बाळासाहेबांच्या शिवसैनिकावर सत्ता असताना आंदोलनाची वेळ

06 Jul 2020 18:03:03
Shivsena _1  H



वाढीव विजबिलांचा प्रश्न सोडवण्यासाठी वसईत शिवसेनेचे आंदोलन 



वसई : विजबिलाचा शॉक एव्हाना राज्यातील प्रत्येक विज ग्राहकाला बसला आहे. अर्थात शिवसैनिकांनाही तसाच या वाढीव विजबिलाचा फटका बसला. एकीकडे कोरोनाचे संक्रमण त्यात सर्वत्र भीतीचे वातावरण तर दुसरीकडे आर्थिक चणचण अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक असताना महावितरणने सरासरी भरमसाठ बिले पाठवून सर्वसामान्यांना झटका दिला. याच विरोधात काही शिवसैनिकांनी आपल्याच सरकारला जाब विचारला आहे.


शिवसैनिक दुपारी १२ वाजता वसई पश्चिम येथील वीज कार्यालयात नागरिकांतर्फे चक्क चड्डी-बनियान घालून एक लेखी निवेदन देण्यात येणार आहेत. आपल्याच सरकारला जाब विचारणाऱ्या शिवसेनेच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यभर झाली आहे. याची दखल आता थेट मुख्यमंत्र्यांनाच घेऊन वाढीव विजबिलाबद्दल निर्णय घ्यावा लागणार आहे. राज्यात विज मोफत करू असे आश्वासन देणाऱ्या सरकारवर दुप्पट व तिप्पट विजबिल आकारण्याची वेळ ओढावली आहे. 


मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कित्येक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बुडाले, पगार कपात झाली. या संकट काळातही ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हे आंदोलन छेडले आहे, वसईतील विजग्राहक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे समजते. महावितरणकडून सरासरीच्या नावाखाली आर्थिक पिळवणूक सुरू आहे. तिचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे विजबिल कमी करण्यासंदर्भात मागणी केली जाणार आहे. उद्धव ठाकरे यांना हा घरचा आहेर असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. 





Powered By Sangraha 9.0