‘ब्रीद’च्या दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चनबरोबर दिसणार हृषिकेश जोशी!

    दिनांक  06-Jul-2020 16:00:32
|
hrishikesh joshi_1 &


१० जुलैला ‘ब्रीद’चा दुसरा सिझन अॅमॅझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित! 


 
मुंबई : आर माधवनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ब्रीद’ या वेबसिरीजचा पहिला सिझन गाजल्यानंतर आता दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्यामध्ये अभिषेक बच्चनबरोबर हृषिकेश जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या सिझनमधील हृषिकेशच्या कामाचे सर्व प्रेक्षकांनी तसेच, आर माधवन, मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक तसेच जगभरातील समीक्षकांनी खूप कौतुक केले. त्यामुळे दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेशच्या भूमिकेमध्ये काही अधिकचे चांगले बदल करून ती महत्त्वाची केली गेली आहे. दुसऱ्या सिझनमध्ये हृषिकेशचा इन्स्पेक्टर प्रकाश अक्षरशः धमाल करणार आहे.


‘ब्रीद' च्या पहिल्या सिझनमध्ये आर माधवन, तर दुसऱ्या सिझनमध्ये अभिषेक बच्चन यांच्या बरोबर दक्षिणेतील आघाडीची अभिनेत्री नित्या मेनन यांची देखील महत्वाची भूमिका आहे. ‘ब्रीद या वेबसिरीजमध्ये प्रत्येक सिझनला प्रमुख भूमिकेतील व्यक्तिरेखा बदलत जातात. मात्र ज्या दोन ब्रँड व्यक्तिरेखा प्रत्येक सिझनमध्ये कायम राहणार आहेत त्या म्हणजे हृषिकेश जोशी (इन्स्पेक्टर प्रकाश) आणि अमित साध (इन्स्पेक्टर कबीर सावंत) यांच्या व्यक्तिरेखा!


‘ब्रीद -२’ या सिझनचे जे ट्रायल शो झाले, त्यावेळी हृषिकेश जोशीच्या इन्स्पेक्टर प्रकाशच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची खूप मोठी दाद मिळाली. दुसऱ्या सिजनमधील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हालां तिसऱ्या सिझनमध्ये पाहायला आवडतील ? असा प्रश्न एका सर्वेक्षणात प्रेक्षकांना विचारला असता, हृषिकेश जोशीचे नाव पहिल्या दोनात आलेले आहे.


“मला जेव्हा पहिल्या सिझनसाठी बोलावले गेले तेव्हा माझ्यासाठी वेबसिरीज हे माध्यम नवीन होते. फारशी माहितीही नव्हती. पण हेच आता भविष्य असणार आहे, हे नक्की ठाऊक होते. त्यामुळे हे करायचे असे मी ठरवले. माझी ऑडीशन निर्माते, दिग्दर्शक यांना खूपच आवडली आणि या वेबसिरीजसाठी माझ्याकडून लगेच होकार पण घेण्यात आला. पहिल्या सिझनला आणि त्यातील माझ्या व्यक्तिरेखेला जो प्रतिसाद मिळाला त्यानंतर निर्मात्यांनी मला बोलावून सांगितले की, माझी व्यक्तिरेखा इथून पुढे सर्व सिझनमध्ये कायम राहणार आहे आणि अधिकाधिक महत्वाची होत जाणार आहे आणि त्यानुसार दुसऱ्या सिझन मध्ये माझ्या व्यक्तिरेखेला धरून गोष्ट लिहिली गेली", असे हृषिकेश सांगतो.


पहिल्या सिझनला संपूर्ण भारतातून तसेच अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, आखाती देश येथून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यातील हृशिकेशच्या इन्स्पेक्टर प्रकाशचे तोंड भरून कौतुक केले गेले. अमेरिकेतील सगळ्यांनीच हृषिकेशच्या कामाची प्रशंसा केली तर काही समीक्षकांनी तर खास ट्वीट करून हृषिकेशबद्दल गौरोवोद्गार काढले. आर माधवन यांनी स्वतः ट्वीट करून हृषिकेशच्या कामाची वाहवा केली. तर अभिषेक बच्चननेही हृषिकेशच्या कामाचे कौतुक केले.


‘ब्रीद -२’ हा सिझन अॅमॅझॉनवर प्राईमवर १० जुलै रोजी दाखल होत आहे. ॲबंडंशिया एन्टरटेन्मेंटची निर्मिती असलेल्या या वेब सिरीजचा दुसरा सिझन पहिल्या सिझनप्रमाणेच मयांक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. भवानी अय्यर, विक्रम टुली आणि अर्षद सय्यद यांनी या मालिकेचे लेखन केले आहे.
.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.