत्याही व्यक्तीकडे पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांकडे सोपवावे. आम्ही दोषींची चौकशी करून त्यांना शिक्षा करू. परंतु कृपया करून या प्रकरणाचा वापर महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांदरम्यान वाद उत्पन्न करण्यासासाठी करू नका,” असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावर कंगनाने सडकून टीका केली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.