श्वास अडकल्यावर रुग्ण ओटीपी कसा सांगणार?

08 Jul 2020 17:10:53
Thane _1  H x W



ठाणे : महापालिकेने सुरू केलेल्या ऑनलाईन बेड अलोकेशन सिस्टीम मध्ये रुग्णवाहिकेत बसल्यावर कोरोना रुग्णाला मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक चालकाला द्यायचा आहे. कोरोना रुग्णांना महापालिका ओला-उबर टॅक्सी सेवेचे प्रवासी समजते का? दुर्दैवाने एखाद्या रुग्णाचा श्वास अडकल्यावर त्यांनी चालकाला ओटीपी कसा सांगायचा?, असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.


ठाणे शहरात कोरोना रुग्णांना लगेच बेड उपलब्ध होत नाही. महापालिकेने सुरू केलेल्या वेबसाईटवर रुग्णालयात बेड रिक्त दिसतो. मात्र, तेथे फोन केल्यावर रुग्णांना थेट बेड दिला जात नाही. त्यासाठी प्रभाग स्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले जाते. त्यामुळे वेबसाईटचा काहीही उपयोग झालेला नाही. आता ऑनलाईन बेड अलोकेशन पद्धतीत फॉर्मवर माहिती भरून द्यायची आहे. 


कोरोना संसर्ग झाल्यावर रुग्णापासून नातेवाईक दूर होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत एखाद्या गरीब वा वृद्ध रुग्णाला इंटरनेट वा वेबसाईटची माहिती नसल्याने त्याने लॉकडाऊनच्या काळात 'सायबर कॅफे' शोधायचा का? असा सवाल नारायण पवार यांनी केला. कॉलसेंटरच्या माध्यमातून एका फोनने रुग्णाला मदत व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


ऑनलाइन बेड पद्धतीनुसार रुग्णवाहिकेत बसल्यावर त्याच्या मोबाईलवर पाठविलेला ओटीपी क्रमांक चालकाला द्यायचा आहे. रुग्णवाहिकेमध्ये एकटा रुग्ण असतो. त्यामुळे ओटीपी क्रमांकाचा 'द्राविडी प्राणायाम' कशासाठी, असा सवाल नारायण पवार यांनी केला. 

वेबसाईटसाठीचा खर्च जाहीर करा : नारायण पवार

ग्लोबल हब येथील रुग्णालयात अद्ययावत यंत्रणा उभारण्याचा पालिकेचा दावा आहे. मात्र, याठिकाणी मृतदेह बदलण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. आता महापालिकेने बेड मिळण्यासाठी वेबसाईट सुरू केली. कोरोना काळात वेबसाईट व ऑनलाईन पद्धतीने जनतेला माहिती देण्यासाठी किती खर्च झाला, ते प्रशासनाने जाहीर करावे, अशी मागणीही नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.





Powered By Sangraha 9.0