स्मरण लोकमान्यांचे- निमित्त भाषांतर प्रकल्पाचे...

    दिनांक  01-Aug-2020 22:43:06
|


Lokmanya Tilak_1 &nb
टिळककालीन ‘केसरी’चे अंक चाळत असताना त्यांनी ज्या असंख्य विषयांचा परामर्श घेतला आहे, ते पाहून त्यांच्या व्यास-प्रतिभेची प्रचीती येते. सामाजिक प्रश्न, धर्म व संस्कृती, शिक्षण, राष्ट्रकेंद्री राजकारण, तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थ आणि उद्योग, वाङ् मयविमर्श, गौरव लेख, मृत्युलेख असा त्या अग्रलेखांचा व्यापक परीघ होता. सातत्याने केलेले चौफेर वाचन, अध्ययन, चिंतन, मनन आणि त्याद्वारे केलेला सखोल व्यासंग त्यांच्या सर्वच लेखनातून प्रत्ययास येतो. जो विषय अग्रलेखात ते मांडत, त्याचा सर्वांगीण व सर्वस्पर्शी धांडोळा ते घेत. त्यासाठी त्यांचा हा तप:पूत, चतुरस्र व व्यापक व्यासंग मदतीला येत असे. या त्यांच्या व्यासंगाला त्यांची निरपवाद ध्येयनिष्ठा, समर्पण वृत्ती, मूलगामी विचारपद्धती, जनमानसाची अचूक जाण आणि या प्रक्रियेतील चिंतनातून काढलेल्या निष्कर्षाबद्दल, वा केलेल्या प्रतिपादनाबद्दल आग्रह, याची ही जोड होती. त्यातील संदर्भ तत्कालीन असले तरी आवाहन मात्र सार्वकालिक आहे.


माझ्या आठवणीप्रमाणे, सन २०१३चा तो जून महिना असावा. माझ्या धाकट्या भावाची पत्नी प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक यांचा मला फोन आला. त्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्या मला म्हणाल्या, “अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीत भारतासंदर्भातील एका शोधप्रकल्पावर काम सुरु आहे. त्याचा संबंध लोकमान्य टिळकांच्या कालखंडाशी आहे. त्यासाठी त्यांना तत्कालीन ’केसरी’ तील काही अग्रलेखांचे व स्फुटांचे इंग्रजीत भाषांतर करून हवे आहे. हे काम ‘अ‍ॅकॅडमिक’ स्वरूपाचे आहे आणि हे काम तुम्ही चांगल्याप्रकारे करू शकाल, असे वाटल्यामुळे, ते तुम्ही कराल का, असे विचारण्यासाठी फोन केला. तुमची मान्यता व तयारी असेल, तर मी त्या विद्यापीठाच्या अधिकार्‍यांना तुमचा होकार कळवते. ते तुमच्याशी थेट संपर्क साधतील. विचार करून तुमचा निर्णय कळवा.” योगायोगाने तशाच आशयाचा फोन मला मुंबई विद्यापीठाच्या अधिकार्‍यांकडूनही आला.


 
खरे तर दोन कारणांनी मी द्विधा मनःस्थितीत होतो. एक तर एका ग्रंथलेखनाच्या प्रकल्पावर मी काम सुरु केले होते आणि दुसरे म्हणजे, लोकमान्यांचे एकोणिसाव्या शतकातील मराठीत लिहिलेले भारदस्त अग्रलेख भाषांतरित करायचे काम मला आव्हानात्मक वाटत होते. मुंबई विद्यापीठातील अधिकारी म्हणाले होते, “नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीच्या अधिकार्‍यांनी हे भाषांतर करून घेण्याचा प्रयत्न केला. पण, ते त्यांना समाधानकारक वाटले नाही. तुमचे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व असल्यामुळे तुम्ही या कामाला न्याय द्याल, असा विश्वास वाटतो.आता माझ्या समोर पर्यायच उरला नव्हता. मी होकार देऊन टाकला. यथावकाश त्या विद्यापीठातील या प्रकल्पाचे व इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रास बस्सेत यांनी माझ्याशी संपर्क साधला व शोधप्रकल्पाचे स्वरूप स्पष्ट केले. अमेरिकेतील ‘एमआयटी’ या अग्रगण्य शिक्षण संस्थेत एकोणिसाव्या शतकापासून ज्या भारतीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला व शिक्षण पूर्ण केले, त्यांचा इतिहास त्यांना लिहायचा होता. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यानंतर तेथील औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेत त्यांची काय भूमिका होती, एकोणिसाव्या शतकातील उत्तरार्धात तेथे जे औद्योगिकीकरण झाले, त्याचे स्वरूप कसे होते, त्यांना समाजाचे कसे सहकार्य झाले, हे त्यांना जाणून घ्यायचे होते. यासंदर्भात लोकमान्य टिळकांच्या ’केसरी’ची काय भूमिका होती, हेही त्यांना समजून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांना याविषयासंबंधीचे ‘केसरी’तील अग्रलेख व स्फुटांचे इंग्रजी भाषांतर करून हवे होते. त्यांच्याकडून कळलेल्या माहितीनुसार एमआयटीमध्ये दाखल झालेला पहिला विद्यार्थी पुण्याचा होता व तो १८८१ साली त्या शिक्षणसंस्थेत दाखल झाला होता. योगायोगाने लोकमान्य टिळकांनी ’केसरी’ ’मराठा’ या वृत्तपत्रांचा शुभारंभ केला ते सालही १८८१ हेच होते. पुढे प्रा. बस्सेत यांनी नमुन्यादाखल दोन अग्रलेखांच्या छायाप्रती मला पाठविल्या व भाषांतराचे काम सुरु करण्याची विनंती केली.
 


प्रा. बस्सेत यांनी पाठविलेल्या अग्रलेखांच्या छायाप्रती या काहीशा पुसट व अस्पष्ट होत्या. त्यामुळे मूळ प्रतींचा शोध घेणे आवश्यक होते. त्यादृष्टीने ‘केसरी’च्या अंकांचे सूक्ष्मचित्रीकरण (Micro-Filming) झाले आहे का आणि ते आपल्याकडे उपलब्ध आहे का, अशी चौकशी मी मुंबई व पुणे विद्यापीठांच्या ग्रंथालयात केली. तेव्हा त्याचे नकारार्थी उत्तर मला मिळाले. म्हणून मी पुण्याला ‘केसरी’ कार्यालयात चौकशी केली. सुदैवाने त्यांनी ती प्रक्रिया पूर्ण करून अगदी पहिल्या अंकापासूनचे अंक त्या आधुनिक पद्धतीने जतन करून ठेवले आहेत व अभ्यासक, संशोधकांसाठी ते उपलब्ध आहेत. त्यामुळे मी ’केसरी’ कार्यालयात आठवडाभर ठाण मांडून बसलो. शोध घेतल्यानंतर मला प्रा. बस्सेत यांना अभिप्रेत असणार्‍या विषयासंबंधीचे २० अग्रलेख व काही स्फुटे मिळाली. त्यांच्या छायाचित्रित प्रति घेऊन मी परत आलो. या संदर्भात मी प्रा. बस्सेत यांना लिहिले तेव्हा अस्पष्ट वा पुसट ओळीसंबंधी मी काही करू शकत नाही. आमच्याकडे धारिकेत ज्या प्रती उपलब्ध होत्या, त्याची गुणवत्ता मर्यदित होती. त्या मर्यादेतच छायाप्रती निघाल्या. पत्राच्या शेवटी त्यांनी जे लिहिले ते विचार करायला लावणारे व अंतर्मुख करणारे आहे. ते लिहितात- These Kesari articles are an important part of India's haritage and I feel badly that they may be impossible to read. (‘केसरी’तील हे लेख भारताचा सांस्कृतिक ठेवा - वारसा आहे. ते वाचता येणे अशक्य असेल, तर ते मला दुःखदायक वाटते.) आपलाच समृद्ध सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्याबाबत आपण किती निष्काळजी आहोत, याचाच प्रतिध्वनी दुर्दैवाने या प्रतिक्रियेत उमटलेला दिसतो. ज्या पुण्यातून ‘केसरी’ निघतो, त्या पुण्यातील आद्य विद्यापीठात अभ्यास व संशोधनासाठी ’केसरी’च्या प्रथमपासूनच्या अंकाचे सूक्ष्मचित्रीकरण नसावे, हे दुर्दैव नव्हे काय?
 


लोकमान्यांची पत्रकारिता
 

टिळककालीन ‘केसरी’चे अंक चाळत असताना त्यांनी ज्या असंख्य विषयांचा परामर्श घेतला आहे, ते पाहून त्यांच्या व्यास-प्रतिभेची प्रचीती येते. सामाजिक प्रश्न, धर्म व संस्कृती, शिक्षण, राष्ट्रकेंद्री राजकारण, तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थ आणि उद्योग, वाङ् मयविमर्श, गौरव लेख, मृत्युलेख असा त्या अग्रलेखांचा व्यापक परीघ होता. सातत्याने केलेले चौफेर वाचन, अध्ययन, चिंतन, मनन आणि त्याद्वारे केलेला सखोल व्यासंग त्यांच्या सर्वच लेखनातून प्रत्ययास येतो. जो विषय अग्रलेखात ते मांडत, त्याचा सर्वांगीण व सर्वस्पर्शी धांडोळा ते घेत. त्यासाठी त्यांचा हा तप:पूत, चतुरस्र व व्यापक व्यासंग मदतीला येत असे. या त्यांच्या व्यासंगाला त्यांची निरपवाद ध्येयनिष्ठा, समर्पण वृत्ती, मूलगामी विचारपद्धती, जनमानसाची अचूक जाण आणि या प्रक्रियेतील चिंतनातून काढलेल्या निष्कर्षाबद्दल, वा केलेल्या प्रतिपादनाबद्दल आग्रह, याची ही जोड होती. त्यातील संदर्भ तत्कालीन असले तरी आवाहन मात्र सार्वकालिक आहे. यातून व्यक्त होणार्‍या त्यांच्या विचारव्युहाचा धांडोळा घेणे हा स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे.


 
त्यांच्या अग्रलेखातील वाक्ये पल्लेदार असत. अनेकदा एका परिच्छेदात एकच वाक्य असे. त्यात सुमारे १०० शब्दांचा ऐवज असे. (सुप्रसिद्ध ब्रिटिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ अशाच पल्लेदार वाक्यांसाठी प्रसिद्ध होता. त्याचे एक वाक्य तर एवढे लांबलचक होते की, त्या एकाच वाक्यात ३५३ शब्द होते.) टिळकांच्या लेखनातील भाषा भारदस्त, प्रौढ व संस्कृत प्रचूर आहे. अग्रलेखाच्या आरंभी संस्कृत वा मराठी सुभाषितांचे योजना करून आपल्या लेखनविषयावर ते प्रकाश टाकत. त्यांचे विवेचन व विश्लेषण ससंदर्भ, साधार व प्रमाणशुद्ध असे. त्यासाठी आवश्यक त्या अवतरणांची योजना ते करीत. त्यांच्या प्रतिपादनात आवेश आणि आक्रमकता असते. प्रतिपक्षाच्या विधानांवर, आरोपांवर व युक्तिवादावर तुटून पडताना त्यांच्या बुद्धीची दिसणारी झेप चकित करणारी आहे. खंडन मंडनाच्या साहाय्याने सर्व आक्षेप समूळ उखडून टाकण्याची तार्किकता व भाषासामर्थ्य हे ही त्यांच्या भात्यातील प्रभावी बाण होते. प्रबोधन हे त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाचे उद्दिष्ट होते. आपल्या विषयाची मांडणी सुबोध असावी, यासाठी दृष्टांताचाही ते सढळ हाताने वापर करतात. पण, ते सर्व दृष्टांत जनसामान्यांच्या नित्य परिचयातील व व्यावहारिक असण्यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांना आलंकारिक भाषेचा अनावश्यक सोस नाही. शैलीला ते फारसे महत्व देत नाहीत. पण, त्यांच्या लेखनात तळमळ, प्रामाणिकपणा, आंतरिक सौंदर्य व आवेश असल्यामुळे ते प्रवाही व मनाला थेट भिडणारे झालेले दिसते. त्यामुळे त्यात नैसर्गिक खळाळ व मातीचा गंध जाणवतो. परिणामी, त्यांचा एकेक अग्रलेख म्हणजे विचारांतून कोरून काढलेले शब्दशिल्प असते.


 
प्रा. बस्सेत यांच्या विषयाच्या अनुषंगाने ज्या अग्रलेखांचा व स्फुटांचा मी धांडोळा घेतला. त्यात प्रामुख्याने अर्थ आणि उद्योग, औद्योगिकीकरण, यंत्रसंस्कृती, श्रम, श्रमिक व श्रमनीती, बाजारपेठा व व्यापार, इंग्रजांनी एतद्देशीय निर्मिती कौशल्यांचा केलेला विध्वंस व त्याचे परिणाम आणि स्वदेशी-तत्त्व आणि व्यवहार या उपविषयांचा समावेश होतो. हे सर्व इतके तपशीलवार लिहावेसे कां वाटले, ते स्पष्ट करायला हवे. सुदूर अमेरिकेतील एका विद्यापीठात एकविसाव्या शतकात संशोधन ग्रंथ प्रकल्पावर काम करणार्‍या प्रा. बस्सेत यांच्यासारख्या अभ्यासकाला एकोणिसाव्या शतकातील उत्तरार्धात लोकमान्यांनी त्या संदर्भात लिहिलेल्या अग्रलेखांची व स्फुटांची आवर्जून दखल घ्यावीशी वाटते. यातच लोकमान्यांच्या सत्त्वसंपन्न लेखनाचे मर्म दडले आहे, असे मला वाटते.
 


दोन अग्रलेख
 


प्रा. बस्सेत यांना अपेक्षित असलेल्या सर्व लेखांचे भाषांतर करून मी त्यांना पाठवले. वानगीदाखल त्यातील दोन अग्रलेखांचे वैशिष्ट्य सांगतो म्हणजे त्यांना लोकमान्यांच्या लेखनाचे संदर्भ त्यांना का घ्यावेसे वाटले, हे अधोरेखित होईल. त्यातील पहिला अग्रलेख आहे ३ जून १८८४ चा. त्याचे शीर्षक आहे. ’कुंटे विरुद्ध रानडे’ आणि उपशीर्षक आहे, ’दोन धेंडांची कुस्ताकुस्ती’ या अग्रलेखात प्रामुख्याने यंत्र, यांत्रिकीकरण व यंत्रसंस्कृती याविषयी तत्कालीन समाजात जे दोन मतप्रवाह प्रचलित होते, त्याविषयी चर्चा आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत रावबहादुर माधवराव कुंटे व न्यायमूर्ती रानडे यांची भाषणे झाली. त्यात या दोन्ही वक्त्यांनी वरील विषयाच्या दोन परस्पर विरोधी बाजू मांडल्या. लोकमान्यांनी उपहास, उपरोध, अतिशयोक्ती अशा वाङ्मयीन आयुधांचा वापर करून त्यांचा सडकून समाचार घेतला आहे. कुंटे यांनी यंत्रकलाप्रसाराची बाजू मांडली आहे, तर रानडे यांनी त्याचा प्रतिवाद केला आहे, कुंटे यांचे वर्णन टिळक ’आंग्लभाषेचा नेटिव्ह धिप्पाड भक्त’ असे करतात. या व्याख्यानाचा मुख्य विषय होता ’सुधारणा व यंत्रकला प्रसार.कुंटे यांनी व्याख्यानात जो युक्तिवाद केला, त्याचा टिळकांनी दिलेला सारांश असा - ‘’प्रस्तुतकाली हिंदुस्तानात ज्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत, त्यांच्या निरसनासाठी व ज्या ज्या इष्ट गोष्टी आहेत, त्यांच्या प्राप्तीसाठी यंत्रकलेच्या प्रसाराशिवाय दुसरा उपाय नाही. यंत्रकला प्रसार हा आजकाल आम्हास कल्पवृक्षासारखा आहे व त्याच्या आश्रयाविना आमची अभिष्ट सिद्धी कधीही व्हावयाची नाही.यानंतर टिळकांच्या लेखणीला उपरोधाची धार चढते. ते लिहितात, “तुम्हाला खायला पाहिजे, तुम्ही यांत्रिक व्हा. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, तुम्ही यंत्रकला शिका. तुम्हाला साहेबलोकांप्रमाणे ऐष आराम पाहिजे, तुम्ही यंत्रचालक व्हा. तुम्हाला आपला देश इंग्लंडसारख्या करायला पाहिजे, तुम्ही सारे घिसाडी व्हा...” कुंटे यांच्या भाषणाचा प्रतिवाद करताना रानडे यांनी भौतिक प्रगतीसाठी यंत्रसामर्थ्य मान्य केले असले तरी त्यामुळे आमच्या सर्व प्रकारच्या विपत्ती दूर होणार नाहीत,’ हे स्पष्ट शब्दात मांडले. ते म्हणाले, “त्यासाठी शरीराच्या व मनाच्या शक्तींचा विकास झाला पाहिजे. आम्हाला धर्मशुद्धी करणारे पाहिजेत. राज्यविषयक कल्पनांचे प्रसारक पाहिजेत. कलावंत, भाषाविद, शास्त्रप्रचारक, विद्याप्रसारक पाहिजेत. वक्ते, योद्धे, लेखक, कवी सर्व पाहिजेत, तरच या देशाचा जीर्णोद्धार होऊ शकेल... अनेकांगी देशसुधारणा कोणत्याही एकदेशी प्रयत्नाने कधीच व्हावयाची नाही.” मात्र, टिळकांनी या वादावर ’आमचा अभिप्राय पुढे एखादवेळेस देण्यात येईल,’ असे सांगून पडदा टाकला आहे. टिळकांच्या पत्रकारितेची सर्व वैशिष्ट्ये या अग्रलेखात दिसून येतात.
 


दुसरा अग्रलेख रचनात्मक व व्यावहारिक स्वरूपाचा आहे. २९ एप्रिल १८८४ रोजी लिहिलेल्या ’उद्योगशाळेची आवश्यकता’ या अग्रलेखात टिळकांनी काही विचारप्रवर्तक मुद्दे मांडले आहेत. ते असे –
 

) ज्याला म्हणून आपल्या देशाची दारिद्रावस्था दूर करण्याविषयी खरी कळकळ आहे, त्याने अगोदर ती दारिद्रावस्था कशामुळे आली याचा चांगला निर्णय केला पाहिजे; व नंतर त्या त्या कारणाप्रमाणे उपाय केले पाहिजेत.

 

) पूर्वी जे कलाकौशल्य आमच्याकडे यथेच्छ नांदत असे व जे व्यापारधंदे सर्वत्र मोठ्या जोराने चालत असत, त्या सर्वांचा राज्यचक्र फिरल्यामुळे दिवसेंदिवस र्‍हास होत चालला. आमचे कलाकौशल्य लयास जाऊ लागले.

 

) यासाठी उत्तम तोड म्हणजे पुणे वा मुंबई येथे एक टोलेजंग उद्योगशाळा (MST) स्थापणे हे होय. या शाळेत हरएक प्रकारचा धंदा शिकण्याची सोय असावी. म्हणजे आमच्यातील पिढ्यान्पिढ्या कारागिरीवर उपजीविका करणार्‍यांच्या मुलाबाळांस योग्य उत्तेजन मिळेल. अशा तर्‍हेने स्वदेशी व्यापारास खरे उत्तेजन मिळून पूर्वसंपादित कौशल्याचा लोप न होता पाश्चात्य कलाकौशल्याचाही बराच चांगला प्रसार होईल.

 

) यासाठी जी उद्योगशाळा उभी करायची, ती मॅसॅच्युसेट शहरातील जी उद्योगशाळा जगप्रसिद्ध आहे, तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उभारावी. तिचा संक्षिप्त परिचय पुढे करून देऊ.

 


समारोप
 


हा लेख लिहिण्यामागे प्रयोजन सांगून त्याचा समारोप करणार आहे. इंग्लंड, अमेरिकेसारख्या सुदूर देशांत ‘भारत’ विषयक संशोधन प्रकल्प अनेक विद्यापीठांतून चालतात, त्यावर आधारीत सकस ग्रंथनिर्मिती होते. या पार्श्वभूमीवर भारतातील उच्चशिक्षण क्षेत्रात चालणार्‍या संशोधन प्रकल्पांची गुणवत्ता व विविधता किती आहे, याचा वस्तुनिष्ठ शोध घेणे उद्बोधक ठरेल. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हॉर्वर्ड यासारख्या विद्यापीठांच्या स्वतंत्र प्रकाशन संस्था आहेत. त्यातून नियमितपणे दर्जेदार ग्रंथांची निर्मिती होते. ’शेक्सपियर’ या एकाच विषयावर लक्ष केंद्रित करणारी ’शेक्सपियर क्वार्टरलीही संशोधन पत्रिका इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ व शेक्सपियरचे जन्मस्थान असलेल्या स्टॅटफोर्ड-अपॉन-ऍव्होन येथील ’शेक्सपियर सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक दशके नियमितपणे प्रसिद्ध होते. या पार्श्वभूमीवर संशोधन क्षेत्रात भारतीय विद्यापीठात कोणत्या दर्जाचे काम चालू आहे, हे तपासले तर निराशा पदरी येते. येथील अनेक विद्यापीठांत पदव्या ’विकत’ मिळू शकतात. संशोधन प्रबंधांचे परीक्षक ’मॅनेज’ करता येतात. काही विद्यापीठांत तर प्रबंधलेखकही भाड्याने मिळू शकतात. हे सर्व बेमालूमपणे व ’तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असे चालू आहे. ’नॅक’ निमित्ताने महाविद्यालयांत होणार्‍या राष्ट्रीय चर्चासत्रांची गुणवत्ता वादग्रस्त ठरते आहे. संशोधन व शिक्षण क्षेत्रात सपाटीकरण चालू आहे. त्यांची गुणवत्ता उभ्या रेषेत वाढताना दिसत नाही. त्यामुळेच नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिव्हर्सिटीत भारतकेंद्री संशोधन व ग्रंथलेखन चालावे, याचे कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते. भारतातील ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी ही अपेक्षा. हाच मुद्दा या निमित्ताने अधोरेखित करण्याचा प्रयत्न आहे.
 
या भाषांतर प्रकल्पात सहभागी होताना मला गौरवान्वित वाटले. माझ्या भाषांतराच्या गुणवत्तेबद्दल प्रा. बस्सेत समाधानी दिसले. ते लिहितात,“You sound like a very methodical person, which is something I value very much.'' त्याच पत्रात प्रा. बस्सेत यांनी मला किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या चरित्रातील काही भागाचे भाषांतर करण्याचा देकार (offer) दिला. विशेष म्हणजे, त्या विद्यापीठाच्या प्रमुखांनी ’Indian culture and Philosophy ' या विषयावर व्याख्याने देण्यासाठी सहा महिने ’Visiting Faculty' म्हणून त्या विद्यापीठात यावे असे निमंत्रण दिले. मात्र, त्याच काळात मी ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वामी विवेकानंद’ या ग्रंथाच्या प्रकल्पावर काम करीत असल्यामुळे ते दोन्ही प्रस्ताव मी स्वीकारू शकलो नाही. भाषांतराच्या या प्रकल्पाचा केंद्रबिंदू ज्ञानयोगी लोकमान्य टिळक हे होते. त्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या काळात त्यांच्या प्रज्ञेला व प्रतिभेला मी विनम्र अभिवादन करतो.
 

- प्रा. श्याम अत्रे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.