गोळीबाराच्या आवाजानंतर कंगनाच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!

    दिनांक  01-Aug-2020 16:03:36
|
kangana_1  H x


'मर्दानी' म्हणतेय मी अशाने घाबरणार नाही!


मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सतत चर्चेत असलेल्या कंगना राणावतने शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. कंगना सध्या मनालीतील तिच्या घरी असून, या घराजवळ गोळीबार झाल्याचा आवाज ऐकू आला आहे. कंगनाच्या तक्रारीनंतर कुल्लू पोलिस कंगनाच्या घरी पोहोचले आहेत. प्राथमिक चौकशीत पोलिसांना अद्याप कुठलाही पुरावा मिळालेला नाही. मला घाबरवण्याच्या हेतूने हा गोळीबार करण्यात आला असून, मी असल्यांना घाबरत नाही, असे कंगनाने म्हंटले आहे. गोळीबाराच्या आवाजानंतर पोलिसांनी सुरक्षेसाठी कंगनाच्या घरी पोलिस पथक तैनात केले आहे.


या घटनेबद्दल सांगताना कंगना म्हणाली, 'मी माझ्या बेडरूममध्ये होते आणि रात्री ११:३०च्या सुमारास मला फटाक्यांसारखा आवाज आला. पहिल्यांदा मला वाटले, की कोणीतरी फटाके फोडले आहेत, परंतु जेव्हा दुसऱ्यांदा हा आवाज आला तेव्हा मी सावध झाले. कारण हा गोळीबाराचा आवाज हे मला समजले. कोरोनामुळे पर्यटन बंद असल्याने पर्यटक मनालीत आले नाहीत, तर फटाके कोण फोडणार? म्हणून मी ताबडतोब सिक्युरिटीला कॉल केला. त्याने कदाचित आजपर्यंत गोळीचा आवाज ऐकला नसावा त्यामुळे त्याने लहान मुले असतील असे सांगितले. परंतु हा गोळीबाराचा आवाज असल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. आम्ही सध्या ५ लोक घरात असून, पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवली आहे.’


पोलिसांच्या म्हणण्यानुसार सफरचंदावर बसणाऱ्या वटवाघुळाला घाबरवण्यासाठी मालकाने आवाज केला असावा. मात्र बागेच्या मालकाने त्यास नकार दिल्याने कोणीतरी घाबरवण्यासाठी हा गोळीबार केल्याचे लक्षात आले. कंगनाच्या मते सुशांत प्रकरणात तिने राजकीय नेत्यांची नावे घेतल्याने तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.


दरम्यान, या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी पथक तैनात केले असून, कुल्लुतून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. कुल्लूचे एसपी गौरव सिंह यांनी याबाबत माहिती दिली. कंगनाच्या घराभोवतीच्या परिसराची तपासणी करण्यात येत आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.