‘भाषागट’ - फोडाफोडीचे एक उपयुक्त हत्यार

    दिनांक  01-Aug-2020 21:18:39
|

 


image_1  H x W:

 

 

मागच्या लेखात आपण 'Linguistics' अर्थात भाषाशास्त्राची ओझरती तोंडओळख करून घेतली. या शास्त्राने भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे केवढे नुकसान करून ठेवले आहे, याची जरा पुसटशी कल्पनाही करवून घेतली. तिथेच म्हटल्यानुसार, भाषांचा अभ्यास करणार्‍या काही युरोपियन अभ्यासकांनी जगभरातल्या असंख्य भाषा आणि त्यातल्या अनेक वैशिष्ट्यांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यावरून ‘जगात जिथे जसे सोयीचे, तिथे तसा निष्कर्ष’ या तत्त्वावर आपली ‘संशोधने’ प्रसिद्ध केली. त्या अभ्यासात त्यांनी जगभरातल्या सर्व उपलब्ध आणि प्राचीन भाषांचे गट बनवले. त्यात भारतीय आणि युरोपीय भाषांची सुद्धा गटवारी केलेली दिसते. वरकरणी अभ्यासपूर्ण आणि निष्पाप दिसणार्‍या या निष्कर्षांनी ‘आर्य स्थलांतराचा सिद्धांत’ पुन्हा पुन्हा अधोरेखित केला.

 


 


भाषांचे गट आणि जागतिक मान्यता

 

 

मागच्या लेखात आपण पाहिले, त्यानुसार सर विल्यम जोन्स (इसवी सनाचे 18वे शतक), त्यांच्या नंतर झालेल्या फ्रेन्झ बॉप (Franz Bopp - इसवी सनाचे 19वे शतक) आणि विविध अभ्यासकांनी जगभरातल्या अनेक भाषांचा तुलनात्मक अभ्यास केला. त्यातून भारतीय आणि युरोपीय अनेक भाषांमध्ये त्यांना काही समान वैशिष्ट्ये दिसून आली. त्यावरून त्यांनी त्यांचा एक गट बनविला. तो ‘इंडो-युरोपीय’ भाषागट (Indo-European group of languages) म्हणून ओळखला जातो. परंतु, ते जसजसे या विषयात खोलवर अभ्यास करू लागले, तसतसे या समान वैशिष्ट्यांमध्येही काही बारीक फरक त्यांच्या लक्षात येऊ लागले. त्या सूक्ष्म फरकांनुसार त्यांनी या ‘इंडो-युरोपीय’ भाषागटाचेही अनेक उपगट बनविले. सध्या जगभरात हेच वर्गीकरण ‘प्रमाणित’ म्हणून मानले जाते. ‘विकिपीडिया’ या सुप्रसिद्ध ई-विश्वकोशात या गटवारीचा एक चित्रबद्ध तक्ता (https://en.wikipedia.org/wiki/Indo-European_languages) पाहायला मिळतो. त्यात दाखवल्यानुसार काळ्या-पांढर्‍या पट्टीतील नावे ही भाषागटांची नावे आहेत. लाल पट्टीतील नावे ही प्राचीन अथवा लुप्त पावलेल्या भाषांची आहेत, तर हिरव्या पट्टीतील नावे ही सध्याच्या प्रचलित भाषांची आहेत. या तक्त्याच्याच आधारे आपण ही वर्गवारी समजून घेऊया.

यात आपल्या दृष्टीने स्वारस्याचा असा प्रामुख्याने ‘इंडो-इराणी’ (Indo-Iranian) नावाचा एक मोठा भाषागट दिसतो. याच्या नावावरून लक्षात येते, त्यानुसार यात ‘इंडो’ अर्थात भारतीय भाषा आणि ‘इराणी’ अर्थात इराणमधल्या भाषा यांचा अंतर्भाव होत असावा असे वाटते. पण, याचे उपगट जरा बारकाईने बघायला गेले तर काही वेगळेच चित्र दिसते. यात दुसरा इराणमधल्या भाषांचा 'Iranian' हा अगदी स्वाभाविक उपगट दिसतो. त्यात पुढे जाऊन इराणच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशांना आढळणार्‍या भाषांचे अजून छोटे छोटे गटही बनविलेले दिसतात. इथपर्यंत ही विभागणी अगदी स्वाभाविकपणे समजण्याजोगी आहे. पण, पहिला भारतीय भाषांचा ('Indo') उपगट मात्र यात कुठेच दिसत नाही. मग तो गेला कुठे?
 
 

image 1_1  H x  
 
 
‘आर्य’ वंशाची नव्हे, तर शब्दाची घुसखोरी

 

 


शोधक नजरेने पाहिल्यास, या विभागणीत आपल्या ओळखीच्या भारतीय भाषा दिसतात तर खर्‍या. पण, त्यांच्या गटाचे नाव 'Indo' किंवा 'Indic' भाषा किंवा तत्सम काहीतरी असायला हवे ना. पण, इथे तर ते नाव चक्क ‘इंडो-आर्यन’ (Indo-Aryan) असे दिलेले दिसते! आता इथे हा ‘आर्यन’ शब्द कुठून आला बरे? क्षणभर मान्य करूया की, ओढूनताणून ‘आर्य’ शब्द इथे आणायचाच होता. पण, मग आधीचा ‘इंडो’ शब्द इथे का शिल्लक ठेवला बरे? यांची कारणे अगदी उघड आहेत. इथे अप्रत्यक्षपणे हेच दाखवून देण्याची योजना आहे की, मध्य आशिया आणि युरोपाच्या आसपासच्या प्रदेशातून ‘आर्य’ नावाच्या टोळ्या उत्तर भारतात आल्या. पुढे ते मूळच्या मध्य-आशियन आर्यांहून वेगळे असे ‘भारतीय आर्य’ झाले. त्यांच्या भाषा त्या 'Indo-Aryan' भाषा! मूळ मध्य आशियन प्रदेशात ज्या भाषा दिसतात, त्यांचे ‘स्लाव्हिक’, ‘बाल्टिक’, ‘सेल्टिक’ असे वेगळे भाषागट बनविलेले आहेत. पण, तिथे मात्र त्यांना ‘आर्य’ नाव नाही! साहजिकच त्या मध्य-आशियन भाषा आणि भारतीय भाषा यांच्यामध्ये या संशोधकांना फारसे समान दुवे सापडलेले नाहीत, म्हणूनच तर हे गट वेगवेगळे बनले. मग या वेगळ्या भाषागटाच्या लोकांना मूळचे ‘आर्य’ का म्हणायचे? इथे या भाषाशास्त्रीय खोडसाळपणाची आणि फोलपणाची आपल्याला जाणीव व्हायला सुरुवात होते.

दाक्षिणात्य भाषांची हकालपट्टी

 

 


या ‘इंडो-आर्यन’ भाषागटात कोणकोणत्या भाषा येतात? तक्ता बघायला गेल्यावर लक्षात येते की यात उत्तर भारतातल्या बहुतेक सर्व भाषा येतात. पण, दक्षिण भारतातली एकही भाषा दिसत नाही. असे का बरे? दक्षिण भारतीय भाषा या ‘इंडो’ अर्थात भारतीय भाषा नाहीत? की त्या ‘आर्यन’ नाहीत? ज्या ज्या भाषागटांच्या नावात ‘इंडो’ शब्द वापरला आहे, त्यांच्यापैकी कुठल्याच गटात या भाषा नाहीत! संपूर्ण ‘इंडो-युरोपीय’ समूहातूनच त्यांना हद्दपार केलेले दिसते. मग या भाषा गेल्या कुठे?

यावर पुन्हा एकदा आपल्याला असेच शोधकार्य करावे लागते आणि मग लक्षात येते की, या दाक्षिणात्य भाषांचा एक पूर्णपणे वेगळाच गट या भाषाशास्त्रज्ञांनी तयार केलेला आहे. भाषांचा तुलनात्मक अभ्यास करताना या तथाकथित ‘इंडो-आर्यन’ समूहातल्या भाषा आणि ‘द्राविडी’ समूहातल्या भाषा यांच्यात साम्यस्थळे या अभ्यासकांना कशी दिसली नाहीत? मराठी आणि कानडी भाषांमध्ये अशी असंख्य साम्यस्थळे आहेत. उडिया आणि तेलुगू यांच्यातही अशीच अनेक साम्यस्थळे आहेत. या वैशिष्ट्यांकडे या अभ्यासकांनी का दुर्लक्ष केले? आता इथे मात्र या भाषाशास्त्रीय खोडसाळपणाची आणि फोलपणाची आपल्याला खात्रीच पटायला लागते. या संदर्भात द्राविडी गटातल्या भाषांचा स्वतंत्रपणे विचार आपण पुढच्या लेखात करणारच आहोत, त्यामुळे तूर्त इथेच थांबूया.
भाषांचे असे गट तयार करून त्यांच्याद्वारे हे संशोधक हेच सिद्ध करू पाहत आहेत की, उत्तर भारतातल्या भाषा दक्षिण भारतीय भाषांपासून वेगळ्या आहेत. उत्तर भारतीय भाषांचा मध्य-आशियन आणि युरोपियन भाषांशी जास्त जवळचा संबंध आहे, तर दक्षिण भारतीय भाषांचा मात्र त्यांच्याशी तसा संबंध अजिबात नाही. एकूणच इथे लक्षात घेण्याची मुख्य गोष्ट म्हणजे, या युरोपीय अभ्यासकांनी या संशोधनाच्या आडून अतिशय चलाखीने काही समज पेरून दिलेले आहेत. जसे - आर्य ‘वंशाच्या’ टोळ्या मध्य-आशियातून उत्तर भारतात येऊन स्थिरावल्या. त्यांच्या भाषा या ‘आर्यभाषा’ होत. त्यांनी तिथे आल्यावर तिथल्या मूलनिवासी लोकांना, अर्थात द्रविडांना तिथून हाकलून दक्षिणेत पिटाळून लावले. आर्यांच्या या स्थलांतराच्या आधीपासूनच पूर्ण उत्तर भारतात द्राविड भाषा बोलल्या जात होत्या. परंतु, नंतर आर्यांच्याच भाषा उत्तर भारतात प्रस्थापित झाल्या. अशा पद्धतीने भाषांची वर्गवारी करणे किती अशास्त्रीय आहे आणि म्हणून खोडसाळपणाचेही आहे, हे आपण पाहिले. गेली दोन-अडीच शतके चाललेले हे संशोधन त्यामुळेच तर्काच्या कसोटीवर पूर्णपणे फसलेले आहे, हे या निमित्ताने वाचकांनी लक्षात घेऊन याच्या मागच्या कुटिल हेतूला बळी न पडण्याची खूणगाठ मनात बांधावी.

 

 


(क्रमश:)

 

 

- वासुदेव बिडवे

(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -

 

अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)

 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.