चीन का झुकला?

07 Jul 2020 20:34:28


Modi jinping_1  



गलवान खोर्‍यातील सैन्य माघारीतून चीनने भारतासमोर गुडघे टेकल्याचे सिद्ध झाले. मात्र, ‘ड्रॅगन’ नाव देत उगाचच अतिबलाढ्य, अतिअजस्त्र देश अशी प्रतिमा निर्माण केलेला चीन भारतासमोर झुकला कसा? चीनवर असा कोणता दबाव होता की, दादागिरी, धटिंगणशाही सोडून त्याला नमावे लागले?


भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली आणि प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावणारी तर ५६ इंची छाती मोजण्यासाठी इकडेतिकडे भटकणार्‍यांना झटका बसणारी घटना सोमवारी घडली. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने केलेल्या कथित अतिक्रमणावरुन भारत व चीनमध्ये संघर्ष सुरु होता व त्यात भारताच्या २० सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले, तर ४० ते ४५ चिनी सैनिकही मारले गेले. मात्र, ६० दिवसांपेक्षा अधिक काळ चाललेला हा वाद सोमवारी चिनी सैनिकांनी गलवान, गोगरा, हॉट स्प्रिंग व पँगाँग त्सो या भागातून माघार घेण्यातून आताच्या घडीला तरी संपल्यात जमा झाल्याचे दिसते. चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून दीड ते दोन किमी मागे गेल्याचे वृत्त आले, तसेच चिनी सैनिक आपल्या राहुट्या उखडून टाकत असल्याचे व जेसीबी, रणगाडे वगैरे आल्या पावली परत नेत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले. तत्पूर्वी देशातील काँग्रेसी नेते मंडळी आणि डाव्या उदारमतवाद्यांनी भारताच्या मुत्सद्देगिरी व सैनिकी पराक्रमावर सातत्याने प्रश्नचिन्ह लावण्याचे काम केले. अनेकांना तर प्रत्यक्ष मैदानावर काय सुरु आहे, हे समजून न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारताने चीनपुढे शरणागती पत्करली असे वाटले व ते आनंदाने बेभान होऊन वेडेवाकडे बरळू लागले. पण, सोमवारी वास्तव नेमके काय, हे समोर आले आणि चीनने भारतासमोर गुडघे टेकल्याचे सिद्ध झाले. मात्र, ‘ड्रॅगन’ नाव देत उगाचच अतिबलाढ्य, अतिअजस्त्र देश अशी प्रतिमा निर्माण केलेला चीन भारतासमोर झुकला कसा? चीनवर असा कोणता दबाव होता की, दादागिरी, धटिंगणशाही सोडून त्याला नमावे लागले?

 


सीमेवरील झटापटीतील भारतीय सैनिकांच्या शौर्याने चिन्यांची बत्ती गुल झाली हे खरेच, तसेच नरेंद्र मोदींच्या अचानक निमू-लेह दौर्‍याने त्याला दर्पोक्ती करण्यात अर्थ नाही हेही समजले. मोदींनी सैनिकांना संबोधित करताना, आम्ही भगवान श्रीकृष्णाच्या मुरलीधर रुपाची आराधना तर करतोच, पण त्याचे सुदर्शन चक्रधारी रुप आमचा आदर्श असल्याचे बजावले. नरेंद्र मोदींच्या या शब्दांतूनच चीनच्या पापाचा घडा भरल्याचे आणि घुसखोरी केलीच तर जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी भारत तयार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच अजित डोवाल यांनीही वांग यी यांच्याशी चर्चा करताना, “तुम्ही जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही अखेरपर्यंत लढणारच,” असे ठणकावले. इथेच चीनने आतापर्यंत भारताविषयी जो ग्रह बाळगला होता किंवा इथल्या चिनी एजंट्सनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबाबत त्याच्या मनात जे काही भरवले होते, ते खोटे ठरले आणि चीनच्या घुसखोरीच्या योजनेतली हवा निघाली. दरम्यान, इथे जागतिक राजकारणाचाही संदर्भ आहे. चीनशी सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने जगातल्या सर्व प्रमुख देशांसमोर आपली बाजू भक्कमपणे मांडली. त्यातूनच जपान, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आदी देशांनी भारताला पाठिंबा दिला, तर ‘आसियान’ देशांनाही त्याच्याविरोधात बोलण्याची हिंमत मिळाली व चीन एकटा पडला. आणखी एक मुद्दा म्हणजे, शी जिनपिंग यांनी २०५० सालापर्यंत चीनला जागतिक महाशक्ती करण्याचे स्वप्न देशातील जनतेला दाखवले आहे. पण, कोणत्याही महाशक्तीचा मार्ग व्यापारातून, बाजारपेठेतून जातो आणि सध्याच्या घडीला भारताइतकी प्रचंड बाजारपेठ कुठलीही नाही. आज जगातल्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करत असून २०२५-३० पर्यंत भारत जगातली सर्वात श्रीमंत बाजारपेठ असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, भारताशी संघर्ष कायम ठेवला तर चीनवर संपूर्ण भारतीय बाजारपेठ गमावण्याची वेळ येणे निश्चित होते. आधीच अनेक कंपन्या चीन सोडून भारतात येत असताना, त्या कंपन्यांनी उत्पादित केलेला माल खपवायला भारतीय बाजारपेठच मिळाली नाही तर काय, हा प्रश्न चीनसमोर होता आणि भारताच्या ‘इकॉनॉमिक’ व ‘डिजिटल स्ट्राईक’ने दणका बसलेल्या चीनला हा धक्का सहन करणे शक्य नव्हते. त्यातूनच चीनने लडाखमधून माघार घेण्यात शहाणपण समजले.

 


पुढचा एक मुद्दा म्हणजे, भारताची सैनिकी ताकद. भारताने लडाख वादानंतर इथल्या सीमेवर नेहमीपेक्षा अधिक म्हणजे ४५ हजार सैनिक तैनात केले. तसेच विविध हत्यारे व शस्त्रास्त्रांसह भीष्म रणगाडे, ‘मिग-२९’, ‘मिराज-२०००’, ‘सुखोई-३०’, ‘जग्वार’ ही लढाऊ विमाने आणि ‘अपाचे’ व ‘चिनुक’ ही हेलिकॉप्टर्स चीनला लक्ष्य करण्यासाठी आणली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचा दौरा करुन ‘एस-४००’ एअर डिफेन्स सिस्टीम लवकर देण्याचे आश्वासन मिळवले, तसेच रशियाकडून आणखी ३३ लढावू विमान खरेदीला मंजुरी दिली. तत्पूर्वी हॉर्वर्ड विद्यापीठाच्या बेल्फर सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड इंटरनॅशनल अफेअर्सने भारत व चीनमधील सैनिकी शक्तीचा तुलनात्मक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात चीन कागदी वाघ असल्याचे स्पष्टपणे दिसत होते आणि भारत लडाखचा भौगोलिक फायदा उठवून चीनपेक्षा वरचढ ठरेल, असे म्हटले होते. त्याचाही एक मानसशास्त्रीय परिणाम चीनवर झाला, कारण हा अभ्यास एका त्रयस्थ संस्थेने केला होता. आता चीनने लडाखमधून माघार घेतली आहेच, पण चीनवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. कारण, चीनसारखा कपटी देश जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही आणि त्याचाच प्रत्यय दुसर्‍या एका ठिकाणी आला. चीनने २ जूनला झालेल्या ५८व्या ग्लोबल एन्व्हायर्नमेंट फॅसिलिटी कौन्सिलच्या बैठकीत भूतानच्या पूर्व भागातील साकतेंग वन्यजीव अभयारण्याचा प्रदेश वादग्रस्त असून आमचा असल्याचा दावा केला. शनिवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दाव्याचा पुनरुच्चार केला आणि तिसर्‍या पक्षाने (म्हणजे भारताने) यात दखल देऊ नये असे म्हटले. उल्लेखनीय म्हणजे, १९८४ ते २०१६ पर्यंत भूतान आणि चीनमध्ये २४ वेळा सीमा मुद्द्यावरुन चर्चा झाली असून त्यात कधीही साकतेंग व पूर्व भागातील सीमवादाचा विषय नव्हता. पण, आता चीनने हे नवीनच खुसपट काढले असून भारत नाही तर भूतानची तरी जमीन बळकावू, असा त्याचा मनसुबा असावा. पण, भूतानच्या रक्षणाची जबाबदारी भारतावर असल्याने भारत यात ओढला जाणार आणि त्यावेळीही भारताला डोकलाम किंवा आताच्या गलवान वादासारखाच कणखरपणा दाखवावा लागेल, जेणेकरुन चीनचा जमीन हडपाहडपीचा डीएनए नष्ट होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0