सुशांत केस : बिहार पोलिसांना तपासात मुंबई पोलिसांकडून निर्माण होतोय अडथळा!

    दिनांक  01-Aug-2020 15:57:33
|
Bihar_1  H x W:


सुशांत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडेच सोपवावे; बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची मागणी 

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासादरम्यान मुंबई पोलिस बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप भाजप नेते, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने हे प्रकरण ताब्यात घेण्याचे आवाहन केले.


"सुशांत मृत्यू प्रकरणात बिहार पोलिसांकडून निष्पक्ष तपासणीसाठी मुंबई पोलिस अडथळा आणत आहेत. बिहार पोलिस प्रयत्न करत आहेत पण मुंबई पोलिस सहकार्य करत नाहीत. त्यामुळे हे प्रकरण आता सीबीआयने प्रकरण ताब्यात घ्यावे," सुशील कुमार मोदी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी मुलाच्या आत्महत्येप्रकरणी पाटण्यात एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरनंतर बिहार पोलिसांची टीम तपासासाठी मुंबईला आली आहे. मुंबई पोलिस आमच्या पथकाला सहकार्य करत नसल्याचे बिहार पोलिस अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. तसेच तपासासाठी कुठले वाहन दिले जात नसून बिहार पोलिस रिक्षा अथवा टॅक्सीने प्रवास करत आहेत.


सुशांत प्रकरणी बिहारहून पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले. मात्र मुंबई पोलिसांनी या पथकाला नियम दाखवत मुंबईत तपासाआधी स्थानिक समन्वयक अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच याची खबरदारी घेण्याची समज दिली. बिहार पोलीस मुंबई पोलिसांचे समन्वयक अधिकारी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना भेटायला आले. त्यावेळी बिहार पोलिसांना अनेक तास ताटकळत बसवण्यात आले. त्यानंतर त्यांना माध्यमांशी देखील बोलू देण्यात आले नाही. माध्यमांच्या गराड्यातून काढताना त्यांना धक्काबुक्की झाल्याचाही आरोप होत आहे.


भाजपा नेते सय्यद शेहनवाज हुसैन यांनी देखील पोलिसदलच्या या धक्काबुक्कीचा प्रकार चुकीचा असल्याचे म्हणत त्याचा निषेध केला. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माफी मागावी असेही त्यांनी म्हंटले आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.