'एसआयपी' म्हणजे काय?

    दिनांक  08-Jul-2020 21:07:53
|
SIP _1  H x W:‘म्युच्युअल फंड सही है ’ ह्या जाहिरातीमुळे गेल्या ३-४ वर्षात म्युच्युअल फंड ची 'एसआयपी' चांगली प्रचलित झाली. खाली जाणाऱ्या व्याजदरामुळे, म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा पसंतीचा पर्याय ठरतो आहे. तरी अजूनही बऱ्याच गुंतवणूकदारांचा चुकीचा समझ असा आहे कि 'एसआयपी' म्हणजे म्युच्युअल फंडाची योजना, मात्र 'एसआयपी' हि शेयर बाजारातील अस्थिरतेचे जोखीम कमी करून शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करण्याची सुविधा आहे.

ह्या सुविधे द्वारे आपण म्युच्युअल फंडाच्या निरनिराळ्या प्रकारच्या योजने मध्ये आपल्या आर्थिक नियोजनानुसार 'एसआयपी' चालू करू शकतो. आपली 'एसआयपी' ही उद्दिष्टाला धरून असावी. उदाहरणार्थ आपल्या मुलांचे उच्च शिक्षण, लग्न कार्ये किंवा आपले निवृत्तिनियोजन वगैरे. असे केल्याने आपले आर्थिक नियोजन कार्यक्षम करण्यास मदत होते.

एसआयपीच्या लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाल्यास, उपलब्ध आकडेवारीनुसार मार्च २०२० पर्यंत साधारण ३ करोड पेक्षा जास्त सामान्य गुंतवणूकदार हे दरमहा रु. ८५०० करोड 'एसआयपी' मार्फत म्युच्युअल फंड च्या विविध योजनांमध्ये गुंतवीत आहेत. प्रत्येक महिन्यागणिक त्यात नाव नवीन गुंतवणूकदारांची भर पडत आहे. नवीन गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी आज आपण 'एसआयपी' बद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

नियमित कालावधीनंतर (सामान्यतः दर महिन्याला, काही म्युच्युअल फंड साप्ताहिक किंवा दैनिक 'एसआयपी' ची हि सुविधा देतात.) ठरावीक रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया म्हणजे 'एसआयपी' होय. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीवर युनिट्स मिळतात. ज्या दिवशी आपण गुंतवणूक करतो , त्या दिवसाच्या त्या योजनेच्या बाजार मूल्य प्रमाणे ( NAV). 'एसआयपी' मध्ये दर महिन्याला आपण त्या योजनेचे युनिट्स जमा करीत असतो. 

'एसआयपी'मुळे सामान्य गुंतवणूकदारांना भांडवल बाजारात उतरण्याची संधी मिळते, बाजारात सूचिबद्ध असलेल्या नामांकित कंपन्यांचे शेयर्स म्युच्युअल फंड च्या इक्विटी योजनेच्या गुंतवणुकीतून घेण्याची संधी मिळते. तसेच त्यांच्या गुंतवणुकीला शिस्त लावण्याचीही संधी मिळते 

'एसआयपी' केव्हा सुरू करू शकतो?
खुल्या म्युच्युअल फंडासाठी (Open Ended Fund ) केव्हाही 'एसआयपी' सुरू करता येते. 'एसआयपी' साठी आर्थिक नियोजनकाराकडे जाऊन किंवा संपर्क साधून २ प्रकारे 'एसआयपी' करता येते

१) Offline पद्धतीने म्हण्जेच, केवायसी कागदपञ व एक 'एसआयपी' ला चेक प्रमाणे एका किंवा अनेक अर्जावर सही करुन द्यावी लागते. 'एसआयपी'चा अर्ज भरल्यापासून 'एसआयपी' सुरू होईपर्यंत ३० दिवसांचा कालावधी जातो. या काळात बँक तुमची 'एसआयपी' रजिस्टर करते व दरमहा सुरू करते.

२) Online पद्धतीने म्हणजेच आर्थिक नियोजकारच्या संकेत स्थळावर वर फॉर्म भरून, नेट बँकिंग मध्ये ECS किंवा ऑटो डेबिट रजिस्टर करून , अतिशय कमीवेळात 'एसआयपी' करता येते. Online सुविधेमुळे जगाच्या पाठीवर कुठूनही 'एसआयपी' करता येते. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तसेच आपल्या आर्थिक उद्दिष्टाला अनुसरून आर्थिक नियोजनकार एक किंवा अधिक योग्य योजनांचे संयोजन करून देतात.

किती काळासाठी 'एसआयपी' ठेवता येते?

अनेक म्युच्युअल फंडांतून किमान १२ महिने 'एसआयपी' सुरू ठेवावी लागते. गुंतवणूकदारांना 'एसआयपी'साठी कालावधी निवडण्याची मुभा असते. याखेरीज गुंतवणूकदाराला, त्याने म्युच्युअल फंडाला पुढील सूचना देईपर्यंत 'एसआयपी' सुरू ठेवण्याचाही पर्याय असतो.त्याला " पर्पेच्युअल 'एसआयपी' " असेही संबोधितात प्रत्येक 'एसआयपी' गुंतवणुकीच्या उद्दिष्टाला जोडून घ्यावी, असा सल्ला नियोजक गुंतवणूकदारांना नेहमी देतात, जेणेकरून ते उद्दिष्ट साध्य होईपर्यंत ती 'एसआयपी' सुरू ठेवता येईल.

'एसआयपी'ची रक्कम बदलता येते का?
गुंतवणूकदाराला त्याच्या 'एसआयपी'ची रक्कम कमी करता येते किंवा वाढवता येते. मात्र यासाठी पहिली 'एसआयपी' रद्द करून नवी 'एसआयपी' सुरू करावी लागते. यासाठी म्युच्युअल फंडाकडून कोणताही दंड आकारला जात नाही. आपल्या वाढत्या उत्पन्नाप्रमाणे आपण 'एसआयपी' ची रक्कम वाढवू शकतो किंवा काही नवीन खर्च असतील तर 'एसआयपी' ची रक्कम कमी हि करू शकतो.

'एसआयपी' सुरू असलेल्या फंडात आपण एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकतो का?
होय. 'एसआयपी' सुरू असलेल्या योजनेत तुम्ही एकगठ्ठा रक्कम गुंतवू शकता. त्यामुळे 'एसआयपी'त कोणत्याही प्रकारे बाधा येत नाही. ती विनाअडथळा सुरू राहते. आपल्याकडे कधी अतिरिक्त रक्कम असेल तर आपण गुंतवून 'एसआयपी' तुन जमा होणारे युनिट्स वाढवू शकतो,

'एसआयपी' करताना कमीत कमी किती वर्षासाठी करावी?
आपली भांङवल वृद्धी चांगली व्हावी यासाठी कमीत कमी १० ते १५ वर्ष 'एसआयपी' करणे आवश्यक आहे. त्यापूढे जेवढी वर्ष तुम्ही वाढवू शकाल तेवढा चक्रवाढीचा फायदा जास्त मिळतो. आपल्या 'एसआयपी'ला एखादं आर्थिक उद्दिष्ट लिंक केल्यास उदा. मुलांचे/मूलींचे शिक्षण, लग्न, घर खरेदी, निवृत्ती इ. किती वर्ष 'एसआयपी' करायची हे आर्थिक नियोजनकार सांगतात. दीर्घावधीसाठी संयमाने आपली 'एसआयपी' चालू ठेवावी.
'एसआयपी' करताना आर्थिक नियोजनकार कङुनच का करावी?


कुठलीही गुंतवणूक, मग तो विमा असो किंवा म्युच्युअल फंङ असो, बॅंकेतुन करने टाळल पाहिजे कारण बॅंकेतुन विक्री नंतरच्या सेवा मिळत नाहीत. 'एसआयपी' किंवा एकरकमी गुंतवणुक ही आर्थिक नियोजनकाराकडून केली पाहिजे त्यावर त्याच वैयक्तिक लक्ष रहात पण सल्लागाराची निवङ माञ थोङी काळजीपुर्वक करण आवश्यक असुन त्याला किमान दहा वर्षाचा अनुभव असला पाहिजे कारण एवढ्या वर्षात शेअरबाजाराच्या सर्व चढउताराचे अनुभव त्याला आलेले असल्यामुळे तो काळजीपुर्वक काम करत असतो.

आजकाल काही मोबाइल अँप गुंवणूकदारांना 'एसआयपी' चालू करण्याची सेवा पुरवितात मात्र त्यात निवडलेल्या योजना मागील परतावा पाहून सूचित केलेल्या असतात. पुढे हि त्या योजनेची कामगिरी तशीच चांगली राहील याची शाश्वती नसते. आर्थिक नियोजनकार नियमित पणे म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थापकांशी संवाद साधून गुंतवणूकदारांसाठी शेयर बाजाराबाबत अधिकाधिक माहिती गोळा करून योग्य सल्ला देतात.


'एसआयपी' सुरु केल्यावर त्याला सतत निरीक्षण करणे गरजेच आहे का?

नाही, कारण 'एसआयपी' सुविधेद्वारे आपण बाजारातील गुंतवणुकीची जोखीम कमी केलेली असते. 'एसआयपी' मधून आपल्या गुंतवणुकीवर चक्रवाढ वाढीचा फायदा दिसायला कमीत कमी ८-१० वर्षे जातात. 'एसआयपी' सुरु करण म्हणजे एक बीज रोवण्यासारख आहे. रोज रोज बघुन त्याची वाढ कमी किंवा जास्त होणार नसते. ते 'एसआयपी'च झाङ नैसर्गिकपणे वाढण्यास तेवढा कालावधी देण क्रमप्राप्त असत.


'एसआयपी' करताना किती परतावा गृहीत धरावा?
नेमका किती परतावा मिळेल हे सांगण थोङ अवघङ असल तरी नियोजन करताना नियोजनकार १०-१२% परतावा गृहीत धरुन चालतात. त्यानुसार तुमची 'एसआयपी' पुढील १०/१५/२० वर्षात किती रक्कम प्राप्त करु शकेल याचा किमान अंदाज बांधता येतो. बहुतेक आर्थिक नियोजनकरांच्या संकेत स्थळावर त्याचे कॅल्क्युलेटर असतात.

'एसआयपी' चा एखाधा हप्ता चुकला तर?

एखादा हप्ता चुकला तर, म्युच्युअल फंड आपल्याला काही भार लावत नाहीत. त्या महिन्यामध्ये हप्त्याच्या रकमेचे युनिट जमा होणार नाहीत. आपल्या बँकेकडून ECS डेबिट न झाल्याबद्दल काही भार लागू शकतो. लागोपाठ ३ महिने जर आपले हप्ते चुकले तर म्युच्युअल फंड 'एसआयपी' बंद करतात. 'एसआयपी' पुन्हा चालू करायची झाल्यास नवीन करावी लागते. जर गुंतवणूक तोडायची झाल्यास आता पर्यंत 'एसआयपी' तुन जमा झालेल्या गुंतवणुकीवर आपल्याला बाजार मूल्य मिळते.

जर काही कारणास्तव मला काही महिने 'एसआयपी' चा हप्ता भरणे शक्य नसेल तर?
काही कारणास्तव जर काही महिने 'एसआयपी' चे हप्ते भरणे शक्य नसेल तर म्युच्युअल फंड आपल्याला PAUSE 'एसआयपी' ची सुविधा देतात. आपण काही महिने 'एसआयपी' थांबवून नंतर पुन्हा चालू करू शकतो. हि चांगली सुविधा आहे. त्यामुळे आपण आले उद्दिष्ट होई पर्यंत 'एसआयपी' चालू ठेवू शकतो.


'एसआयपी' सुरु केल्यावर शेअरबाजार खाली येवुन बाजारमुल्य कमी झाल्यास काय कराव?
शेअरबाजार खाली आल्यास 'एसआयपी' व्यतिरिक्त काही एकरकमी गुंतवणुक करावी यामूळे बाजाराच्या खालच्या पातळीवर जास्त युनिट जमा करण्याची संधी मिळते व 'एसआयपी'च आर्थिक उद्दिष्ट वेळेआधीच पुर्ण व्हायला मदत होते. अशी वेळ आल्यास आपल्या आर्थिक नियोजनकारास संपर्क साधुन अशा सुचना देता येतात. एक रकमी गुंतवणूक कारण शक्य नसेल तर ६-१२ महिन्यासाठी आपली 'एसआयपी' रक्कम वाढवावी आणि जास्त युनिट जमा करण्यासाठी नियोजन करावे.

स्टेप अप 'एसआयपी' म्हणजे काय ?
आपले उत्पन्न हे दर वर्षी वाढत असते, अशावेळी आपण आपली 'एसआयपी'ची रक्कमही वाढवली पाहिजे. 'एसआयपी' सुरु करतानाच आपण तशी सूचना म्युच्युअल फंडास देऊ शकतो. समझा आपण रु ५००० ची 'एसआयपी' चालू केली आहे व आपण स्टेप 'एसआयपी' दर वर्षी रु ५०० ने वाढवण्याची सूचना सुरवातीस दिल्यास दर वर्षी आपली 'एसआयपी'ची रक्कम वाढत जाईल, म्हणजेच दुसऱ्या वर्षी रु ५५००, तिसऱ्या वर्षी रु ६००० अशी 'एसआयपी' दर वर्षी वाढत जाईल.

छोट्या रकमेच्या अनेक एसआयपी कराव्यात कि एक किंवा २ कराव्यात?
काही दिवसांपासून बँकांनी ECS डेबिटसाठी शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. हे शुल्क प्रत्येक डेबिटसाठी असते. जर एखाद्या गुंतवणूकदारास १००० च्या १० 'एसआयपी' करायच्या असतील तर प्रत्येक 'एसआयपी' डेबिटसाठी शुल्क भरावे लागेल मात्र ५००० च्या दोन 'एसआयपी' केल्या तर शुल्क दोन डेबिटसाठी लागेल. 'एसआयपी'तून चांगला परतावा मिळण्यासाठी आता छोट्या छोट्या अनेक 'एसआयपी' न करता मोजक्याच कराव्यात. 

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हि बाजार जोखिमेचा अधीन असते, योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा

- निलेश तावडे
९३२४५४३८३२

(लेखक हे २० वर्ष म्युच्युअल फंड क्षेत्रात कार्यरत होते, सध्या ते आर्थिक नियोजकार आहेत)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.