मुंबैवाल्यांनू गणपतीक ७ ऑगस्टआधी येवा!

09 Jul 2020 21:49:03

kokan_1  H x W:



सिंधुदुर्ग :
चाकरमान्यांच्या श्रद्धेचा आणि जीवाभावाचा सण गणेशोत्सही यंदा कोरोनाच्या ग्रहणात सापडला आहे. दरवर्षी गावी जाण्यासाठी महिनाभर आधीच सुट्टी घेऊन तयार असणाऱ्या चाकरमानी आणि भाविकांना यंदा मात्र गणपती उसत्वाला मुकावे लागण्याची चिन्हे आहेत. कारण गणेशोत्सवासाठी गावी जायचे असेल तर ७ ऑगस्टपूर्वी मुंबईकरांनी यावे असे आदेश सिंधुदुर्ग जिल्हादंडाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात घेण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य अधिकारी आणि इतर महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.


गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्याना ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यन्त यावे लागणार आहे. त्यानंतर विलगीकरण कालावधी पूर्ण करूनच गावात जाण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. येण्यासाठी ई-पास आवश्यक असणार आहे. तसेच कुणी व्यक्ती बाहेरून आल्यावर थेट घरी जात असेल तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनाही बाहेर जाता येणार नाही. ई-पास विना प्रवेश करणाऱ्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.



kokan_1  H x W:
या सोबत गावकऱ्यानाही निर्बंध लादण्यात येणार आहेत. गणेशोत्सव २२ ऑगस्ट रोजी असल्याने आदल्या दोन दिवशी खरेदीला गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात उपाययोजना करण्यात येणार आहेत. ग्राहकांनी ऑगस्टमध्ये पाहिल्याच आठवड्यात खरेदी आटपून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी मूर्तीची उंची लहान ठेवावी, असेही सांगण्यात आले आहे. गावातील मंडळींनी एकमेकांच्या घरी जाऊन आरती किंवा भजन करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन होते की नाही ते पाहण्यासाठी गावपातळीवर समिती नेमण्यात येणार आहे. गणपतीत गावकऱ्यांनी आपल्या घरी राहूनच पूजा अर्चा करावी, इतर कुठेही बाहेर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जनाच्या दिवशी असणाऱ्या पूजेलाही शेजाऱ्यांना न बोलवता घरच्या मंडळींनी म्हामद (जेवण) करावे, असेही सांगण्यात आले आहे.
 
 
चेकिंग होणार! 


जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला तपासणी करूनच पुढे पाठवण्यात येणार आहे. फोंडा, करूळ, अंबोली, खारेपाटण आदी ठिकाणी २४ तास चेक पोस्टवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार आहे. राजकीय पुढाऱ्यांनी या काळात बस व्यवस्था करू नये, सार्वजनिक वाहतूकही या काळात बंद ठेवण्यात येणार आहे.
 
भटजींजी व्हिडीओद्वारे करावी पूजा

प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भटजी काकांद्वारे गणेश पूजा करण्याची पद्धत आहे. त्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पूजा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0