लोकमान्यांनी स्वातंत्र्यलढ्यास ‘भारतीय’ स्वरूप दिले- अमित शाह

    दिनांक  01-Aug-2020 12:43:13
|

shah final_1  H

लोकमान्यांनी स्वातंत्र्यलढ्यास
भारतीय स्वरूप दिले- अमित शाह

 

नवी दिल्ली : आपली संस्कृती आणि पुरातन वारसा हा स्वराज्याचा आधार असायला हवा आणि भविष्यातील आव्हाने पार करण्यासाठी जगातील उत्तम ते स्विकारण्याची तयारी हवी, असे लोकमान्यांचे मत होते. त्यामुळे लोकमान्यांच्या कार्याचा अभ्यास केल्यास भारतीय स्वातंत्र्यलढ्यास खऱ्या अर्थाने भारतीय स्वरूप देण्याचे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचे स्पष्ट होते, असे प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना शुक्रवारी दिल्ली येथे केले.

 

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दीनिमित्त आयोजित स्वराज ते आत्मनिर्भर भारतया आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात (वेबिनार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते.

 

लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व अतिशय उत्तुंग होते. ते क्रांतिकारी विचारांचे उद्गाते होते, दार्शनिक होते, तत्वज्ञ होते, समाजसुधारक होते, यशस्वी पत्रकार आणि संपादकही होते. लोकमान्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत. भारतीय संस्कृतीविषयी लोकमान्य अतिशय आग्रही होते. स्वराज्याचा आधार हा भारतीय संस्कृती आणि भारताचा पुरातन वारसा असायला हवा. त्याचवेळी भविष्यातील आव्हाने पार करण्यासाठी जगातील जे जे उत्तम असेल ते ते स्विकारण्याची तयारी हवी, असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यास खऱ्या अर्थाने भारतीय स्वरूप लोकमान्यांनी दिले. भारतीय समाजमनाचा नेमका अभ्यास असणारे आणि भारतीय संस्कृतीच्या आधारवर स्वराज्याचा विचार मांडणारे लोकमान्य टिळक कालातीत लोकनेते होते, असे शाह म्हणाले.

 
 
 
 

लोकमान्यांना ईश्वरदत्त प्रतिभा प्राप्त होती, मात्र तरीदेखील ते जनमानसासोबत जोडले गेले होते असे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, एकीकडे लोकमान्य भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करित होते, त्याचवेळी दुसरीकडे हे महिलांचे विवाह वय वाढविण्यासाठी चळवळ करीत होते, वंगभंग आंदोलनाचे महाराष्ट्राचे नेतृत्व करीत होते, शिवजयंती – गणेशोत्सव याद्वारे जनतेला राष्ट्रीय चळवळीस जोडून घेत होते, त्याचवेळी केसरी आणि मराठा यातील लेखाद्वारे राष्ट्रीय चळवळीस बळकटी प्रदान करीत होते. मृत्यूनंतरही शंभर वर्षांनी प्रासंगिक राहणे यातच लोकमान्यांचे कर्तृत्व लक्षात येते, असेही ते म्हणाले.

 

महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, पं. मदनमोहन मालवीय आणि अरविंदो यांच्यावर लोकमान्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव असल्याचे शाह यांनी सांगितले. लोकमान्यांनी स्वदेशच्या विचारास राष्ट्रीय अधिष्ठान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि न्यू इंडिया या संकल्पनांचा पाया लोकमान्यांच्या विचारातच आहे. त्यामुळे देशातील तरुण पिढीने लोकमान्यांच्या कार्याचा सखोलपणे अभ्यास करणे अतिशय़ गरजेचे आहे, असेही शाह यांनी नमूद केले.

 

शिवरायांच्या स्वराज्याच्या संस्कारास जनतेपर्यंत पोहोचविले

लोकमान्य टिळकांनी भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे भान निर्माण करून त्यांना राष्ट्रीय चळवळीशी जोडून घेतले. त्यासाठी त्यांनी शिवजयंतीस राष्ट्रीय स्वरूप दिले, जनतेच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्याचा संस्कार खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे मोठे कार्य लोकमान्यांनी केले, असे अमित शाह यांनी सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.