मुंबईकरांनो सावधान ! साचलेल्या पाण्यातून फिरू नका अन्यथा...

05 Jul 2020 15:26:26


LEPTO_1  H x W:




मुंबई :
पावसाच्या साचलेल्या पाण्यातून फिरल्यास लेप्टोस्पायरोसीसचा धोका उदभवू शकतो. त्यामुळे ज्यांच्या पायाला जखम आहे किंवा खरचटले आहे, अशा व्यक्तींनी पाण्यातून फिरू नये, असा खबरदारीचा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती अशा पाण्यातून गेल्या आहेत त्यांना ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्यांनी ७२ तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार करून घ्यावेत, असे आवाहनही केले आहे.


मुंबईत गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. कामानिमित्त मुंबईकरांना या पाण्यातून जावे लागते. मात्र, अशा पाण्यात लेप्टोचे संभाव्य जंतू असू शकतात. त्यामुळे जखम तसेच खरचटले असलेल्या व्यक्तींचा पावसाच्या पाण्याशी संबंध आला असेल, अशा व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी ७२ तासांच्या आत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत, असे आवाहन महापालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.


लेप्टो कसा होतो?

अतिवृष्टीमुळे साचलेल्या पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस' या रोगाच्या ‘लेप्टोस्पायरा' (स्पायराकिट्स) या सूक्ष्मजंतूचा प्रादूर्भाव असू शकतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी या प्राण्यांच्या मूत्रातून लेप्टोचे सूक्ष्मजंतू पावसाच्या पाण्यात मिसळतात. असे पाणी चुकून तोंडात गेले किंवा एखाद्या व्यक्तीच्या पायाला किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला जखम असेल, अथवा साधे खरचटलेले जरी असेल तरी अशा छोट्याशा जखमेतूनसुद्धा लेप्टोचे जंतू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात.


लक्षणे

लेप्टो झाल्यास ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्राव इत्यादी लक्षणे दिसतात. रुग्णाला श्वसनाला त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होऊ शकते. योग्य वेळी औषधोपचार न मिळाल्यास व्यक्तीचा जीवाला धोका संभवतो.
Powered By Sangraha 9.0