मुंबईच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे!

07 Jul 2020 17:29:12
Potholes_1  H x


‘माय बीएमसी पॉटहोल ६८’ अ‍ॅपवर दीडशेहून अधिक तक्रारी दाखल!


मुंबई : पहिल्याच पावसांत मुंबई शहर व उपनगरांतील रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून मुंबई महापालिकेकडे दीडशेहून अधिक तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. मागील चार-पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यात खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी आधीच खराब रस्ते त्यात संततधार पऊस झाल्याने रस्त्यात खड्डे पडले. सद्या मुंबईत कोरोनाच्या विरोधातील लढ्यात जवळपास सर्वच अधिकारी, कर्मचारी उतरले आहेत. या कामांत गुंतल्यामुळे खड्डे व त्याबाबतच्या केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र उशिरा का होईना काही ठिकाणी खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात आले.


दरवर्षी मुंबईतील रस्ते बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट दिले जाते. मात्र रस्ते कुपोषित आणि कंत्राटदार मालामाल होत असल्याचे पाहावयास मिळते. यंदा तर कोरोनाच्या प्रतिबंधासाठी कर्मचारी-अधिकारी गुंतल्याने आणि मनुष्यबळ कमी असल्याने रस्त्यांच्या कामावर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कंत्राटदारांसाज आयतेच फावले. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे निकृष्ठ दर्जाची झाली असल्याने पावसात अशा रस्त्यांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.


मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते अशा वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. रस्त्यावरील खड्डयांचे फोटो काढून काही जागरुक नागरिक पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमवर ‘माय बीएमसी पॉटहोल ६८’वर अँड्राईड मोबाईलद्वारे अपलोड करत आहेत. तक्रार प्राप्त झाल्यानंतर डांबरी रस्त्यांवरील खड्डा २४ तासांमध्ये तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डा ४८ तासांच्या आतमध्ये भरणे बंधनकारक आहे.
Powered By Sangraha 9.0