पाकचा अजब दावा ; कुलभूषण जाधव यांचा पुनर्विचार याचिकेस नकार

    दिनांक  08-Jul-2020 16:48:01
|

kulbhushan jadhav_1 
नवी दिल्ली :
पाकिस्तानी तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता दावा केला आहे. कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचा देखील पाकिस्तानचा दावा आहे. 


पाकिस्तानचे अतिरिक्त महाधिवक्ता यांच्या म्हणण्यानुसार, १७ जून २०२० रोजी कुलभूषण जाधव यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी पाकिस्तानने आमंत्रित केले होते. यासंदर्भात पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना पत्र लिहिले आहे. पाकिस्तानने दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर दिली आहे. पाकिस्तानी माध्यमांतील वृत्तानुसार पाकिस्तानने म्हटले आहे की त्याऐवजी त्याने (कुलभूषण जाधव) यांनी आपल्या प्रलंबित दया याचिकेचे अनुसरण करण्यास प्राधान्य दिले.कुलभूषण जाधव हे २०१६ पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारतानं बर्‍याच वेळा नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून कुलभूषण यांना अटक केली. सन २०१७ मध्ये भारताने आयसीजेकडे हे प्रकरण सोपावले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यावेळी देखील पाकिस्तानने जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितले. यानंतर काही दिवसांनी पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला गेला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडीओ पाकिस्तानच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भारताने केला होता.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.