तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राची व्यवस्थापन समिती जाहीर; या तज्ज्ञांचा समावेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jul-2020
Total Views |

tiger_1  H x W:


येत्या महिन्याभरात शास्त्रीय माहिती पुरवणार


 
मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'चा (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये विविध वन्यजीव प्रजातींसंदर्भात अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ संशोधकांचा समावेश आहे. वन विभागाला 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'चा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी ही तज्ज्ञ मंडळी शास्त्रीय माहिती पुरविणार आहेत. येत्या महिन्याभरात हा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासंदर्भातल्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत.
 
 
 
 
राज्य सरकारने सोमवारी दोडामार्ग जिल्ह्यातील जैवविविधतेने समृद्ध असलेला तिलारीचा परिसर 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केला. या संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये तिलारी खोऱ्यातील २९.५३ चौ.किमी राखीव वनक्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बांबर्डे, घाटिवडे, केंद्रे, केंद्रे बुद्रूक, पाटिये, शिरंगे, कोनाळ, ऐनवडे, हेवाळे आणि मेढे या गावातील राखीव वनक्षेत्र आहे. 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'च्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाकडे आहे. अभायरण्याच्या दर्जाचे काटेकोर नियम 'संवर्धन राखीव क्षेत्रा'ला लागू होत नाही. स्थानिकांचे जंगलामधील हक्क यामध्ये अबाधित राहतात. गोवा आणि कर्नाटकातून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'ला जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गामधील तिलारी हा महत्त्वाचा दुवा आहे. कारण, या परिसरात वाघांचे प्रजनन होते. शिवाय रानटी हत्ती, मोठा धनेश, किंग क्रोबा आणि अनेक प्रदेशनिष्ठ उभयसृपांचा या परिसरात अधिवास आहे.
 
 
 
tiger_1  H x W:  
 
 
 
कोणत्याही संरक्षित दर्जाच्या वनक्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी दहा वर्षांचा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येतो. त्यामुळे आता 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रा'च्या व्यवस्थापनासाठी देखील एक आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी 'तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र व्यवस्थापन समिती'ची स्थापना केली आहे. या समितीमध्ये वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी यांच्याअंतर्गत कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. योगेश कोळी, पुण्याच्या 'फाऊंडेशन आॅफ बायोडायर्व्हसिटी काॅन्झर्वेशन'चे डाॅ. वरद गिरी, 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'चे रोव्हीन तोडणकर, फुलपाखरु तज्ज्ञ हेमंत ओगळे, उभयसृपतज्ज्ञ स्वप्निल पवार आणि डाॅ. दिपक देशपांडे या तज्ज्ञांचा समावेश आहे. या आरखड्याच्या निर्मितीमध्ये तिलारी परिसरातील वन्यजीवांची शास्त्रीय माहिती पुरविण्याचे काम या तज्ज्ञ समितीकडून करण्यात येणार असल्याचे गिरीष पंजाबी यांनी सांगितले. येत्या महिन्याभरात ही माहिती आम्ही वन विभागाकडे पाठवणार असल्याचे, ते म्हणाले. आरखड्यानुसार या क्षेत्राचे व्यवस्थापन करण्यासाठी सिंधदुर्ग जिल्ह्याचे उपवनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली एक व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक-उपाध्यक्ष, वनपरिक्षेत्र अधिकारी दोडामार्ग - सदस्य सचिव, हेवाळे-कोनाळ-बांबर्डे-घाडीवडे या गावाचे सरपंच, वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी, मानद वन्यजीव रक्षक-सिंधुदुर्ग, तहसिलदार-दोडामार्ग, गट विकास अधिकारी-दोडामार्ग, पोलीस, कृषी आणि पशुधन अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@