प्रभादेवी बीचवर प्रथमच आढळले फ्लेमिंगो; पावसाळ्यात मुंबईत बसवले बस्तान

05 Jul 2020 13:28:55

 flamingo _1  H

 (छायाचित्र - सुनील नायक) 
 
 
 
भर पावसात किनाऱ्यावर फ्लेमिंगोचा मुक्त विहार
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क चौपाटीला लागून असलेल्या प्रभादेवी किनारपट्टीवर आज सकाळी रोहित पक्ष्यांच्या (फ्लेमिंगो) थवा आढळून आला. या किनाऱ्यावर प्रथमच फ्लेमिंगो आढळून आल्याने स्थानिक रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भर पावसात आहोटीच्या वेळी हे पक्षी याठिकाणी मुक्त विहार करताना दिसले. त्यामुळे मुंबईत स्थलांतर करून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांनी पावसाळ्यातही शहरात ठाण मांडल्याचे दिसून आले आहे.
 
 
 

flamingo _1  H  
 
 
 
दरवर्षी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो पक्षी मुंबईच्या खाडीक्षेत्रात स्थलांतर करतात. गुजरातच्या कच्छच्या रणामधून लाखो फ्लेमिंगो पक्षी मुंबईत दाखल होत असल्याचे पक्षी स्थलांतराच्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्याच्या सुमारास 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभायरण्य' क्षेत्रात या पक्ष्यांचे आगमन होते. त्यानंतर मे महिन्याच्या सुमारास हे पक्षी पुन्हा परतीच्या वाटेवर निघतात. मात्र, यामधील बरेच फ्लेमिंगो मुंबईत वर्षभर वास्तव्य करत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ऐरवी पावसाळ्यात कधीही न दिसणारे फ्लेमिंगो पक्षी आता मुंबईच्या आसपासच्या किनाऱ्यावर विहार करताना दिसू लागले आहेत. आज सकाळी प्रभादेवी बीचवर प्रथमच फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याने दर्शन दिले. किनाऱ्यावर प्रभातफेरी करणाऱ्या स्थानिक रहिवाश्यांना हे फ्लेमिंगो आढळून आले.
 
 
 
flamingo _1  H  
 
 
 
स्थानिक रहिवासी मिना चौहान आणि सुनील नायक यांना हे पक्षी दिसले. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावरील प्रभातफेरी दरम्यान अंदाजे ३० ग्रेटर फ्लेमिंगो पक्षी दिसल्याची माहिती हौशी निसर्ग छायाचित्रकार सुनील नायक यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. हे फ्लेमिंगो अल्पवयीन असून प्रथमच प्रभादेवी किनाऱ्यावर फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले. ओहोटीदरम्यान हे पक्षी येथील दलदलीच्या किनाऱ्यावर खाद्यग्रहण करत होते. याविषयी आम्ही 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे तज्ज्ञ डाॅ. राहुल खोत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, फ्लेमिंगो पक्ष्यांचा मुंबईतील स्थलांतर हंगाम संपल्यानंतरही काही हजार फ्लेमिंगो याचठिकाणी वास्तव्य करत असल्याचे निरीक्षण आम्ही नोंदवले आहे. यामधील बरचे फ्लेमिंगो हे अल्पवयीन असतात आणि त्यादरम्यान ते मुंबईतील विविध किनाऱ्यांवर आणि पाणथळ जागांवर स्थलांतर करतात. त्यामुळे प्रभादेवी किनाऱ्यावर दिसलेला फ्लेमिंगो पक्ष्यांचा थवा हा देखील याचप्रकारे शहरात वास्तव्य केलेला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. डाॅ. खोत आणि त्यांची टीम मुंबईत दरवर्षी स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांची मोजणी करते. नोव्हेंबर, २०१९ ते मार्च, २०२० या दरम्यान त्यांनी मुंबईत साधारण दीड लाख फ्लेमिंगो पक्ष्यांनी स्थलांतर केल्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
 
  
Powered By Sangraha 9.0