लोकमान्यांचे पुण्यस्मरण

    दिनांक  01-Aug-2020 23:15:05
|


Lokmanya Tilak_1 &nbराजकारणातील त्यांची खंबीर व कठोर भूमिका आजतागायत कोणीही विसरले नाही. किंबहुना, ती विसरणेही शक्य नाही. लोकमान्य टिळक म्हणजेच देश बंधनात कोंडलेला एक सावळा प्रमाथी मेघच जणू. कविकुलगुरू कालिदासाने मेघदूतात त्यासंबंधी ‘धुमज्योती सलीलमरूता संनिपतः’ असे अत्यंत समर्पकपणे म्हटले आहे. विद्युल्लतेच्या लोळाचा झगझगाट लोकमान्यांच्या तेजस्वी डोळ्यात होता. कोणतेही काम हातात घेतल्यावर ते पूर्णत्वास नेल्याशिवाय ते राहत नसत. मग ती ‘सुरत काँग्रेस’ असो ‘लखनौ काँग्रेस’ असो ‘सोलापूर काँग्रेस’ असो किंवा इतर कार्ये असोत.१ ऑगस्ट. लोकमान्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस. वास्तविक त्यांचे निधन ३१ जुलै रोजी रात्री १२च्या पुढे झाले म्हणून १ ऑगस्ट हा दिवस मानतात. लोकमान्यांचे निधन सरदारगृहात झाले. ते अत्यवस्थ असताना दादासाहेब खापर्डे व इतर कार्यकर्ते तेथे होतेच. त्याआधी दादासाहेब यांना तार आली. “ताबडतोब निघा.” ताबडतोब दादासाहेब निघाले. पण, जायच्या आधी राजराजेश्वर मंदिरात देवाला त्यांनी साकडे घातले. “देवा, तू आमच्या देवाला सांभाळ.” लोकमान्यांची व त्यांची भेट झाली. दादासाहेबांचे लोकमान्यांनी हात हातात घेतले व प्राण सोडले. त्या दिवशी धुवाँधार पाऊस कोसळत होता. पण, लोकमान्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी लोकांची अलोट गर्दी झाली होती.


इसवी सन १८९६ साली दुष्काळ पडला. या दुष्काळात त्यांनी जीवापाड कष्ट घेतले. फंड गोळा केला. ‘केसरी’तून लेख लिहिले व सर्वतोपरी लोकांना मदत केली. दुष्काळ संपताच दुसरे मोठे संकट आले. मुंबईस प्रथम प्लेगचा हल्ला झाला. त्यावेळीही लोकमान्यांनी खूप मेहनत घेतली व लोकांना धीर दिला. काही घरदार सोडून पुण्यास आले. त्यामुळे पुण्यातही प्लेगची साथ आली. जिवावर उदार होऊन अविरत झटले, त्यामुळे जनतेची साथ मिळाली. याच सुमारास २२ जून १८९७ मध्ये रॅण्डचा खून झाला. त्यामध्ये लोकमान्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण, ब्रिटिशांना दुरान्वयाने त्यांचा संबंध दाखविता आला नाही. दि. ३० एप्रिल १८९८ रोजी कलकत्त्यातील मिदनापूर येथे प्रचंड स्फोट झाला. केनेडी बाई ठार झाल्या. खुदीराम घोष आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. पण, दमनचक्र थांबेना. त्यावेळी लोकमान्यांनी ‘केसरी’त ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे,’ असा अग्रलेख लिहिला. ते लिहितात, “एखादा मोठा हत्ती पिसाळला यावर तो ज्याप्रमाणे वाटेल तशी धूळधाण करतो, तद्वत आमच्या सरकारची स्थिती झाली आहे.” या अग्रलेखाची झळ टिळकांना लागली व त्यांना दीड वर्ष कारावास भोगावा लागला. तरीही वेळोवेळी आपल्या ‘केसरी’तून सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न लोकमान्य टिळक अखेरपर्यंत करीत होते.


शस्त्र कारखान्यात लोकमान्यांचा हात असल्याचा संशय त्यांच्यावर घेतला गेला. पण, प्रयत्न करूनही लोकमान्य त्यांच्या तावडीत सापडले नाहीत. कारण, कलकत्ता काँग्रेस व सुरत काँग्रेसच्या प्रसंगी लोकमान्यांचा दणका त्यांनी पाहिला होता. त्यामुळे लोकमान्यांच्या शिक्षेत ढवळाढवळ केली, तर मी राजीनामा देईन,” असे क्लार्कने लॉर्ड मोर्ले यांना सांगितले होते. तरीही कसेही करून लोकमान्यांना अडकविले पाहिजेच, या कुटील बुद्धीने त्यांच्यावर शिवाजी उत्सवातील व्याख्याने ‘केसरी’त प्रसिद्ध केल्याबद्दल ‘१२४-अ’ या कलमाखाली राजद्रोहाचा खटला टिळकांवर भरण्यात आला. वड्याचे तेल वांग्यावर काढले. त्यांच्या सुटकेसाठी दादासाहेबांनी अपरंपार कष्ट घेतले व त्यांची सुटका झाल्यावर त्यांच्या स्वागतार्थ व अभिनंदनार्थ सार्वजनिक सभा घेतली. तो समारंभ अतिशय अभूतपूर्व ठरला. मुंगीला शिरायला सुद्धा जागा मिळणार नाही, अशी अलोट गर्दी झाली. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.


राजकारणातील त्यांची खंबीर व कठोर भूमिका आजतागायत कोणीही विसरले नाही. किंबहुना, ती विसरणेही शक्य नाही. लोकमान्य टिळक म्हणजेच देश बंधनात कोंडलेला एक सावळा प्रमाथी मेघच जणू. कविकुलगुरू कालिदासाने मेघदूतात त्यासंबंधी ‘धुमज्योती सलीलमरूता संनिपतः’ असे अत्यंत समर्पकपणे म्हटले आहे. विद्युल्लतेच्या लोळाचा झगझगाट लोकमान्यांच्या तेजस्वी डोळ्यात होता. कोणतेही काम हातात घेतल्यावर ते पूर्णत्वास नेल्याशिवाय ते राहत नसत. मग ती ‘सुरत काँग्रेस’ असो ‘लखनौ काँग्रेस’ असो ‘सोलापूर काँग्रेस’ असो किंवा इतर कार्ये असोत.


लोकमान्य टिळकांचे ‘होमरूल लीग’ डेप्युटेशन व लंडनमधील कार्य


फ्रान्समध्ये शांतता परिषद भरली होती. स्वयंनिर्णयाचे तत्व भारतात लागू केले जावे, यासाठी परिषदेत प्रवेश मिळावा म्हणून लोकमान्यांनी नेटाने प्रयत्न केले. भारतासंबंधी वास्तविक कोणताच विचार या परिषदेपुढे नव्हता. हा विचार लोकमान्यांनी मांडला. लॉर्ड जॉर्ज पंतप्रधान यांच्या सूचनेप्रमाणे वसाहतीच्या राज्यांना परिषदेसाठी दोन प्रतिनिधी पाठवण्याचा भारतालाही हक्क मिळाला होता, पण लोकमान्य एवढ्यावर खूश नव्हते. कारण, ते दोन प्रतिनिधी सरकार नियुक्त असावेत, अशी अट होती. लोकप्रिय दोन पुढारी प्रतिनिधी म्हणून असावेत, असा लोकमान्यांचा आग्रह होता. त्याप्रमाणे ब्रिटिश काँग्रेस कमिटीच्या अनेक सदस्यांना भेटून त्यांना हिंदुस्तानच्या स्वयंनिर्णयासाठी पत्रके देण्याचा सपाटा सुरू केला. पण, ब्रिटिश काँग्रेस कमिटी मौन बाळगून होती म्हणून टिळकांनी भारतातील कार्यकर्त्यांना सुचविले की, येथील काँग्रेसने ब्रिटिशांवर दडपण आणावे. फंड पाठविणे बंद करावे. अखेर भारताचे दोन प्रतिनिधी बोलावण्यास संमती मिळाली. अशी अनेक कितीतरी कष्टप्रद कामे या महामानवाने तडीस नेली. लोकमान्यांचा स्वभाव कठोर होता, हे खरे असले तरी ते काहीवेळा कोमल स्वभावाचे होते हे अधिक खरे!


नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी त्यांचे निकराचे भांडण होते. पण, त्यांचा मृत्युलेख लिहिताना त्यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. वज्रकठोर व नवनीत असा हा सावळा मेघ टिळक नावाच्या झंझावातचा वादळीपणा व सोसाटा यांचा पूर्ण प्रत्यय ब्रिटिश साम्राज्यालाच अधिक अनुभवास आला. १८५७चा स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्न फसल्यानंतरही देशात तद्विषयक तृष्णा तितक्याच तीव्रतेने नांदत होती. पण, सर्वसामान्य जनता मृतप्राय झाली होती. त्यामुळे गुप्त कारस्थाने चालूच होती. सर्वसामान्य जनतेत जागृती करण्याची निकड होती व ही निकड लोकमान्यांच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांची निवड नियतीने केली असावी.


साधारण १९२० साल असावे. सोलापूरची कॉन्फरन्स ही त्यांची अखेरची असावी. या कॉन्फरन्सला लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, डॉक्टर सावरकर, पटेल, डॉक्टर साठे, डॉक्टर वेलकर इत्यादी बरेच मंडळी रायचूर मेलने रवाना झाली व २ एप्रिलला सोलापूरला पोहोचली. खूप मोठी मिरवणूक निघाली न. चि. केळकर या कॉन्फरन्सचे अध्यक्ष होते. नेमस्तांनी सभेत विघ्न आणण्याचे प्रयत्न केले, पण वेळेवर उपाययोजना झाल्यामुळे अनर्थ टळला. समारोपाचे भाषण लोकमान्यांचे झाले, पण त्याआधी दादासाहेब खापर्डे यांचे भाषण झाले. ते फारच गाजले. यानंतर लोकमान्यांची प्रकृती खालावतच गेली. अखेर ३१ जुलै १९२० ला रात्री १२च्या पुढे ते ब्रह्मपदी लीन झाले. अशा या प्रचंड कीर्तीरूपी महासागराच्या चरित्रातून दोन-चार बिंदू घेण्याचा प्रयत्न मी केला. अशा झंझावताचे चरित्र किंवा आठवणी दुरापास्तच आहेत. अशा या झंझावाताला अत्यंत विनम्रतेने माझे कोटी कोटी प्रणाम...
 

- सुमन खापर्डे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.