भारतीयांनो, चिनी अपप्रचाराला बळी पडू नका!

    दिनांक  04-Jul-2020 23:59:15   
|


china_1  H x W:

  


चीन आणि पाकिस्तानशी युद्ध कसे लढले जात आहे? भारतीय लष्कर चीनशी लडाख सीमेवर लढत आहे, त्याचवेळी भारतीय लष्कर पाकिस्तानशी नियंत्रण रेषेवर दररोजच लढत आहे. याशिवाय भारतीय लष्कर काश्मीर खोर्‍यात नियमितपणे दहशतवादविरोधी कारवाईही करत असते. याच वेळी देशाच्या मध्यभागात माओवादी, हिंसक कारवाया करतच आहेत.‘हायब्रीड वॉर’ ३६५ दिवस सुरू


चीन आणि पाकिस्तानशी चाललेले संकरित-युद्ध (हायब्रीड वॉर) वर्षाचे ३६५ दिवस देशाच्या अंतर्गत भागांत आणि सीमांवर, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शेजारील देशांतही सुरूच असते आणि भविष्यात युद्ध असेच लढले जाईल. जर चीनने सर्वंकश युद्ध सुरू केले, तर पाकिस्तानही पाक सीमेवर दुसरी आघाडी उघडेल. त्याचवेळी शहरांत सक्रिय असलेले दहशतवादी सेल्स आणि मध्य भारतातील माओवादी, हिंसक कारवायाही वाढवतील. शिवाय, काही स्थानिक मुद्द्यांवर सरकारविरोधी चळवळीही सुरू होऊ शकतात. लष्कर आपल्या शत्रूंशी सीमेवर युद्ध लढत असताना, देशांतर्गत हिंसेचा डोंबही उसळू शकतो. भारत-चीन सीमेवर जर १९६२ सारखे पारंपरिक युद्ध झाले तर ते कसे लढले जाईल? चीन भारतीय प्रदेशात आणखीही काही ठिकाणी आपले सैन्य घुसवेल. पाकिस्तान, काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरही ‘जिहाद’ पुकारण्यासाठी फिदायीन मोकाट सोडेल. त्याला निश्चितच भारतीय लष्कर प्रत्युत्तर देईल. तसे करताना दोन्हीही बाजूंनी प्राणहानी होईल. चीन त्यांची हानी झाल्याचे मान्यच करणार नाही आणि त्यांची नेमकी मनुष्यहानी, भूमिहानी किती झाली हे समजण्यास आपल्याकरिता तरी काही उपाय नाही. कारण, त्यांच्या बाजूची माध्यमे त्यांच्या संपूर्ण नियंत्रणात आहेत. पाकिस्तानही त्यांची हानी झाल्याचे मान्य करणार नाही. मारले गेलेले लोकही त्यांचे नव्हतेच असेही म्हणतील.


लष्कराने दिलेल्या आकड्यांवर शंका


भारत सरकार आणि लष्कर आपल्या बाजूची प्राणहानी जाहीर करतील, तसेच चीन आणि पाकिस्तानची अनुमानित हानीही जाहीर करतील. आता खरे प्रचारयुद्ध सुरू होईल. मानसशास्त्रीय युद्ध सुरू होईल. भारतीय माध्यमांतील एक हिस्सा सरकारने दिलेल्या आकड्यांवर शंका घेईल, कारण ते चीन वा पाकने घोषित केलेल्या आकड्यांशी जुळत नसतील. काही विरोधी पक्ष, माध्यमांचे भाग, काही कार्यकर्ते चिनी प्राणहानीच्या आकड्यांचे आणि पुन्हा जिंकून घेतलेल्या भूभागाचे पुरावे मागतील. कम्युनिस्ट पार्टी भारतीय विजयास खोटे ठरवेल आणि सांगेल की, हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेले आकडे आहेत. त्यावर त्यांचा विश्वास नाही. काही गैरसरकारी संघटना, माध्यमप्रसार केंद्रे, महाजालावर आधारित नव्या वाहिनी, गुप्तपणे चीनकडून अर्थसाहाय्यित लोक याकरिता मेणबत्ती मोर्चे काढतील की, सरकार गरीब बिचार्‍या लष्करास चीन-पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात उगाचच लोटून देत आहे. सामाजिक माध्यम योद्ध्यांचे युद्ध या गैरसरकारी संघटना, दिवाणखान्यात, सोप्यावर बसून काम करणार्‍या सामाजिक माध्यम योद्ध्यांचे साहाय्य मिळवतील. त्यांना युद्ध आणि देशाच्या राष्ट्रीय हिताबाबत/स्वारस्यांबाबत कल्पनाही नसेल. ते 'Save the Indian soldier from war, make peace not war, we want peace, we want jobs not war, economy first not war, India stands for peace, we stand with innocent soldiers' असले ट्विटर हँडल समाजमाध्यांवर सुरू करतील. लक्षात घ्या, ते ‘हुतात्मे’, ‘शूर सैनिक’ इत्यादी शब्द वापरणार नाहीत. त्यांचे शब्द ‘निरागस सैनिक’, ‘निरपराध सैनिक कुटुंबीय’ असे असतील. भारत सरकारच युद्धखोर आणि शांतीविरोधी असल्याचे चित्र रंगवणारे जनमत तयार केले जाईल.


देशाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी


या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या भूमिकेस धक्का पोहोचेल आणि पाश्चात्य जगातले चिनी अर्थसाहाय्यित माध्यम योद्धे भारताची प्रतिमा अल्पसंख्यांकांविरोधी रंगवू लागतील. पुरावा म्हणून ते भारतातील काही विरोधकांचे भारतीय माध्यमांतील चिनी व पाकिस्तानी प्रेमीकरवी लिहिलेले अहवाल आणि लेख सादर करतील. यामुळे सशस्त्र दलांना युद्ध प्रभावीरीत्या लढणे अवघड होईल. अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीर पुन्हा परत मिळवण्याची संधी घटेल. शिवाय, त्या भूमिकेमुळे आपल्या देशांचे/सैनिकांचे मनोधैर्य खच्ची होईल आणि आपल्या सैन्याचा घात होईल. यापूर्वी कंदाहारमधून आपल्या नागरिकांची सुटका करायची होती आणि त्याकरिता आपल्याला दहशतवाद्यांना सोडून द्यावे लागले, तेव्हाही असाच खेळ खेळला गेलेला होता.


अर्थसामर्थ्याचा वापर करून प्रचारयुद्धयंत्रणा निर्माण


चीनने त्यांच्या प्रचंड अर्थसामर्थ्याचा वापर करून, आपल्या देशात एक प्रचारयुद्ध यंत्रणा उभारलेली आहे. काही अवकाशप्राप्त सैनिक, कार्यकर्ते, बुद्धिवंत, उदारमतवादी आणि इतर अनेकांना विकत घेतलेले आहे, जे भारतीय मुद्रित, विजकीय/इलेक्ट्रॉनिक आणि सामाजिक माध्यमांतून; प्रादेशिक, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून चिनी प्रचारास प्रकाशित करतात. काही गैरसरकारी संघटनाही देशात विकासविरोधी कार्यक्रम आणि चळवळी करण्यासाठी विकत घेतल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून आर्थिक प्रगती थांबेल. देश कायमच आंदोलनामध्ये अडकेल आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होईल.


अवनती, घातपात आणि मानसिक खच्चीकरणाचे हे युद्ध तुम्ही कसे हाताळाल?


देशाविरुद्धचे मानसशास्त्रीय युद्ध चार पातळ्यांवर लढले जात आहे. उद्देश, देशाला हे सांगण्याचा आहे की, चीन आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या खूप समर्थ आहे, म्हणून त्यांच्याशी लढू नका, ते जे म्हणतील ते ऐका. या मानसशास्त्रीय युद्धाचे लक्ष्य सरकार, सशस्त्र दले, माध्यमे आणि देशाचे सामान्य नागरिक आहेत. सरकारला राजनैतिक पातळीवर चीनसोबत बोलणी सुरू करणे भाग पाडण्यात हे युद्ध अपयशी ठरलेले आहे. सशस्त्र दलांचे खच्चीकरण करण्यातही हे युद्ध अपयशी ठरलेले आहे. गलवान येथे लष्कराने दिलेला जशास तसे स्वरूपाचा प्रतिसाद त्यांचे मनोबल सिद्ध करतो. मात्र, माध्यमांचा एक भाग निश्चितपणे अवनत झालेला आहे आणि चीन व पाकिस्तानची भाषा बोलत आहे. त्याचे पर्यवसान काही भारतीय, चीन हे युद्ध जिंकत आहेत व आपले सैन्य ‘बॅकफूट’वर आहे, अशा मताचा झालेला आहे, जे चुकीचे आहे.


अपप्रचार युद्धास प्रत्युत्तर


या अपप्रचारयुद्धास आपण कसे प्रत्युत्तर देऊ? आपल्याला अवनतीस गेलेले लोक, गैरसरकारी संघटना ओळखाव्या लागतील, ज्या चिनी प्रचार करत आहेत. त्यांपैकी काही त्यांच्या ज्ञात आर्थिक स्रोतांहून अधिक समृद्ध जीवन जगत आहेत. त्यांना देशाबाहेरून पैसा मिळत आहे. त्याचा तपास करावा लागेल. या देशाच्या दंडविधानानुसार त्यांच्यावर कार्यवाही करावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चीन आणि पाकिस्तानमध्ये आपल्यालाही माहितीचे युद्ध छेडावे लागेल. चिनी माध्यमे माहितीयुद्धापासून संपूर्णपणे सुरक्षित आहेत. तसेच चीनमधील सामाजिक माध्यमांत चीनबाहेरून कुणीही प्रवेश करू शकत नाही. मग चीनविरोधातील आक्रमक माहितीयुद्धास तुम्ही सुरूवात कशी करणार?


चीनमधून बाहेर प्रवास करणार्‍यांना लक्ष्य करा

खूप मोठ्या संख्येने चिनी नागरिक चीनबाहेर शिक्षण, व्यापार आणि पर्यटनार्थ प्रवास करत असतात. चीनमधील सरकारकडून, विशेषतः तिबेट आणि चीनच्या अल्पसंख्यांक शिनजियांग प्रदेशांतील चिनी नागरिकांचे मानवी हक्कभंग होतात. त्याबद्दल त्यांना अवगत करता येईल. चीनमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य नाकारल्यामुळे, एका दाम्पत्यास ‘एक मूल धोरणअसल्याने आणि आर्थिक मंदीमुळे सामाजिक तणाव भरपूर आहेत. चिनी समाजातील या कमजोर बाजू हुडकल्या पाहिजेत आणि माहिती युद्धाकरिता त्यांचा वापर केला पाहिजे. चीन इतर अनेक देशांत राज्यव्यवस्था उलथून चीनला सोयीस्कर अशी व्यवस्था आणत असतो. कोरोना विषाणू आणि त्याने जगभर घडवलेल्या हानीपायी चीनविरुद्ध संतप्त असलेल्या सर्व देशांनी मिळूनच हे करायचे आहे. जे देश चीनच्या जुलुमी धोरणाविरुद्ध पाय रोवून उभे राहिले, त्या, दक्षिण चिनी समुद्रातील अनेक देशांविरुद्ध चीनने अवलंबलेल्या आक्रमक धोरणाविरुद्धही जग संतप्त आहे. अशा सर्व देशांसोबत आपण युती करून, चीनविरुद्ध संयुक्त, सर्वसमावेशक, माहितीयुद्धाची मोहीम चालवली पाहिजे. ज्यावेळी चीनला लक्षात येईल की, तो स्वतःच या माहितीयुद्धास बळी पडत आहे, त्यावेळी, संभवतः त्याची जगाप्रतीची आक्रमकता कमी होईल. चीनविरुद्धचा माहितीयुद्धाचा हा हल्ला, आजपासूनच चीनविरोधी सर्व देशांच्या मदतीने सुरू होऊ दे. आशा आहे की, भारतीय समाजमाध्यमांवरील आणि मुख्य माध्यमांतीलही प्रचारयुद्धास बळी पडणार नाहीत आणि लडाखसारख्या अत्यंत कठीण आणि अवघड क्षेत्रातील सीमांचे संरक्षण करणार्‍या भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे राहतील.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.