विकास दुबेविरोधात सरकारची कारवाई, जेसीबीने पाडले घर

04 Jul 2020 16:21:45

vikas dube_1  H




लखनऊ :
कुख्यात गुंड आणि आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबे याच्याविरोधात उत्तर प्रदेश सरकारने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कानपुर प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने शनिवारी विकास दुबे याचे घर पाडले आहे.तसेच, विकास दुबेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके विविध भागात छापा टाकत आहेत.




विकास दुबेचे घर पाडण्यासाठी अंमलबजावणी पथक आज जेसीबी मशीनसह कानपूरच्या बिकरू गावी पोहोचले. याभागात विकास दुबेचे कुटुंब वास्तव्यास आहे.अंमलबजावणी पथकासह मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा या कारवाई दरम्यान उपस्थित आहेत. विकास दुबेने आपले घर बेकायदेशीररित्या बांधल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, प्रशासन त्याच्या सर्व मालमत्तेची चौकशी करणार आहे. त्याची सर्व बँक खातीही जप्त केली जाणार आहेत. विकास दुबे यांचे वडील रामकुमार दुबे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासह, विकासाची सर्व बँक खाती सील केली गेली आहेत.




चौबेपूर चकमकीत चौबेपूर एसओ विनय तिवारी यांची भूमिका लक्षात घेता आयजी रेंज कानपूर यांनी त्यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. विनयसोबत झालेल्या चकमकीसंदर्भात एसटीएफची टीमही चौकशी करत आहे. विकासच्या फोनद्वारे काही पोलिसांचे नंबर प्राप्त झाले आहेत त्यांचीही चौकशी केली जात आहे. याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना ताब्यात घेतले आहे. गेल्या गुरुवारी रात्री कानपूरच्या बिकरू गावात गुंड विकास दुबे याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने आणि त्याच्या गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत एक पोलीस उपअधीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. लखीमपूर खेरीच्या एसपी पूनम यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, "नेपाळ सीमेवर विकास दुबेबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. नेपाळला लागून १२० किलोमीटरची सीमा आहे, त्याठिकाणी चार पोलीस ठाणे आहेत, सर्वत्र त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच, एसएसबी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. जिल्ह्याच्या सीमेवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तपास सुरू आहे." विकास दुबेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची ५०हुन अधिक पथके विविध भागात छापा टाकत आहेत.

Powered By Sangraha 9.0