‘कार्यकर्ता’ ते ‘भाजयुमो प्रदेश अध्यक्ष’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jul-2020
Total Views |


Vikrant Patil_1 &nbs
 

एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करणारे विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...


भारतीय जनता पक्ष आजघडीला देशातला सर्वात मोठा आणि प्रभावशाली पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्षाची विचारसरणी, निर्णय घेण्याची क्षमता, असाधारण कामाची पद्धत आदी बाबींमुळे भाजपची लोकप्रियता सध्या कमालीची वाढली आहे. जवळपास गेल्या सहा वर्षांपासून अनेक निवडणुकांमध्ये भाजपचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळते. निवडणुकांमध्ये नागरिकांनी भरभरून मतदान करत पक्षातील नेत्यांना त्यांच्या कामांची पोचपावतीही दिली आहे. इतर पक्षांप्रमाणे घराणेशाहीला येथे स्थान नसल्यानेच मतदार बिनधास्तपणे भाजपवर विश्वास ठेवतात. संघटनेतील महत्त्वाच्या पदांवर ठराविक काळानंतर विविध नेत्यांना संधी देण्याची परंपरा पक्षात असल्यानेच आतापर्यंत भाजप घराणेशाहीपासून अलिप्त राहिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अगदी उदाहरण घ्यायचेच झाल्यास नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे घेता येईल. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीने संघटनात्मक अनेक महत्त्वाचे बदल केले. यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांची निवड करण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला. भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर विक्रांत पाटील यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सध्याच्या घडीला या महत्त्वाच्या पदावर नेमणूक झाली असली तरी येथपर्यंत पोहोचण्यासाठी विक्रांत पाटील यांनी आपल्या जीवनात मोठा संघर्ष केला आहे. पक्षविस्तार तळागाळापर्यंत करण्यासाठी विक्रांत पाटील यांनी अपार कष्ट केले. राज्यात पक्ष सत्तेत असतानाही पक्षाने केलेले काम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विक्रांत यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या याच कामाची दखल घेत विक्रांत पाटील यांची या पदासाठी नेमणूक करण्यात आली आहे.


१२ जुलै, १९८४ साली पनवेल येथे विक्रांत यांचा जन्म झाला. विक्रांत यांचे वडील बाळासाहेब पाटील हे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक. बाळासाहेब पाटील यांनी रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत सतत ४० वर्षे पक्षाला वाढविण्याचे काम निःस्वार्थपणे केले. अगदी पडत्या काळात जिल्ह्यात पक्ष संघटना बांधण्याचे काम अत्यंत परिश्रम घेत, पक्षनिष्ठा जपत त्यांनी केले. त्यामुळे विक्रांत पाटील यांना संघर्ष परिश्रम आणि पक्षनिष्ठा याचे बाळकडू आपल्या वडिलांकडून लहानपणीच प्राप्त झाले. वडिलांप्रमाणेच विक्रांत यांनाही लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती. शालेय जीवनापासूनच त्यांनी अनेक समाजपयोगी कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. नागरिकांचे हित आणि समाजाचे भले करण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असत. यासाठी लहानपणापासूनच ते विविध सामाजिक कार्यांत सहभागी होत. मुळातच समाजसेवेची ओढ असणारे विक्रांत पाटील हे त्यांच्या याच स्वभावामुळे राजकारणाकडे वळले. समाजकार्याची ओढ असली तरी विक्रांत यांनी आपल्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणामध्येही ते नेहमी अग्रेसर राहिले. विक्रांत यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. विक्रांत हे वयाच्या सोळाव्या वर्षापासून म्हणजेच विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात सक्रिय झाले. राजकारणात प्रवेश करतानाही त्यांनी भाजपच्या विचारसरणीलाच पसंती दिली. सुरुवातीला पनवेल विद्यार्थी मोर्चाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडल्यानंतर पनवेल तालुका युवा मोर्चाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. विक्रांत पाटील यांनी ती आनंदाने स्वीकारत या मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यांचे काम पाहून विक्रांत यांच्यावर यानंतर रायगड जिल्हा विद्यार्थी मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. येथेही त्यांच्या उत्तम कामगिरीचा धडाका सुरुच राहिला. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी थेट त्यांची नियुक्ती करण्यात आली. सलग दोन वेळा प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची निवड करण्यात आली. विक्रांत पाटील यांनी अशा विविध जबाबदार्‍या सक्षमपणे पार पाडल्या आहेत आणि आता भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे मोठ्या जबाबदारीचे पद त्यांना देण्यात आले आहे.

 
‘एक कार्यकर्ता ते प्रदेश अध्यक्ष’ हा त्यांचा प्रवास खरंच खूप कौतुकास्पद आहे. संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे काम करणार्‍या एका कार्यकर्त्याला हे पद दिले गेल्याने महाराष्ट्रातील युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे व समाधानाचे वातावरण आहे. या पूर्वी विक्रांत पाटील हे भाजप युवा मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते, तसेच ते पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवकसुद्धा आहेत. एक कार्यतत्पर लोकप्रतिनिधी, जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व, अभिनव पद्धतीने उपक्रम राबविण्याची कार्यशैली, अभ्यासू व्यक्तिमत्व, उत्तम वक्ता, प्रभावीपणे विषयाची मांडणी करण्याचे कौशल्य अशी विक्रांत पाटील यांची जनमानसात ओळख आहे. आगामी काळात युवावर्गाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा त्यांचा मानस असून पुढील वाटचालीसाठी विक्रांत पाटील यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा...!
 
 
 

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@