मुंबईकर अनुभवतायंत पावसाचा लहरीपणा

07 Jul 2020 19:57:22

mumbai rain_1  



मुंबई
: मुंबईत आज मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोपडून काढले. शुक्रवारपासून मुंबईकरांवर धरलेल्या संततधारेचे आज मुसळधार पावसात रुपांतर झाले. सोबत सोसाट्याचा वारा असल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली. मात्र पुनर्वसू नक्षत्रातच सकाळी ऊन आणि दुपारी मुसळधार पाऊस झाल्याने पावसाच्या लहरीपणामुळे नागरिकांत आश्चर्य व्यक्त कऱण्यात येत आहे. आश्लेषा नक्षत्रात ऊन-पावसाचा खेळ चालतो, पण आज पुनर्वसू (तरणा) नक्षत्रातच ऊन-पावसाचा खेळ अनुभवायला मिळाला. सकाळी लखलखीत ऊन पडले होते. मात्र दुपारनंतर पावसाने जोर धरला. सोबत सोसाट्याचा वारा असल्याने संततधारेचे मुसळधार पावसात रुपांतर झाले आणि मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.




कोरोनामुळे काही प्रमाणात लॉकडाऊन असल्याने अनेक लोक अजूनही घरी बसून आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर पावसाचा त्रास झाला नसला तरी झोपडपट्ट्यांतून राहणाऱ्या मुंबईकरांना त्रास झालाच. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपली घरे प्लास्टिकने शाकारली आहेत. पण आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार बरसणाऱ्या पावसाने छतावरील प्लास्टिकचे आच्छादन उडवून दिले. त्यांच्या घरातच पाऊस गळती सुरू झाली. त्यामुळे अनेकांना भरपावसातच घरावर पुन्हा प्लास्टिकचे आच्छादन घालावे लागले. राज्यावर असलेला कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रावरील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे कोकण विभागांतील सर्वच भागांत आणि प्रामुख्याने मुंबई, ठाणे परिसरात अतिवृष्टी झाली.पुढील २४ तासात मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबईसह सभोवतालच्या परिसरात ढगांची गर्दी झाल्याचे रडार व सॅटेलाइट इमेजेच्या माध्यमातून दिसत आहे.


दक्षिण कोकणचा भागही ढगांनी व्यापला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण विभागातील बहुतांश भागात पुढील ३ ते ४ दिवसांत मुसळधार पावसासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी २४ तासांत २०० ते ३०० मिलिमीटरपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने दिलासा दिला. या भागांत शेतीसाठी उपयुक्त पाऊस झाला आहे. मुंबईत अनेक वर्षे पाणी भरण्याच्या नेहमीच्या ठिकाणी आज काही प्रमाणात पाणी साचले होते. मात्र संध्याकाळी पावसाने विश्रांती घेताच पाणी ओसरले. मालाड साईनाथ सबवे येथे पाणी साचल्यामुळे बसमार्ग ३४५, ४६० मर्यादित सावरकर पूलमार्गे वळविण्यात आले. बसमार्ग २८१ मालाड स्थानक येथे समाप्त करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0