'सरकारचे अपयश झाकण्यासाठी संजय राऊतांकडून महाराष्ट्राची दिशाभूल'

05 Jul 2020 22:12:27

sanjay raut _1  




मुंबई :
"सरकारचे अपयश झाकण्यासाठी राऊत महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत ! कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्र अडकला आहे, त्यापेक्षा तुम्हाला भाजपावर खोटे आरोप करणे महत्वाचे वाटते का ?" असा सवाल विचारत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेनेचे खासदार  संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.



चंद्रकांतदादा पाटील यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. यावेळी ते म्हणतात, "सरकार पडण्याचा मुद्दा जास्त महत्वाचा वाटतो का? दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना त्याचे पाश आणखी घट्ट आवळत चालला आहे, कोरोनामध्ये होणारा मृत्युदर वाढतोय. राज्य सरकारचा प्रत्येक प्रयत्न हा गेल्या तीन महिन्यांपासून दिशाहीन असल्याचे संपूर्ण देशाला माहित आहे. तुमच्या सरकारी कार्यकाळात आपले पोलीस, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी देखील असुरक्षित आहेत. शेतकऱ्यांची बियाणं आणि पुढच्या हंगामातील कर्जाची समस्या तर तुम्हाला सोडवावीशी देखील वाटत नाही. या सर्व चुकांचे आत्मपरीक्षण करून त्या सुधारायच्या सोडून तुम्ही भाजपावर निष्फळ आरोप करत आहात." अशा शब्दांत कोरोना काळात सरकारने केलेल्या चुकांवर त्यांची सणसणीत टीका केली.




'मुंबई महापालिकेच्या गलथान कारभाराबद्दल 'सामना' नेहमीच गप्प'



मुंबई महापालिकेवरून शिवसेनेवर टीका करताना ते म्हणतात, "कित्येक वर्षांपासून तुमच्या हातात मुंबई महानगरपालिका आहे. परंतु दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई पहिल्या पावसात तुंबली आहे. पूर्ण शहर गेले तीन महिने रिकामे होते, योग्य नियोजन करून पावसाळ्याच्या आधी सर्व कामे तुम्ही करू शकला असता पण तसे तुम्ही केले नाही परिणामी मुंबई पुन्हा तुंबली आणि कोरोनाच्या संकटात आता आणखी वाढ झाली आहे. यासर्वांबद्दल सामना नेहमीच गप्प असतो. फक्त केंद्र सरकारच्या चीन विरुद्धच्या कारवाई वर मनाला येईल तशी टीका करणं आणि भाजपा हे सरकार पाडू बघत आहे अशी विधान करणं एवढंच वाचायला मिळतं. मी मांडलेल्या सगळ्या समस्यांच्या उपाययोजनांवर कधी बोलणार राऊत? सत्तेच्या मोहात तुम्हाला जनतेचे प्रश्न दिसत नाही. तुम्ही राज्य शासनाचे अपयश हे भाजपा वर आरोप करून लपवू शकत नाही. जनता सुजाण आहे. शेवटी तीच ठरवेल भविष्य....." असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांची कानउघाडणी केली.



'सामना' मधून केली होती भाजपवर टीका


दरम्यान, येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधील 'रोखठोक' या सदरात संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. सध्या विधानपरिषदेवरील १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीवरून राज्यात पेच निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या सदस्यांची मुदत १५ जूनलाच संपली आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुचविलेल्या नव्या सदस्यांची निवड झाली असती तर त्यांनी कामाला सुरुवात केली असती. परंतु, सध्या या सदस्यांच्या नियुक्तीसाठी अनुकूल नसल्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. त्यावरून संजय राऊत यांनी राज्यपाल आणि भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
Powered By Sangraha 9.0