संस्कृत : समृद्ध अडगळ की चिरंतन राष्ट्रीय ठेवा?

    दिनांक  01-Aug-2020 23:20:31
|


Sanskrit_1  H x

 


दि. ३ ऑगस्ट. श्रावण पौर्णिमा. दरवर्षी हा दिवस ‘संस्कृत दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने संस्कृत भाषेचे महत्त्व, मराठी भाषेतील योगदान आणि वर्तमानातील समृद्ध संस्कृत भाषेची व्याप्ती याचा ऊहापोह करणारा हा लेख...लेखक भालचंद्र नेमाडे यांनी ‘हिंदू’ या आपल्या कादंबरीसाठी ‘एक समृद्ध अडगळ’ असे उपशीर्षक योजिले. जे जे काही जुने, त्यासाठी ‘एक समृद्ध अडगळ’ असा शब्दप्रयोग केला जाऊ लागला. ती ‘अडगळ’ आहे, हे मान्यही करायचे आणि ‘समृद्ध’ आहे म्हणून टाकवतही नाही, असा पवित्रा घ्यायचा, असा दुहेरी डाव या शब्दप्रयोगामध्ये आहे. हा शब्दप्रयोग संस्कृत भाषेसाठी करणे मात्र मला सर्वथैव अनुचित आहे, असे वाटते. संस्कृत ही ‘समृद्ध अडगळ’ वगैरे काही नसून ती ‘चिरंतन राष्ट्रीय ठेवा’ आहे.

 
‘भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती’ असा संस्कृत भाषेचा लौकिक आहे. हा लौकिक भारतीय पातळीवर मान्यता पावलेला होताच, पण एका ऐतिहासिक घटनेतून या लौकिकाला जागतिक पातळीवरील मान्यता मिळाली. याच घटनेत भाषाकुलाची संकल्पनाही विकसित झाली. जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ सर विल्यम जोन्स यांनी २४० वर्षांपूर्वी कोलकात्याला एक युगप्रवर्तक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी म्हटले, “संस्कृत भाषेची प्राचीनता काय असेल ती असो. तिची घटना आश्चर्यकारक आहे. ग्रीक भाषेहून बांधेसूद, लॅटिनहून समृद्ध आणि या दोहोंहून प्रौढ आणि परिष्कृत आणि तरीही, क्रियापदांचे धातू आणि व्याकरणाची रुपे यांच्या दृष्टीने पाहता केवळ योगायोगाने संभवणार नाही, इतकी या दोन्ही भाषांशी संस्कृतची जवळीक दिसते. ही जवळीक इतकी दृढ आहे की, या तिन्ही भाषांचे परीक्षण करताना, भाषाशास्त्राज्ञांना या भाषा कोणत्या तरी एकाच उगमातून अवतरल्या आहेत, असे मानण्यावाचून गत्यंतरच राहत नाही.या भाषणातूनच नंतर इंडो-युरोपियन भाषाकुलांचा विचार विकसित झाला.
 
आज सगळे जग एक होऊ पाहण्याच्या प्रयत्नात असताना, संस्कृत ही किती जागतिक स्तरावरची, प्राचीन आणि महत्त्वपूर्ण भाषा असू शकते, याचा अंदाज सर विल्यम जोन्स यांच्या या भाषणावरुन आजही करता येतो. होय, विद्वानांनी गौरविलेली तीच ही देववाणी संस्कृत भाषा. आम्हा भारतीयांच्या तर रक्तातून वाहणारी. अनेक भारतीय भाषांची जननी!
 
‘भारत’ हे आपल्या देशाचे अधिकृत नाव संस्कृत आहे. ‘सत्यमेव जयते’ हे आपले बोध वचन संस्कृतात आहे. ‘जनगणमन’हे राष्ट्रगीत नव्वद टक्के संस्कृत आहे. ‘वंदे मातरम्’ हे प्रेरणागीत मणिप्रवाळ शैलीतील संस्कृत आहे. आपली लोकसभा आकाशवाणी, भारतीय नौदल, भारतीय वायुदल, आयुर्विमा महामंडळ, महाराष्ट्र शासन, मुंबई-पुणे, नागपूर- शिवाजी इत्यादी विद्यापीठे यांची बोधवाक्ये संस्कृतमध्ये आहेत. संस्कृत भाषेने या देशाला सांस्कृतिक आधार दिलेला आहे. संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा असावी, असे मत व्यक्त करणार्‍यांमध्ये श्रीप्रकाश, डॉ. सी. व्ही. रमण, डॉ. बाळकृष्ण केसरकर, कृष्णम्माचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता, हे अभिमानाने सांगायला हवे. संस्कृत भाषा आणि वाड्.मय ही भारताची सर्वात मोलाची दौलत आहे, असे पंडित जवाहरलाल नेहरुही म्हणत असत. आजही ‘हिंदी’ ही राष्ट्रभाषा मानावी का, याविषयी वाद होतात. पण, हा वाद संस्कृतविषयी नाही. तेलुगू, कन्नड, तामिळ व मल्याळम या द्रवीड भाषा बोलणार्‍यांचा हिंदीला विरोध असतो, पण संस्कृतला नाही. मल्याळम भाषेची तर संस्कृतशी विशेष जवळीक आहे. संस्कृत भाषेने भारताला एकराष्ट्रीयत्व प्रदान केलेले आहे.
 
संस्कृत साहित्याचे दोन भाग होतात - वैदिक साहित्य आणि अभिजात संस्कृत साहित्य. या दोहोंमधील विभाजनरेषा स्थूलमानाने पाणिनीय व्याकरणाने ठरते. वैदिक वाड्.मय मौखिक परंपरेने, कंठस्थ करुन हजारो वर्षे जीवंत राखले गेले, हे जागतिक विद्याक्षेत्रातील आश्चर्य मानले जाते. वेद हे ईश्वराचे नि:श्वास आहेत, अशी परंपरागत श्रद्धा आहे आणि या श्रद्धेमुळेच हे आश्चर्य घडले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे हा वैदिक साहित्याचा भाग होय. रामायण आणि महाभारत ही ऋषींनी रचलेली महाकाव्ये आहेत. आर्ष महाकाव्ये आणि पुराणे ही वैदिक व अभिजात साहित्याच्या सीमारेषेवरील निर्मिती आहे.


अभिजात संस्कृत साहित्याच्या निर्मात्यांपैकी पहिला कवी अश्वघोष होय. त्याने ‘बुद्धचरित’ हे महाकाव्य लिहिले. नंतर भास-कालिदास-भवभूती-भारवी-माघ-श्रीहर्ष-शूद्रक-विशाखादत्त-भट्ट-नारायण - बाणभट्ट-दण्डी या सर्वांनी संस्कृत साहित्याचा एक हजार वर्षांचा सुवर्णकाळ सजवला. कवी जयदेवाने बाराव्या शतकात ‘गीतगोविंद’ लिहिले आणि जणू संस्कृत भाषेचे वैभव दर्शविले. दरम्यानच्या काळात मुक्तक काव्याचा कालखंड आला. भर्तृहरीच्या ‘शतकत्रयी’पासून ही परंपरा सुरु झाली आणि अनेक शतकं टिकली. या मुक्तक काव्यांमधून अनेक सुभाषितांनी जन्म घेतला. अनेक सरस्वतीपुत्रांनी संस्कृत भाषेला तरुण ठेवले आणि त्यांनी संस्कृतला चिरंतन महत्ता प्राप्त करून दिली आहे.

 
आजही संस्कृतमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती होत आहे. पं. सत्यव्रतशास्त्रींना संस्कृत साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार’ लाभलेला आहे. ‘आदि शंकराचार्यया जी. व्ही. अय्यरकृत संस्कृत चित्रपटाला राष्ट्रीय सन्मान मिळालेला आहे. विशेष अभिमानाची बाब अशी की, मराठी मातृभाषा असलेल्या अनेक विद्वानांनी संस्कृत भाषेत लक्षणीय साहित्यनिर्मिती केलेली आहे.
 
‘तिलकयशोऽर्णव’ हे लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्रविषयीचे त्रिखंडात्मक महाकाव्य माधव श्रीहरी अणे यांनी लिहिले. महाकवी पं. वसंत त्र्यंबक शेवडे यांनी ‘विन्धवासिनीविजयम्’ हे महाकाव्य लिहिले. ज्ञानेश्वरीचा संस्कृत अनुवाद खासनीस महोदय यांनी केला. सावरकरांच्या निवडक कवितांचा अनुवाद ‘अग्निजा’ या शीर्षकाने पळसुलेशास्त्री यांनी केला. भारताच्या संविधानाचाही संस्कृत अनुवाद ‘भारतस्य संविधानम’ उपलब्ध आहे. विनोद, विडंबन, उपहास करणारे लेखनही संस्कृतमध्ये होत असते. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी ‘कण्टकार्जुन’ या टोपणनावाने लिहिलेली ‘कण्टकाज्जलि:’ हा विडंबनपर मुक्तककवितांचा संग्रह तर विशेषच उल्लेखनीय आहे.
 
सामान्य वाचाकांसाठीची नियतकालिकेही संस्कृतमधून प्रसिद्ध होतात. ‘सम्भाषण-सन्देश:’ हे असे महत्त्वाचे नियतकालिक आहे. ‘चन्दमामा’ हे ‘चांदोबा’चे संस्कृत संस्करणही बालकांना आवडेल असे असते. आधुनिक काळ आणि संस्कृत यांना जोडणारे हे पूल आहेत.
 
काहींना वाटते की, संस्कृत भाषा संपली. त्यांना सांगायला हवे की, अमेरिकन संसदेचे एक अधिवेशन वेदांमधील संस्कृत प्रार्थनेने सुरु होते.आजही घराघरातील मुलामुलींची नावे संस्कृत ठेवण्याकडे लोकांचा कल असतो. संस्कृत संपली तर हे घडले असते? ती अडगळ असती तर सन्मानपूर्वक घराघरात स्थिरावली असती का?
 
दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरुन सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी संस्कृत बातमीपत्र रोज प्रसारित होते. संस्कृत माध्यमाची शिशु-शाळा (माँटेसरी) दादर येथील एक दंतवैद्य विदुषी डॉ. उज्ज्वला थत्ते चालवतात. संस्कृतला ‘राष्ट्रीय ठेवा’ म्हणून जपणारे असे हे अनेक प्रयत्न आहेत.
 
भाषाजननी असलेल्या संस्कृतने सर्वच भारतीय भाषांना समृद्ध केले आहे. शिवाजी महाराजांनी जेव्हा मराठी राज्यव्यवहार कोश निर्माण केला, तेव्हा तत्कालीन भाषातज्ज्ञांनी सुचविलेले अनेक प्रतिशब्द संस्कृत होते. शिवाजी महराजांची राजमुद्रा प्रतिपश्चन्द्ररेखेव वधिष्णुर्विश्ववन्दिता। शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजतेया संस्कृत वाक्याने अंकित होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा प्रचलित इंग्रजी शब्दांसाठी प्रतिशब्द सुचविले, तेव्हा त्यांनी संस्कृतचाच आधार घेतला. ‘यष्टिरक्षण’, ‘क्षेत्ररक्षण’ हे शब्द वीर सावरकरांनी सुचविलेले आहेत, हेच कित्येकदा आपल्याला माहीत नसते. भाषाशुद्धीसाठी मराठीला आधार दिला तो संस्कृतनेच!
 
संस्कृतचे शब्दभांडार विलक्षण समृद्ध आहे. शब्दांना अनेक अर्थवलये देण्याची क्षमता संस्कृतमध्ये आहे. ‘आपटेज डिक्शनरी’ या संस्कृत-इंग्रजी कोशातला ‘अग्नि’ हा शब्द उदाहरणादाखल काढून पाहावा. एकट्या ‘अग्नि’ शब्दाच्या शेकडो अर्थछटा या कोशात दिलेल्या आहेत. डॉ. रामकृष्णपंत भांडारकर, वामन शिवराम आपटे, म. म. वासुदेवशास्त्री मिराशी यांनी संस्कृतसाठी घेतलेले कष्ट आपण पाहिले की, आपण नतमस्तक होतो.
 
आजही संस्कृतचे महत्त्व अबाधित आहे. संस्कृतच्या अभ्यासाने उच्चारणशुद्धता येते, असे अनेक भाषापंडितांनी मान्य केलेले आहे. थोर गायिका आशा भोसले जाहीरपणे सांगतात की, “वडिलांनी लहानपणी आम्हाला संस्कृतचे धडे दिले आणि त्यामुळेच आम्ही भावंडे विविध भाषांमधील गीते गाऊ शकलो.” संस्कृत ही अशी संजीवक भाषा आहे. नवनवोन्मेषशालिनी. चिरंजीविनी.
 
आमच्या घरी आलेले एक संस्कृतचे अभ्यासक एकदा म्हणाले होते की, “तरुणपणी एकदा कालिदासाचे ‘मेघदूत’ आणि जयदेवाचे ‘गीतगोविंद’ वाचा आणि नंतर जोपर्यंत ही काव्ये तुम्हाला आवडत आहेत, तोवर स्वत:ला तरुणच समजा. रसिकाला चिरतरुण राखणारी ही मधुर काव्ये आणि ती ज्या भाषेत आहेत, अशी देववाणी संस्कृत!” ‘समृद्ध अडगळ’ वगैरे काही नाही. संस्कृत भाषा राष्ट्राचे आनंदनिधान आहे.
 

- वसुमती करंदीकर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.