मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा; समुद्रात १५ फुटांपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता

04 Jul 2020 11:31:04

Mumbai_1  H x W



मुंबई महापालिकेकडून सतर्कतेचा इशारा


मुंबई : कुलाबा वेधशाळेतर्फे आज मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी ‘अतिवृष्टी’ होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीची भरती समुद्रात असणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आपल्या अखत्यारीतील सर्व २४ विभाग कार्यालयासह सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क, सुसज्ज आणि कार्यतत्पर राहण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती विषयक परिस्थितीचा अंदाज घेत सर्वच यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.


आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे सुसज्ज असून २९९ ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे संच कार्यान्वित रहातील, याचीही खातरजमा करण्यात आली आहे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाने त्यांची पूर बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात ठेवावीत, असे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रासाठी असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्यांना आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीकरिता तत्पर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


तसेच भारतीय तटरक्षक दल, नौसेना यांच्या समन्वय अधिकाऱ्यांना त्वरीत मदतीकरिता तत्पर रहाण्यास सांगण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात विद्युत पुरवठा करणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमासह इतर विद्युत वितरण कंपन्यांना त्यांच्या पथकांसह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.




Powered By Sangraha 9.0