नसती हास्यास्पद तारांबळ

01 Aug 2020 20:30:06


Narendra Modi Rahul Gandh


बरखा दत्त वा तिच्यासारख्या अनेक पत्रकारांचे सर्व भवितव्य काँग्रेस पक्षाशी निगडित आहे? आणि अन्य कुठल्या पक्षाने त्याचे स्थान घेतले, तर आपले भवितव्य बुडीत जाण्याच्या भयाने या लोकांना पछाडले आहे? नसेल तर काँग्रेस वा राहुल गांधींना निर्वाणीचा इशारा देण्यामागचे अन्य कारण काय असू शकते?
 

 

राजस्थानच्या निमित्ताने जितकी काँग्रेस चिंतीत झालेली नाही, त्यापेक्षा अधिक पुरोगामी पत्रकारांना धडकी भरलेली आहे. गेल्याच आठवड्यात टेलिव्हिजन जमान्यात कायम झळकत राहिलेली महिला पत्रकार संपादक बरखा दत्त हिचा एक लेख ‘हिंदुस्तान टाईम्स’ दैनिकात प्रसिद्ध झाला. त्यातून तिने थेट राहुल गांधींना निर्वाणीचा इशारा दिलेला आहे. एकतर पुढे येऊन काँग्रेसचे अध्यक्षपद पुन्हा स्वीकारावे किंवा ठामपणे बाजूला होऊन कुणा अन्य नेत्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचा मार्ग मोकळा करावा. राजकीय विश्लेषण करताना पत्रकाराने इतके कुठल्या पक्षाविषयी अस्वस्थ वा चिंताक्रांत होण्याचे काय कारण आहे? काँग्रेस पक्ष लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकीत जवळपास नामशेष झाला आहे आणि त्याच्या नादाला लागल्याने उर्वरित पुरोगामी वा विरोधी पक्षांची सुद्धा धुळधाण उडालेली आहे. त्याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना एकहाती द्यावेच लागेल. त्यातून काँग्रेस पक्षालाच सावरण्याची इच्छा नसेल, तर अन्य कुणाला तरी पुढाकार घेऊन भाजपला पर्याय उभा करावा लागेल. पण, काँग्रेस पक्षच विरोधात उभा राहिला पाहिजे, असा हट्ट कशाला? की बरखा दत्त वा तिच्यासारख्या अनेक पत्रकारांचे सर्व भवितव्य काँग्रेस पक्षाशी निगडित आहे? आणि अन्य कुठल्या पक्षाने त्याचे स्थान घेतले, तर आपले भवितव्य बुडीत जाण्याच्या भयाने या लोकांना पछाडले आहे? नसेल तर काँग्रेस वा राहुल गांधींना निर्वाणीचा इशारा देण्यामागचे अन्य कारण काय असू शकते? सचिन पायलट वा ज्योतिरादित्य सिंधिया अशा तरूण पिढीच्या नेत्यांनीही पक्षविरोधी पाऊल उचलताना तसा इशारा कधी दिला नाही. मग अशा पुरोगामी पत्रकारांची घालमेल कशासाठी चालू आहे? की त्यांचे पुरोगामित्व केवळ काँग्रेसमध्ये त्यांच्या गुंतलेल्या हितसंबंधांशीच निगडित आहे?

 


 
देशात जेव्हा काँग्रेस हाच सर्वव्यापी पक्ष होता आणि त्याला कोणीही राजकीय पर्याय नव्हता, तेव्हाही पत्रकारिता चालू होती आणि असा आग्रह कोणी धरल्याचे ऐकीवात नाही. काँग्रेस विरोधात अनेक वर्षे विविध विचारधारांचे पक्ष एकत्र येत राहिले. आघाड्या करून काँग्रेसला पराभूत करण्याचे मनसुबे रचत राहिले. पण, पत्रकार कधी पर्यायाच्या चिंतेने घायकुतीला आल्याचे बघायला मिळाले नव्हते. हा प्रकार १९९६ सालात प्रथमच भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यानंतर सुरू झाला. भाजपला बहुमत तेव्हा किंवा २०१४ पर्यंत मिळू शकलेले नव्हते. पण, त्याला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी धडपडणारी पत्रकारिता त्यानंतरच्या काळात उदयास आली. पण, तिनेच ‘नरेंद्र मोदी’ हा नवा पर्याय उभा करून दिला, ही वस्तुस्थिती आहे. पण, केवळ एका गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केल्याने नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत किंवा भाजप बहुमतापर्यंत पोहोचलेला नाही. त्यासाठी त्या पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व त्यांचा पाठीराखा असलेल्या रा. स्व. संघाने पद्धतशीरपणे दीर्घकाळ प्रयत्न केले होते आणि मेहनतही घेतलेली होती. १९६७ सालात विविध पक्षांच्या ‘संयुक्त विधायक दल’ अशा आघाडीचा प्रयोग काँग्रेसला पर्याय म्हणूनच सुरू झाला होता. १९७७ सालात त्याचेच रुपांतर ‘जनता पक्षा’त झाले. मात्र, अशा प्रत्येक प्रयत्नांत विविध पक्षांच्या नेत्यांचे अहंकार आडवे येऊन काँग्रेसला पर्याय उभा राहू शकला नाही, उलट त्यातून मतदाराचा मात्र भ्रमनिरास होत गेला. त्यामुळेच एक विचारधारा व एकच संघटना असलेला एक विरोधी पक्ष मेहनतीने उभा करण्याचा चंग भाजपच्या नेतृत्वाने बांधला. त्यातून आजचा भाजप काँग्रेसला पर्याय म्हणून उभा राहिलेला आहे. तो झटपट टू मिनिट्स नुडल’सारखा नाही.
 

 

त्यामागे योजना, मेहनत व भूमिका होती. त्याचे भान अशा पत्रकारांना अजून आलेले नाही. मुद्दा भाजपला पर्याय असावा असा आहे. तो पर्याय फक्त काँग्रेसच असला पाहिजे, असा हट्ट कामाचा नाही. तसे बघायला गेल्यास मतदारानेही तथाकथित पुरोगामी मानल्या जाणार्‍या पक्षांनाच काँग्रेसचा पर्याय म्हणून पुढे यायला मदत केलेली होती. जनता पक्ष, जनता दल हे पुरोगामी बाजूला झुकलेले पक्ष व संघटना होत्या. पण, त्यांना काँग्रेस पक्षाला पर्याय होण्यापेक्षा एकमेकांनाच पर्याय होण्याची घाई झालेली होती आणि त्यात मतदाराचा पूर्ण भ्रमनिरास होऊन गेला. त्यामुळे त्यापासून अलिप्त राहून निवडणुकीपुरती इतरांशी तडजोड करीत, आपले बळ वाढवणारा भाजप लोकांना विश्वासार्ह वाटत गेला. तोच काँग्रेसला पर्याय होऊ शकतो, अशी खात्री पटत गेली. त्यातूनच आजचा भाजप एकपक्षीय बहुमतापर्यंत पोहोचला आहे. त्या मतदाराने काँग्रेसला नाकारण्याआधी राजकारण पुरोगामीच वा सेक्युलर असावे, ही भूमिका नाकारलेली होती आणि म्हणूनच हिंदुत्वाचे कितीही शिक्के मारून भाजपला इथली माध्यमेही रोखू शकली नाहीत. पण, याचा अर्थ मतदाराचा कल वा कौल फक्त हिंदुत्वाला आहे, असेही नाही. त्याला उत्तम कारभार देऊ शकणारा सत्ताधारी पक्ष आणि त्याला कामासाठी धारेवर धरणारा भक्कम विरोधी पक्ष हवा आहे. तो पुरोगामी वा काँग्रेसच असला पाहिजे, असा हट्ट बिलकुल नाही. म्हणून हे पुरोगामी पत्रकार आपल्याच जाळ्यात फसलेले आहेत. त्यांनी उद्ध्वस्त काँग्रेसचा जीर्णोद्धार करण्याचा हव्यास सोडून अन्य कुठल्याही पुरोगामी पक्षाला देशव्यापी पर्याय म्हणून उभा करण्यासाठी थोडे कष्ट घेतले, तरी चांगला पर्यायी पक्ष अस्तित्वात येऊ शकेल. उदाहरणार्थ, जुन्या समाजवादी विचारसरणीचे वा उदारमतवादी म्हणवून घेणारे अनेक नेते व त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित झालेले प्रादेशिक पक्ष अर्धा डझन आहेत. त्यांच्या एकत्रीकरणानेही काँग्रेसपेक्षा चांगला पक्ष उभा करता येणे शक्य आहे.

 


 
खरे तर २०१४ पूर्वी तसा प्रयत्नही झाला होता. मुलायमसिंह यादव, लालू, देवेगौडा, इत्यादी नेते एकत्र आले आणि त्यांनी नव्याने ‘जनता दला’चे पुनर्वसन करण्याची भूमिका मांडलेली होती. त्याविषयी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुलायमना दिलेले होते. पण, त्यावेळी त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेत होता आणि तोच त्या भूमिकेतला सर्वात मोठा राजकीय गट होता. त्यात अन्य कोणी भागीदार नको, या संकुचित विचाराने मुलायम टाळाटाळ करीत राहिले आणि तो विषय तिथेच गतप्राण होऊन गेला ; अन्यथा निदान पाच-सहा राज्यांत ज्याची चांगली शक्ती संघटना आहे, असा तिसरा देशव्यापी पक्ष आकाराला येऊ शकला असता. आज काँग्रेसपेक्षा तोच भाजपला पर्याय होऊ शकेल, अशी राजकीय शक्ती ठरली असती. किंबहुना, आजही तशी शक्यता जरूर आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१४ मध्ये ३१ टक्के व २०१९ सालात ३७ टक्केच मते मिळवलेली आहेत. भाजपच्या आघाडीला मिळालेली मते ४३ टक्के व ४७ टक्के इतकी आहेत. म्हणजेच बाकी ५७ किंवा ५३ टक्के मते विरोधातच आहेत वा होती. त्यांना एकत्र करण्याच्या प्रक्रियेने भाजपला व मोदींना पर्याय उभा राहू शकतो. पण, त्यासाठी कष्ट करावे लागतात. लेख लिहून वा सेमिनार भरवून पुख्खा झोडल्याने राजकीय पर्याय उभे राहात नाहीत. साहजिकच मग उपलब्ध असलेला जवळचा पर्याय म्हणून काँग्रेसकडे वळावे लागते. एकगठ्ठा १५-१६ टक्के मते काँग्रेस आजही मिळवते, म्हणून अशा पुरोगाम्यांना तोच एकमात्र पर्याय आहे असे वाटते. काँग्रेसही त्यांना गाजर दाखवून भुलवित असते. पण, जितके हे पुरोगामी पत्रकार विचारवंत आयतोबा आहेत, तितकेच काँग्रेस नेतेही आयत्या बिळावर नागोबा व्हायला उतावळे असल्यावर पर्याय कुठून उभा राहायचा? मग त्याचाच त्रागा होऊन कधी राहुल तर कधी सोनियांना इशारे देण्याचा खुळेपणा चालू असतो.

 

 
 
Powered By Sangraha 9.0