ज्येष्ठ सिनेपत्रकार दीनानाथ घारपुरे यांचे निधन

    दिनांक  09-Jul-2020 14:26:43
|

gharpure_1  H xकोरोनाच्या उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास


मुंबई : ज्येष्ठ सिनेपत्रकार, नाट्य-चित्रपट समीक्षक दीनानाथ घारपुरे यांचे बुधवारी रात्री उशिरा कोरोनामुळे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मागील दोन-तीन दिवस श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना बुधवारी रात्री नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांना प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचे निधन झाले. चंदनवाडीतील विद्युतदाहिनीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ आणि आत्या असा परिवार आहे.


दीनानाथ घारपुरे यांनी ३८ वर्षं आकाशवाणीच्या नाशिक, बीड आणि मुंबई केंद्रांवर विविध अधिकारी पदांवर काम केले. तसेच, सिनेपत्रकार म्हणूनही त्यांनी या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कित्येक कलाकारांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. अत्यंत मितभाषी स्वभावाचे घारपुरे राज्य नाट्यस्पर्धांच्या परीक्षणासाठी आवर्जून हजर असायचे आणि त्याच्या वृत्तसंकलनाची जबाबदारीही त्यांनी कित्येक वर्षें निभावली. दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्येही त्यांचे ‘चित्रनगरी’ हे दर शनिवारी नाट्यसमीक्षा, चित्रपट परीक्षण आणि कलाकारांच्या मुलाखतींचे सदर विशेष प्रसिद्ध होते.


राज्याचे माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी “पत्रकार दीनानाथ घारपुरे यांच्या निधनाने नाट्य-चित्रपट पत्रकारितेतील नेमस्त व्यक्तिमत्त्व लयाला गेले आहे. मितभाषी, अजातशत्रू घारपुरे सर्वांनाच प्रिय होते,” या शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे दीनानाथ घारपुरे यांना विनम्र श्रद्धांजली.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.