एकाच कुटूंबावर दोनवेळा अंत्यसंस्काराची वेळ : चौकशीची मागणी

09 Jul 2020 17:52:38
Gaikwad _1  H x






मुंबई : ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलच्या गलथानपणाबद्दल आणि गायकवाड व सोनवणे कुटुंबीयांच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल चौकशी मागविण्यात येईल, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी किरीट सोमय्या याना दिले. ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलचा आणि पर्यायाने ठाणे महापालिकेचा गलथानपणा आणि रुग्णालय प्रशासनाने गायकवाड व सोनावणे कुटुंबीयांच्या भावनांशी केलेला खेळ याची चौकशी करण्यात यावी यासाठी आमदार निरंजन डावखरे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी दुपारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.



सोमय्या म्हणाले की, ठाण्यातील गायब कोविड पेशंट परिवार सोनावणे, गायकवड यांच्याप्रति आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सहवेदना व्यक्त केल्या, दुःख व्यक्त केले. यात जो गलथानपणा दाखवला गेला, त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, या आमच्या मागणीचे त्यांनी समर्थन केले.


ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलचा फारच मोठा गलथानपणा आहे. 3 जुलै रोजी जनार्दन सोनावणे यांचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्या कुटुंबीयांकडे भालचंद्र गायकवाड यांचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. त्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र 7 जुलैला संध्याकाळी जनार्दन सोनावणे हे आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याचे सोनावणे कुटुंबीयांना कळविण्यात आले. रुग्णालय प्रशासनाचे तेवढ्यानेही समाधान झाले नाही म्हणून सोनावणे यांचा मृतदेह म्हणून गायकवाड यांचा मृतदेह घेतल्याचा सोनावणे कुटुंबीयांवर आरोप करण्यात आला.



इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून तसे लिहूनही घेण्यात आले. सोनावणे कुटुंबीयांच्या दुर्दैवाचे दशावतार एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्याच दिवशी मध्यरात्री जनार्दन सोनावणे यांचाही मृत्यू झाला आणि सोनावणे कुटुंबीयांना जनार्दन सोनावणे यांच्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागले. म्हणजे सोनावणे यांच्या मृतदेहावर दोन वेळा अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबीयांवर आली. ग्लोबल हॉस्पिटल आणि ठाणे महापालिकेविरोधात संबंधितांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.







Powered By Sangraha 9.0