कोरोना लस उत्पादनात भारत महत्वाची भूमिका निभावेल : पंतप्रधान मोदी

09 Jul 2020 15:27:24

PMO_1  H x W: 0



नवी दिल्ली :
इंडिया ग्लोबल विक २०२०आजपासून ब्रिटनमध्ये सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमास संबोधित केले. कोरोना महामारीच्या काळात भारतासह सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोदींच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले, या काळात आर्थिक पुनरुज्जीवनाबद्दल चर्चा होणे स्वाभाविक आहे. भारताचे जागतिक पुनरुज्जीवन आणि एकीकरणही तितकेच महत्वाचे आहे. माझा विश्वास आहे की जागतिक पुनरुज्जीवनाच्या या काळात भारत अग्रणी भूमिका निभावेल.


भारत एक प्रतिभावान देश

ते म्हणाले की, जगभरात आपण भारताच्या कौशल्य-शक्तीचे योगदान पाहिले आहे. भारतीय तंत्रज्ञान उद्योग आणि व्यावसायिक यांचे योगदान विसरून चालणार नाही. ते अनेक दशके ते जगाला मार्ग दाखवत आहेत. भारत प्रतिभासंपन्न देश आहे आणि योगदान देण्यास उत्सुक आहे. पीएम मोदी म्हणाले की, इतिहास दर्शवितो की भारताने सामाजिक किंवा आर्थिक सर्व आव्हानांवर विजय मिळविला आहे. एकीकडे भारत जागतिक साथीच्या विरोधात जोरदार लढा देत आहे. त्यावेळी, लोकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करून, आपण आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहोत.


भारतीय औषध उद्योग संपूर्ण जगासाठी मौल्यवान संपत्ती

पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, जेव्हा भारत पुनरुज्जीवनाची चर्चा करतो तेव्हा पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या दोन्हीचा समतोल संभाळण्यावर भर देतो. जे अशक्य मानले जाते ते साध्य करण्याची भावना भारतीयांमध्ये असते. ते म्हणाले की, या साथीच्या रोगाने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की भारताचा फार्मा उद्योग फक्त भारताचीच नाही तर संपूर्ण जगासाठी अमूल्य संपत्ती आहे. भारताने विशेषत: विकसनशील देशांसाठी औषधाची किंमत कमी करण्यात प्रमुख भूमिका निभावली.


भारत जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था आहे

पीएम मोदी म्हणाले की भारत ही जगातील सर्वात खुली अर्थव्यवस्था आहे. आम्ही सर्व जागतिक कंपन्याना भारतात त्यांची उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहन देतो. आज भारत ज्या प्रकारच्या संधी जागतिक पातळीवर उपलब्ध करुन देत आहे, फार कमी देश अशा संधी प्रदान करतात.


लस तयार झाल्यानंतर, त्याच्या उत्पादनात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असेल.

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, भारतात बनवण्यात येणाऱ्या लसी या जगभरातील मुलांच्या लसीच्या आवश्यकतेच्या दोन तृतीयांश गरजा भागवतात. आज आमच्या कंपन्या कोरोना लसच्या विकास आणि उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. ते म्हणाले की मला खात्री आहे की, एकदा लसीचा शोध लागल्यानंतर या लसीचे उत्पादन आणि विकास करण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका असेल.


परिषदेत ७५सत्रात संबोधित करण्यासाठी २५० जागतिक वक्ते
यापूर्वी पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांच्या अभिभाषणाबद्दल म्हटले होते की 'स्वावलंबी भारत अभियान'वर भर दिला जाईल आणि उत्तम कामगिरी केली जाईल. 'भारत आणि नवीन जग: पुनरुज्जीवन' या विषयावर आयोजित या तीन दिवसीय परिषदेत तीस देशांतील पाच हजार लोक सहभागी होतील. परिषदेला ७५ सत्रामध्ये २५० जागतिक वक्ते संबोधित करतील.
Powered By Sangraha 9.0