सिंधबद्दलही काही बोला!

    दिनांक  01-Aug-2020 00:08:12   
|


Sindh Protest_1 &nbsपाकिस्तानच्या सिंध प्रांतातून शेकडो नेते, कार्यकर्ते, विचारवंत बुद्धिवाद्यांचे अपहरण पाकिस्तान सेनेने, आयएसआयने केले आहे, असे म्हणत सिंध प्रांतात सध्या पाकिस्तानी सरकार, सेना आणि आयाएसआयविरोधात आंदोलन सुरू आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीरचा फुटीरतावादी-दहशतवादी नेता सय्यद अली शाह गिलानीला पाकिस्तानने सर्वोच्च सन्मान ‘निशान-ए-पाकिस्तान’ द्यायचे ठरवले आहे. तसेच पाकिस्तान विद्यापीठाच्या एका महाविद्यालयाला ‘गिलानी इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इमर्जिंग टेक्नॉलॉजी कॉलेज’ असे नाव द्यायचेही ठरवले आहे. थोडक्यात, पाकिस्तान भारतावर आतून बाहेरून जळतच आहे. असो, पाकिस्तनच्या सिंध प्रांतात नुकतीच सरकारविरोधातरॅली काढली गेली. या रॅलीतले लोक म्हणत होते, “नवाब महर, असलम मेहारी, एजाज गाहो व हाफिज पीरजाद हे सगळे लोक कुठे आहेत?” त्यांचे अपहरण पाक सेनेने आणि ‘आयएसआय’ने केले आहे. कारण, सगळे लोक पाकिस्तानी सरकारने सिंध प्रांतावर, त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराबद्दल प्रश्न विचार होते. यावर जर्मनीमध्ये निर्वासित जगणे जगणारे ‘जेएसएमएम’ या संघटनेचे अध्यक्ष शफी बर्फत या आंदोलनाबाबत सांगतात की, “ही रॅली, हे आंदोलन पाकिस्तानी सेना आणि ‘आयएसआय’द्वारा अपहरण केलेल्यालोकांच्या सुरक्षित सुटकेसाठी आयोजित केलेली आहे. दुर्दैव आहे सिंध प्रांतातील लोकांचे की, त्यांना त्यांच्याच सरकार आणि सेनेविरोधात रस्त्यावर उतरावे लागत आहे.”
 
 
त्या त्या देशाच्या सरकारच्या हातात प्रशासनाची सर्वच सूत्र असतात. त्यातही पाकिस्तानसारख्या नीतिमत्तेच्या बाबतीत रसातळाला गेलेल्या देशातील सत्ताधीश तर आपल्याविरोधातील छोटासाही सूर चिरडायला काहीही करू शकेल, हे उघड सत्य आहे. सध्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हेच सुरू आहे. हेच पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्येही सुरू आहे. सिंध, बलुचिस्तान केवळ नकाशावर पाकिस्तानमध्ये आहेत. तेथील घटनांचा आढावा घेतला तर जाणवते की, सिंध आणि बलुचिस्तानचा आत्मा कधीही पाकिस्तानशी एकरूप झाला नाही. पाकिस्तानच्या कृत्रिम वातावरणात सिंध आणि बलुचिस्तानने आपली सांस्कृतिक ओळख कायमच वेगळी ठेवली. उर्वरित पाकिस्तानने जनतेवर दडपशाही लादली की, त्यांचा इतिहास १९४७ पासून सुरू होतो. त्याआधीचा भारतीय इतिहास आणि मुस्लीम आक्रमणापूर्वीचा इतिहास पाकिस्तान सांगतच नाही. मात्र, भारतीय संस्कृतीशी जोडलेला हा इतिहास सिंध आणि बलुचिस्तानने कायमच स्मरणात ठेवला आहे. त्यांनी आपला मूळ इतिहास कायम जपला आहे. नेमके हेच पाकिस्तानला खटकते आहे. कारण, १९७१ साली पाकिस्तानमधून बांगलादेशही संस्कृतीच्या नावावरच वेगळा झाला होता. याचे विस्मरण पाकिस्तानला होता होणारच नाही. त्यामुळेच सिंध आणि बलुचिस्तानचा सांस्कृतिकवाद पाकिस्तानी सैन्य चिरडण्याचा प्रयत्न करतो.
 


दुसरीकडे सिंधमधील आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, सिंध हा पाकिस्तानमध्ये कधीच मनापासून सामील झाला नाही आणि पाकिस्तानही सिंधवर नेहमी अन्याय करत आहे. देशातील बहुसंख्याकांच्या तुलनेत सिंधमध्ये असलेल्या अल्पसंख्याक सिंधी बांधवांना प्रगतीच्या संधी दिल्या जात नाहीत आणि सिंध प्रांतांचा विकासही सरकार मुद्दाम करत नाहीत. इतकेच नव्हे, तर सिंध प्रांतातले जे कोणी बुद्धिजीवी याविरोधात बोलले, तर त्यांचे अपहरण केले जाते. त्यांचे पुढे काय होते, कुणालाही थांगपत्ता लागत नाही. सिंध प्रांतातले अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी, पत्रकार असेच हरवले आहेत. अर्थात, ‘हरवले आहेत’ म्हणजे त्यांना पद्धतशीरपणे संपवले गेले आहे. त्यांचा क्रूरपणे जीव घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर चालणार्‍या या आंदोलकांचे म्हणणे आहे की, सिंध प्रांतातील लोक दहशतवादी आहेत आणि ही दहशत पाकिस्तानचे सरकार ‘आयएसआय’ला हाताशी धरून करत आहे. असो, काश्मीर मुद्द्यावरून नेहमीच आगपाखड करणारे आणि काश्मिरी दहशतवाद्यांचे समर्थन करणारे पाकिस्तान त्यांच्या देशातील सिंधबद्दल असा विचार करत नाही. तेव्हा का ते म्हणत नाही की, आझाद सिंध प्रांतच्या लोकांना स्वायत्ता द्या. तसेच आपल्या देशातीलही काही मंडळी अमेरिकेच्या घटनेचा आधार घेत इथे भारतात ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ म्हणत, आंदोलन करताना दिसली. अर्थात, न्याय-अन्यायाची चर्चा करायलाच हवी. पण, या मंडळींना सिंध प्रांतात होणारा पाकपुरस्कृत अत्याचार दिसत नाही का? मोठे मानवतावादी पुरोगामी असणारी मंडळी कुठे आहेत? सिंधबद्दलही काही बोला..

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.