केवळ महाराष्ट्र राज्य रखडले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jul-2020
Total Views |


uddhav thackeray_1 &



कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर पहिल्या पाचांमध्ये आला तरी त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला यश आले असते, तर संपूर्ण देशाची परिस्थिती खूप चांगली राहिली असती. आघाडी सरकारच्या अपयशामुळे महाराष्ट्र राज्य तर अडचणीत आलेच, पण त्याने देशालाही अडचणीत आणले. आघाडी सरकारने सक्रियतेने आणि प्रभावीपणे कोरोना रोखण्यासाठी काम केले, तरच या संकटातून राज्याची सुटका होईल; नाही तर बाकी राज्यात परिस्थिती सुधारली आणि फक्त महाराष्ट्र रखडला हे सध्याचे चित्र अधिक गडद होत जाईल.



‘गोव्यामध्ये पर्यटकांना परवानगी’ आणि ‘मुंबई महानगर क्षेत्रात घोषित - अघोषित लॉकडाऊन’ लागू या दोन बातम्या गुरुवारी एकाच वेळी प्रसिद्ध झाल्या. मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, कल्याण, डोंबिवलीत उघडपणे ‘लॉकडाऊन’ लागू केला. मुंबई शहरात पुन्हा ‘लॉकडाऊन’ लागू केल्याचे जाहीर केले नसले तरी अनेक निर्बंध अचानक वाढविण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट काही कमी होताना दिसत नाही. देशभरातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या ६,०४,६४१ इतकी झाली. जागतिक पातळीवर विचार करता कोरोनाबाधितांच्या संख्येच्या बाबतीत भारत आता चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या २७ लाख ७९ हजार आहे. त्यानंतर ब्राझील (१४.५३ लाख), रशिया (६.५४ लाख), भारत (६.०४ लाख) आणि इंग्लंड (३.१३ लाख) यांचा क्रम लागतो. ही पहिल्या पाच देशांची स्थिती वर्ल्डओमीटर वेबसाईटवरील माहितीनुसार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येच्या बाबतीत मात्र भारत पहिल्या पाच देशांच्या यादीत नाही. कोरोनामृत्यूच्या बाबतीतही अमेरिका १ लाख ३० हजार संख्येसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ब्राझील (६०,७१३), इंग्लंड (४३,९०६), इटली (३४,७८८), फ्रान्स (२९,८६१) या देशांचा क्रमांक लागतो. कोरोनामृत्यूच्या बाबतीत भारतातील संख्या १७,८५५ आहे व आपला देश आठव्या स्थानावर आहे. भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत विचार केला तर प्रगत देशांपेक्षा भारतातील कोरोनाबाधितांची संख्या खूप कमी आहे आणि कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण तर खूपच कमी आहे. कोरोनामृत्यूच्या बाबतीत भारत जगातील अनेक देशांपेक्षा खूपच सावरलेल्या स्थितीत आहे.


महाराष्ट्रामुळे भारत ‘टॉपर’


कोरोनाचा संसर्ग झालेल्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत टॉप पाच देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील या आघाडीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील ६ लाख ४ हजार कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्रातील १ लाख ८० हजार आहेत, तर देशातील १७,८३४ कोरोनामृत्यूंमध्ये महाराष्ट्रातील ८,०५३ आहेत. देशातील कोरोना मृत्यूंपैकी ४५ टक्के महाराष्ट्रातील आहेत. राज्यात कोरोनाच्या चाचण्या क्षमतेपेक्षा कमी केल्या जातात व त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी दिसते आणि कोरोनामृत्यूंची संख्या दडवली जाते हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यानंतर राज्य सरकारने आधी जाहीर न केलेले एक हजार कोरोनामृत्यू नंतर एकूण संख्येत दाखविले. पण, राज्यात कोरोनाच्या संख्येच्या बाबतीत सर्व काही आलबेल नाही हे उघड झालेच. जागतिक पातळीवर भारत कोरोनाबाधितांच्या बाबतीत चौथ्या स्थानावर पोहोचला. त्यामुळे संपूर्ण देशात हे संकट वाढल्याचा समज होईल. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली तरी हे संकट मुख्यतः महाराष्ट्रात आहे. इतर बहुतेक राज्यांत परिस्थिती खूप नियंत्रणात आहे. गोव्याने पर्यटकांसाठी राज्याची दारे खुली केली आहेत. तेथील जनजीवन सामान्य होण्याच्या टप्प्यावर आल्याचे त्यातून दिसून येते. देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोना मृत्यूंची संख्या किती आहे हे पाहिले की महाराष्ट्रच ही साथ रोखण्यात मागे पडल्याचे स्पष्ट होते.


महाराष्ट्र राज्य १ लाख ८० हजार कोरोनाबाधितांसह देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ तामिळनाडू (९४,०४९) व दिल्ली (८९,८०२) या दोन राज्यांचा क्रमांक लागतो. या तीन राज्यांत मिळून कोरोनाबाधितांची संख्या ३,६४,१४९ आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी ६० टक्के या तीन राज्यात आहेत. त्यानंतर इतर राज्यांच्या बाबतीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झालेली दिसते. चौथ्या क्रमांकावर गुजरात (३३,२३२) तर पाचव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश (२४,०५६) ही राज्ये आहेत. १० हजार ते २५ हजार कोरोनाबाधित या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, तेलंगण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश व बिहार ही नऊ राज्ये आहेत. उरलेली २२ राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी दहा हजारांपेक्षा कमी कोरोनाबाधित आहेत. देशात गुरुवारपर्यंत कोरोनामुळे एकूण १७,८३४ मृत्यू झाले. त्यापैकी ८,०५३ महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली (२,८०३), गुजरात (१,८६७) व तामिळनाडू (१,२६४) या राज्यांचा क्रम लागत असला तरी त्यांच्या संख्येत आणि महाराष्ट्राच्या संख्येतील फरक जाणवणारा आहे. या चार राज्यांखेरीज इतर सर्व राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशात कोरोनामृत्यूंची संख्या प्रत्येकी एक हजारांपेक्षा कमी आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या उत्तर प्रदेशच्या तुलनेत साडेसात पट आहे, तर कोरोना मृत्यूंची संख्या अकरा पट आहे. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख आहे, तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९ कोटी ९८ लाख आहे. लोकसंख्येतील फरक ध्यानात घेतला तर महाराष्ट्रातील कोरोनाची तीव्रता इतर राज्यांच्या तुलनेत किती जास्त आहे, हे ध्यानात येते.


कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचारानंतर बरे होणार्‍या रुग्णांच्या प्रमाणाच्या बाबतीतही महाराष्ट्राची स्थिती फारशी चांगली नाही. देशामध्ये बरे होण्याचे प्रमाण ५९.५२ टक्के आहे. या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आहे. मोठ्या राज्यांमध्ये बिहार (७७ टक्के), मध्य प्रदेश (७६ टक्के), गुजरात (७२ टक्के), उत्तर प्रदेश (६९ टक्के) या राज्यांमधील बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी प्रमाण असलेली १४ राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत व त्यामध्ये महाराष्ट्राचा (५१ टक्के) समावेश होतो. केरळने कोरोनाची साथ रोखण्यात यश मिळवले, अशी चर्चा झाली. पण, केरळचे बरे होण्याचे प्रमाण ५३ टक्के म्हणजे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमीच आहे. महाराष्ट्रात निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले म्हणून कौतुक चालत असले, तरी या प्रमाणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पंचवीसाव्या स्थानावर आहे, हे ध्यानात घ्यावे. ही गुरुवारची आकडेवारी आहे.


कोरोनामुळे महाराष्ट्र आर्थिक संकटात


जागतिक पातळीवर कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत चौथ्या स्थानावर असला तरी ही समस्या मुख्यतः महाराष्ट्र, दिल्ली व तामिळनाडू या राज्यांची आहे हे आपण वर पाहिले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर कोरोनाची समस्या मुख्यतः मुंबई महागर क्षेत्र व पुण्याची आहे. १ जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण १ लाख ८० हजार कोरोनाबाधितांपैकी १,४१,७७८ म्हणजे ७८ टक्के रुग्ण मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यातील आहेत. मुंबईतील ७९,१४५ कोरोनाबाधितांची संख्या ही त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबई, ठाणे, पुणे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यामुळे येथील समाजजीवन ठप्प झाले आहे. नेमका मुंबई-ठाणे-पुणे हा राज्यातील सर्वाधिक आर्थिक घडामोडी घडणारा विभाग आहे. या भागातील व्यवहार ठप्प झाल्यामुळे लोकांच्या रोजगारावर विपरित परिणाम झालाच आहे, पण त्यासोबत राज्य सरकारचे कराचे उत्पन्नसुद्धा खूप घटले आहे. आता राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारासाठी कर्ज काढण्याची वेळ आली असून कर्मचार्‍यांची पगारकपात करण्याचा विचार चालू असल्याची बातमी आहे. तसेही मार्चचे वेतन पूर्ण दिले नव्हते आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा हप्ताही थांबविला आहेच. महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणात राहिला नाही, याचे गंभीर दुष्परिणाम सरकारसकट सर्वांनाच भोगावे लागत आहेत. कोरोना रोखण्यातील राज्याच्या अपयशाचा फटका देशालाही बसला आहे. एकट्या मुंबई शहरात देशाच्या ३० टक्के आयकर आणि ६० टक्के कस्टम ड्यूटी जमा होते, अशी माहिती आहे. याच प्रमाणात इतर विविध कर संकलन होते. मुंबई ठप्प झाल्यामुळे राज्यासोबत देशातील कर संकलनाला फटका बसला आहे.


महाराष्ट्रातील संकटामुळे अखिल भारतीय स्तरावरील कामांनाही फटका बसत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडूसह अन्य राज्यांमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अखिल भारतीय स्तरावर सीएची परीक्षा घेता येणे कठीण आहे, असे ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’ने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत जागतिक पातळीवर पहिल्या पाचांमध्ये आला तरी त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आहे. राज्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यात महाविकास आघाडी सरकारला यश आले असते, तर संपूर्ण देशाची परिस्थिती खूप चांगली राहिली असती. आघाडी सरकारच्या अपयशामुळे महाराष्ट्र राज्य तर अडचणीत आलेच, पण त्याने देशालाही अडचणीत आणले. आघाडी सरकारने सक्रियतेने आणि प्रभावीपणे कोरोना रोखण्यासाठी काम केले, तरच या संकटातून राज्याची सुटका होईल; नाही तर बाकी राज्यात परिस्थिती सुधारली आणि फक्त महाराष्ट्र रखडला हे सध्याचे चित्र अधिक गडद होत जाईल. त्याची जबर किंमत राज्यातील जनतेला मोजावी लागेल.
 

-डॉ. दिनेश थिटे
 

@@AUTHORINFO_V1@@