कव्हर स्टोरी

04 Jul 2020 23:57:57


O henry_1  H x



‘मॉर्निंग बीकन’ दैनिकातला मी लिंबूटिंबू वार्ताहर आहे. ‘न्यूजरूम’मधल्या एका कोपर्‍यात मला जुने डुगडुगणारे टेबल आणि हात नसलेली खुर्ची आहे. मला पगाराऐवजी आठवडाभरात मी दिलेल्या ज्या बातम्या छापतात, त्यांचा मोबदला मिळतो. पण, मला साहित्यात थोडी रुची आणि गम्य आहे. रविवारच्या अंकासाठी मी सतत लिहीत असतो. आमचे खडूस संपादक मिस्टर टकिन्सन त्यातला एखादा मजकूर आवडला तर प्रकाशित करतात. शनिवारी मला त्याबद्दल जादाचे पाच डॉलर्स मिळतात. त्या शनिवारी आणि रविवारी माझी चंगळ असते. अशाच एका शनिवारी मी खुशीत होतो. आज मला आठवडाभराची मजुरी आणि उद्याच्या अंकातल्या स्टोरीचे जादा पाच डॉलर्स मिळणार होते. पण, हाय! मी घरी निघायच्या वेळेस टिप येऊन तडमडला.


टिपचं खरं नाव कोणास ठाऊक! वयाने पंचविशीतला असला तरी पन्नाशीचा दिसतो. दारूमुळे त्याची काया तुंदिलतनू झाली आहे. अकाली टक्कल पडले आहे. तोंडातले काही दात गुंडांशी मारामार्‍या करताना पडलेत आणि उरलेले निकोटीनमुळे पिवळे झालेत. एका इमारतीत जेनीटर म्हणून काम करताकरता तो गुन्हेगारी वर्तुळातल्या खबरी पोलिसांना आणि वार्ताहरांना पुरवतो. त्यातून त्याला शनिवारी रात्री मौजेपुरते पैसे मिळतात. या खबरी पुरवण्यामुळे त्याचे नाव ‘टिप’ पडले आहे. कडकी असेल तेव्हा तो माझ्याकडून एखादा डॉलर उसना मागतो आणि परत कधीच देत नाही.


टिपला पाहून मी मनातल्या मनात एका डॉलरवर उदक सोडलं आणि म्हणालो, “बोल.”
आज उसने पैसे नकोत. मीच तुला एक डॉलर मिळवून देतो. तू चार डॉलर्स गुंतवलेस तर आठ दिवसांत त्याचे पाच डॉलर्स होतील. २५ टक्के व्याज.


“आपण बाहेर जाऊन बोलू.”


आम्ही बाहेर आल्यावर त्याने खुलासा केला, “एका भन्नाट स्टोरीचा विषय आहे. तुला फक्त चार डॉलर्स खर्चावे लागतील. त्यावर स्टोरी लिहिलीस की संपादक तुला पाच डॉलर्स देतील.
मी काहीच प्रतिसाद दिला नाही. तो उत्साहाने सांगू लागला, “काही तासांपूर्वीच एक सुंदर, भाबडी, ग्रामीण तरुणी, वय वर्षे २०-२२, ग्रीनबर्ग गावाहून फेरी बोटीने न्यूयॉर्कमध्ये - पहिल्यांदाच आली आहे.


“अशा शेकडो येतात, नोकरीसाठी किंवा नाटकात काम मिळवण्यासाठी.


“हो, पण ती त्यातली नाही. ती तिच्या प्रियकराला शोधण्यासाठी आली आहे. योगायोगाने मी तिथे होतो. तिचा भांबावलेला चेहरा आणि भिरभिरती नजर पाहून मी तिची चौकशी केली. ती सात-आठ वर्षांची असताना त्यांच्या शेजारचं ब्राऊन कुटुंब गाव सोडून न्यूयॉर्कला आलं. त्यातला जॉर्ज तिचा वर्गमित्र. त्यांची घट्ट मैत्री होती. ग्रीनबर्ग सोडण्यापूर्वी जॉर्जने आणि तिने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. पण, ब्राऊन कुटुंब न्यूयॉर्कला आल्यावर त्यांचा संपर्क तुटला. आता तिचं गावातल्याच हायरम टॉड’ नावाच्या मुलाशी लग्न ठरलं आहे. पण, त्यापूर्वी शक्य झालं तर तिला जॉर्जला भेटायचं आहे. जॉर्ज सापडला नाही तरच ती हायरमशी लग्न करणार आहे. आज पहाटे ती घरातल्या घोड्यावरून काही मैल रपेट करून नदीकिनारी आली. तिथून फेरी बोटीने न्यूयॉर्कला. योगायोगाने तिला मी भेटलो. मी मिसेस मॅकगिनसच्या घरात राहतो. त्यांच्याकडे तिला एका दिवसापुरती खोली आणि जेवणाची सोय करून तुझ्याकडे आलो.
“यात आमच्या संपादकांना आवडेल अशी स्टोरी कुठाय?”


तू तिच्याशी बोल. तुला उद्याच्या अंकात निवेदन देऊन जॉर्ज ब्राऊन शोधता आला तर सनसनाटी स्टोरी होईल; अन्यथा तिचं प्रबोधन करून तिला तिच्या गावी परत पाठवलंस तर या विषयावर चिंतनपर लेख होईल. फक्त चार डॉलर्स खर्च येईल. तिला दिवसभर आसरा आणि जेवण दिल्याबद्दल माझ्या घरमालकिणीला एक डॉलर, तिला परत पाठवण्यासाठी फेरी बोटीचं तिकीट दोन डॉलर्स आणि माझा मेहनताना एक डॉलर,” पिवळ्या पडक्या दातांचं बोळकं दाखवीत तो हसला.


क्षणभर विचार करून आणि टिपची दया येऊन मी होकार दिला आणि त्याच्याबरोबर निघालो.
आम्ही पोहोेचलो तेव्हा ती कॉफी घेत होती. खरोखरच ती सुंदर होती. चेहरा भाबडा होता. अंगावरचा भडक रंगाचा झगा खेडवळ असूनही तिला शोभत होता. टिपने आमची ओळख करून दिली.


“ही एडा आणि हा माझा मित्र चार्मर्स. हा ‘मॉर्निंग बीकनमध्ये उपसंपादक आहे. तू जॉर्जबद्दल नीट माहिती दिली तर वर्तमानपत्राच्या नेटवर्कमधून तो जॉर्जला कदाचित शोधू शकेल.
पण, एडाने जॉर्जच्या लहानपणीच्याच आठवणी सांगितल्या. त्याचे वडील नेमके कोण होते, हे तिला सांगता आलं नाही. इतक्या वर्षांत जॉर्जने कधी संपर्क केला नाही आणि आणि तिलाही लिहितावाचता येत नाही! नुसत्या ‘जॉर्ज ब्राऊन’ या नावाने न्यूयॉर्कमध्ये काय शोधणार, कपाळ! तिला कसंबसं हे समजावलं. आईवडिलांनी बघितलेल्या मुलाशी लग्न करण्यातच हित आहे, हेही पटवून दिलं. घरी परतायला राजी केलं. टिपच्या घरमालकिणीला एक डॉलर दिला. तिघे फेरी बोटीच्या स्टेशनवर गेलो. शेवटची बोट सुटणारच होती. तिचं तिकीट काढलं. एक डॉलर आणि ऐंशी सेंट्स. उरलेल्या पैशातून तिला गुलाबाची फुलं घेऊन दिली. बोट सुटल्यावर तिने कठड्यावरून आमच्याकडे बघून रुमाल हलवला. आम्ही परत फिरलो.


“टिप, तू माझी फसवणूक केलीस. या गोष्टीत न काही थ्रिल आहे न काही समाजप्रबोधन. त्यापेक्षा तू माझ्याकडून थेट एक डॉलर घेतला असतास तर परवडलं असतं,” त्याला एक डॉलर देत मी बोललो.


“तू अजून सगळी स्टोरी कुठे ऐकली आहेस? ती ज्याला शोधत होती, तो जॉर्ज मीच आहे. पण माझा असा अवतार आणि लायकी, म्हणून मी तिला ओळख दिली नाही. आता ती त्या हायरमशी लग्न करून सुखी तरी होईल,” तो रुद्ध कंठाने उत्तरला आणि समोरच्या बारमध्ये अदृश्य झाला.

- विजय तरवडे

(ओ हेन्रीच्या ‘No Story' या कथेवर आधारित.)

Powered By Sangraha 9.0