लोकमान्य टिळक आणि कामगार चळवळ

31 Jul 2020 13:22:09

Lokmany 14_1  H

हिंदी मजुरांनीही आंतरराष्ट्रीय संघटनेत सामील व्हावे म्हणजे हिंदी कामगारांचे हक्क प्रस्थापित व्हायला मदत होईल म्हणून हिंदी मजूर संघाचे प्रतिनिधी लोकमान्य टिळक आणि डॉ. वेलकर यांना आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने भरवलेल्या परिषदेचे विशेष आमंत्रण होते. या सभेत केलेल्या भाषणात टिळक म्हणाले की हिंदुस्थानातील मजूर चळवळ अजून बाल्यावस्थेत आहे आणि ती जेव्हा देशभरात भव्य रूप धरण करेल तेव्हा ती जागतिक संघटनेशी सहकार्य करेल.यावरून वाटू शकेल की भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक विदेशात भरलेल्या मजूर परिषदेच्या मंचावर कसे ? राजकारण, समाजकारण, अर्थकारण, लेखन या क्षेत्रात मुक्तपणे वावरणारे टिळक आणि कामगार प्रश्नांचा संबंध आला कसा ?


स्थळ- इंग्लंड
२५ डिसेंबर १९१९ रोजी ‘इंटरनॅशनल ब्रदरहूड वेल्फेअर असोसिएशन’ची शाखा लंडन येथे सुरु होणार होती, त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होता. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने भरवलेल्या परिषदेचा उद्देशही तसाच महत्त्वाचा होता, तो म्हणजे अमेरिकेतील आणि इंग्लंडमधील मजुरांना एकत्र आणणे. मुख्य म्हणजे हिंदी मजुरांनीही या आंतरराष्ट्रीय संघटनेत सामील व्हावे आणि त्यानुषंगाने हिंदी कामगारांचे हक्क प्रस्थापित व्हायला मदत होईल म्हणून हिंदी मजूर संघाचे प्रतिनिधी लोकमान्य टिळक आणि डॉ. वेलकर यांना विशेष आमंत्रण होते, त्यांना व्यासपीठावर जागाही दिली गेली होती. या सभेत केलेल्या भाषणात टिळक आणि वेलकर यांनी सांगितलं की हिंदुस्थानातील मजूर चळवळ अजून बाल्यावस्थेत आहे आणि ती जेव्हा देशभरात भव्य रूप धरण करेल तेव्हा ती जागतिक संघटनेशी सहकार्य करेल.


यावरून वाटू शकेल की भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक विदेशात भरलेल्या मजूर परिषदेच्या मंचावर कसे ? राजकारण, समाजकारण, अर्थकारण, लेखन या क्षेत्रात मुक्तपणे वावरणारे टिळक आणि कामगार प्रश्नांचा संबंध आला कसा ?


१८९० साली टिळकांनी ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चा राजीनामा दिल्यानंतर उत्पन्नाचा प्रश्न निर्माण झाला. १८९१ साली त्यांच्याच निवासस्थानी कायद्याचे वर्ग सुरु केले. याच काळात टिळकांनी, उत्पन्नही वाढावे आणि स्वदेशीला प्रोत्साहन मिळावे म्हणून काही रक्कम गुंतवून दोन भागीदारांसह लातूर येथे सूतगिरणी सुरु केली. लातूर हे हैद्राबाद संस्थानचे कापसाचे केंद्र होते. या सूतगिरणीसोबत टिळकांचा संबंध डिसेंबर १९०० पर्यंत राहिला.


दुसर्‍या बाजूला राजकरणात टिळकांनी स्वतःला झोकून दिले होतेच. काँग्रेसची चळवळ तळागाळात पोहोचली तरच तिला खर्‍या सर्वसमावेशक स्वरूप येईल आणि ती लोकचळवळ होईल असेच टिळकांच्या मनात होते. ते म्हणतात, “काँग्रेस जर जनतेची बनवी असं वाटत असेल तर वाटत असेल तर कामगार, कारागीर आणि सुशिक्षित वर्ग, या सर्वांचा विचार करून त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय काँग्रेसला अपेक्षित उद्दिष्ट गाठता येणार नाही. यात आपण बहुजानंचा विचार करत असलो तरी त्यामुळे काँग्रेसच्या मार्गात अडथळा येणार नाही. राजकीय चळवळी व कामगार चळवळी विभागता येत नाहीत, त्या एकमेकींना पूरक आहेत. हिंदी मजूर वर्गाला वगळून स्वातंत्र्य मिळवले तर फक्त गोरी नोकरशाही जाऊन काळी नोकरशाही येईल,” असं टिळकाचं मत होतं.


‘अखिल भारतीय हिस्टरी काँग्रेस’च्या ६१व्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे. व्ही. नाईक यांनी ‘लोकमान्य टिळक आणि कार्ल मार्क्स’ या शोधनिबंधाचं वाचन केलं होतं. त्यानुसार, ‘रॅडिकल’ या इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या ‘कामगार चळवळीचा वापर करण्याचे मार्ग’ या शीर्षकाचा निबंध टिळकांनी १ मे, १८८१ च्या मराठा मध्ये पुनर्मुद्रित केला. त्या लेखासाठी टिळकांनी प्रस्तावनाही लिहिली होती. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “मानवी संस्कृतीच्या प्रगतीमध्ये जगातल्या अनेक अनिष्ट गोष्टी नाहीशा करायच्या बाकी आहेत. त्या दृष्टीने कार्ल मार्क्सचा ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ अतिशय महत्त्वाचा आहे. कामगारांचे भांवलदारांकडून होणारे निर्दयी शोषण व त्यातून निर्माण होणारा वर्गसंघर्ष याचे सखोल विश्लेषण मार्क्सने मार्मिकपणे केले आहे.” यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की, ‘केसरी’ आणि ‘मराठा’ सुरु झाल्यानंतर लगेचच कदाचित भारतात पहिल्यांदाच कार्ल मार्क्सच्या ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ची ओळख महाराष्ट्राला करून दिली, १८८१ साली. ज्या काळात भारतात कम्युनिस्ट पार्टीचं नावही लोकांना माहीत नव्हतं, त्या काळात टिळकांनी सामान्य जनांसमोर ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ ठेवला.


१९०३ मध्ये ‘प्लान्टर्स लेबर बिल’ आणलं गेलं जे चहाच्या मळ्यात काम करणार्‍या कामगारांच्या विरुद्ध होतं. त्यामुळे या बिलाला टिळकांनी ‘केसरी’मधून विरोध दर्शविला होता. अशा विषयांमध्ये टिळक नेहमी कामगारांच्या बाजूने उभे राहत असत. १९०६ साली टिळकांनी, कामगारांच्या हक्कासाठी, सरकारविरुद्ध झगडण्यासाठी हिंदी मजुरांची एक मजबूत संघटना असावी असं सार्वजनिक सभेत सुचवलं होतं. ते म्हणाले होते. २५ वर्षांपूर्वी समाज जागृती करणे हेच एक कर्तव्य आपल्या पुढार्‍यांपुढे होतं. पण आजच्या काळात त्यांनी लोकांच्या मनोवृत्तीला योग्य वळण दिले पाहिजेत. आपल्याकडे धंदेवाल्यांच्या युनियन्स नाहीत. पोस्टमनची एखादी युनियन असती तर त्यांचे म्हणणे कबूल झाले असते, त्यांचा नुकताच झालेला संप हा त्यांची युनियन नसल्यामुळे अयशस्वी झाला. भांडवलदार व मजूर यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये संप होतात. मजुरांचे मालकांशी काही वैर नसते. परंतु, पोटाला भरपूर मिळावे म्हणून तेथील कामगार रुसतो, संप करतो आणि त्यांची युनियन असल्यामुळे कारखानदारांना त्यांचे म्हणणे मान्य करावे लागते. संप करणे म्हणजेच रुसून बसणे हा काही गुन्हा नव्हे, आपले म्हणणे मान्य करून घेण्यासाठी कामगारांनी संप केले पाहिजेत ह्या मताचे टिळक होते. १९०७ मध्ये अशाच एका प्रसंगी ते म्हणाले होते राजकीय प्रश्न लष्करी सत्तेने दडपता येत असले तरी पोटापाण्यासाठी करावे लागणारे संप असे दडपता येत नाहीत. १९ जून १९०७ च्या ‘केसरी’मध्ये टिळकांनी ‘रेल्वे युनियन’ या मथळ्याचा एक लेख लिहिला होता. त्यात लिहिलं आहे की आजच्या काळात पाश्चात्यांच्या धर्तीवर भारतात युनियन संघटित करून ती चालवण्याची अत्यंत गरज आहे. रेल्वे खात्यात मोठ्या संखेने असलेल्या हिंदी नागरिकांनी ठरवले तर अशा तर्‍हेने एकजूट करून युनियन चालवणे त्यांना सहज शक्य आहे. यातूनच लक्षात येतं की कामगार संघटनांच्या आणि त्यांच्या हक्कांबाबत टिळक किती आग्रही होते.


१९०६ मध्ये मुंबईत एक सहकारी स्वदेशी भांडार सुरु झाले, ते म्हणजेच ‘बॉम्बे स्वदेशी को-ऑपरेटिव्ह स्टोअर.’ टिळक आणि जमशेदजी टाटा यांच्या संकल्पनेतून या संस्थेची स्थापना झाली होती. टिळक त्याचे एक संचालक होते. पण मुंबईतील गिरणी मालकांनी याचा गैरफायदा घेऊन कापडाचे दर वाढवले, ज्याचा स्वदेशी चळवळीवर विपरीत परिणाम झाला. यामुळे टिळक आणि वासुकाका जोशी दर आठवड्याला मुंबईला जाऊन दर कमी करण्याबाबत गिरणी मालकांशी बोलणी करत असत. परंतु, हे मालक लोक तयार नव्हते. धनंजय कीर लिखित चरित्रात म्हटल्यानुसार टिळकांना दर आठवड्याला या एका कामासाठी सतत मालकांच्या घरी जाऊन जोडे झिजवावे लागत होते. काही मालकांकडून मानहानीची बोलणी ऐकून घ्यावी लागली तर काहींनी टाळाटाळीची उत्तरं ऐकवली.


१९०७ साली सुरत काँग्रेसचे अधिवेशन होते. सुरतेला निघण्यापूर्वी टिळकांचे चिंचपोकळी या मुंबईतील कामगार वस्तीत टिळकांचे भाषण झाले होते. त्यात त्यांनी स्वदेशी चळवळ ही कामगारांच्या हिताची आहे हे संगितले. स्वदेशीचा वापर वाढला तर गिरण्यांमधील काम वाढेल, त्यामुळे कामगारांचं काम वाढेल आणि त्याचा कामगारांनाच फायदा होईल, हेच स्वदेशी चळवळीचे उद्दिष्ट आहे. कामगारांनी आपल्या फायद्यासाठी दारू पिणे बंद करावे असाही सल्ला त्यांनी दिला. तसेच ६ जून व ७ जून १९०८ रोजी चिंचपोकळीतच टिळकांनी दोन सभांमध्ये भाषणे केली. गिरणी कामगारांनी आणि त्यातही जॉबर आणि हेडजॉबर लोकांनी गिरणी कामगारांच्या कमिट्या बनवून त्याद्वारे त्यांच्यामध्ये पसरत असलेल्या दारू पिण्याच्या वृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं टिळकांनी सांगितलं.


२२ जुलै, १९०८ रोजी टिळकांवरच्या दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचा निकाल लागला. न्यायमूर्ती दावर यांनी या निकालामध्ये टिळकांना सहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. रातोरात ही वार्ता मुंबईभर आणि पुढे देशभर पसरली. सूडभावनेने टिळकांना ही शिक्षा सुनावली त्यामुळे मुंबईच्या कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली, त्यांनी सर्वत्र बंद पुकारला. लोकमान्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली म्हणून सहा दिवसांचा संप पुकारला गेला. भायखळा, परळ वगैरे भागातील बहुतेक लोक या बातमीमुळे गिरणी कामगार कामावर गेले नाहीत, त्यातून काही गिरण्या बंद पडल्या. फक्त कामगारांनीच नाही, तर मध्यमवर्गीयांनी, दुकानदारांनी आणि व्यापार्‍यांनीही हरताळ पाळला. सर्व बाजार बंद झाले. यामुळे पोलीस आणि लष्कराला पाचारण केले गेले. मुंबईच्या बहुतेक सर्वच भागात पोलीस विरुद्ध कामगार असा संघर्ष पेटला होता. लोक चवताळून जाऊन त्यांनी वस्तीवर आलेल्या लष्करावर दगडांचा वर्षाव केला. यात मराठी भाषिकच नव्हते, तर कारखान्यातले कामगार, शिपाई, सर्व जाती धर्माचे लोक यात सामील झाले होते. यामध्ये लोकांचे दंगे झाले, पोलिसांनी जमावावर गोळ्या झाडल्या. या कारवाईत कित्येक जखमी झाले, तर जवळपास ७० ते ७५ जणांचा मृत्यू झाला.


या संपाची माहिती रशियातील कामगार नेता लेनिन याला समजली तेव्हा तो म्हणाला, ‘हिंदुस्थानी कामगारांचा हा पहिलाच राजकीय संग्राम असून तो उज्ज्वल भविष्यकाळाचा निर्देशक आहे, मी ह्याचे स्वागत करतो.’


टिळकांचे एक चरित्रकार ग. त्र्यं. बापट यांच्या म्हणण्यानुसार कामगारांचा हा संप, आक्रोश म्हणजे टिळकांनी मजूर वस्तीत जाऊन व्याख्याने देऊन जी जागृती केली होती तिचा हा परिणाम होता. टिळकांच्या पहिल्या राजद्रोहाच्या खटल्यानंतरही असाच संप गिरणी कामगारांनी केला होता.


पहिल्या महायुद्धाच्या काळात १० जून, १९१८ रोजी मुंबई सरकारने तेथील टाऊन हॉलमध्ये युद्धपरिषद भरवली होती. त्या सभेला टिळक, गांधी, जिना या बड्या नेत्यांना आमंत्रित केलं गेलं होतं. तेथे केलेल्या भाषणात टिळकांनी स्वराज्याचा उल्लेख केला. हे ऐकून उपस्थित असलेल्या राज्यपाल लॉर्ड विलिंग्डन याने चालू भाषणात हस्तक्षेप करून टिळकांना थांबवले. बाकी भाषणांच्या बाबतही असेच झाले. या भाषणाच्या वेळी समोर मुंबईतील शेकडो मंडळी होती. टिळकांबाबत घडलेली ही गोष्ट बाहेर पसरली. नेमकं त्याच १९१८ वर्षाच्या अखेर राज्यपाल विलिंग्डन सेवानिवृत्त होऊन आपल्या मायदेशी परतणार होता. इंग्रज अधिकार्‍यांना वंदनीय, माननीय मानणारे कित्येक भारतीय होते. अश्यांनीच एकत्र येऊन आपल्या निवृत्त होणार्‍या महामहीम राज्यपालांचा सत्कार करून त्यांना मानपत्र द्यावे असे ठरवले आणि विलिंग्डन स्मारक मुंबईत व्हावे म्हणून एक सभा ११ डिसेंबर १९१८ ला त्याच टाऊन हॉलमध्ये भरणार होती. विलिंग्डन याने केलेला टिळकांचा अपमान मुंबईकर विसरले नव्हते. या स्मारकाला विरोध करण्यासाठी तेथे मोठी झाली. या गर्दीला विरोध करण्यासाठी मवाळ गटाने मोठ्या प्रमाणात गिरणी कामगार बोलावले होते. पण ज्याने टिळकांचा अपमान केला त्या विलिंग्डन स्मारकासाठी ही सभा आहे हे समजल्यावर एकाएकी सगळे कामगार उलटले आणि स्वराज्यवादी गटात सामील होऊन त्यांनी ही सभा उधळून लावली.


दरम्यान चिरोलवर दावा ठोकण्यासाठी टिळकांनी इंग्लंडला जायची तयारी केली आणि २४ सप्टेंबर, १९१८ ला टिळकांनी मुंबई सोडली. त्या आधीच्या १९१७ साली टिळकांनी बॅ. बाप्टिस्टा यांना इंग्लंडला होमरूल च्या कामासाठी पाठवलं होतं. पहिल्या महायुद्धानंतर मजूर पक्ष प्रकाशात आला. यापुढे मजूर पक्ष खर्‍या अर्थाने पुढे येईल असं मानून, ‘होमरूल लीग’ने मजूर पक्षाशी संबंध जोडावेत, असं टिळकांनी सांगितलं. टिळकांनी पुढे हेच केलं. होमरूल चळवळीत टिळकांसोबत असणार्‍या अ‍ॅनी बेझंट यांचेही पूर्वी मजूर पक्षाशी संबंध होते. त्याच्या ३०-४० वर्षांपूर्वी दादाभाई नौरोजी इंग्लंडमध्ये असताना मजूर पक्षाच्या सभांना जात असत.


बाप्टिस्टा यांनी तेथील मजूर पक्षासोबत काम सुरु केलं. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या मागण्या पक्षासमोर मांडायला सुरुवात केली. २३ ऑक्टोबर, १९१७ च्या पत्रात बाप्टिस्टांनी टिळकांना लिहिल्यानुसार त्यांनी त्यावेळी तेथील सहा ठिकाणी भाषणं दिली आणि लोकांसमोर भारताच्या मागण्याही सांगितल्या. त्यात मजूर पक्षाने भारताच्या मागण्यांना समर्थनही दिलं होतं. या काळात बाप्टिस्टांनी मजूर पक्षाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहून भारतीय स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करून घेत असत. बाप्टिस्टांच्या याच प्रयत्नांचं फळ म्हणूनच २५ जानेवारी, १९१८ मजूर पक्षाच्या परिषदेत भारतीय स्वातंत्र्याचा ठराव पारित झालं. यामागे टिळकांचे मोठे मार्गदर्शन होते.


इंग्लंडमध्ये मजूर पक्षासोबत संबंध प्रस्थापित करून टिळकांनी काम सुरु केलं होतं. १९१८ साली इंग्लंडमध्ये झालेल्या निवडणुकीत टिळक आणि त्यांचे सहकारी पूर्णतः मजूर पक्षाच्या बाजूने होते. १८ नोव्हेंबर रोजी टिळकांनी मजूर पक्षाला निवडणूक प्रचारासाठी दोन हजार पौंड दिले होते. या निवडणुकीत मजूर पक्षाला एकूण मताच्या २५ टक्के मतं मिळाली, देशातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून मजूर पक्ष पुढे आला. यावर टिळकांची प्रतिक्रिया होती की भलेही पक्षाचा पराभव झाला असेल पण आता तो मुख्य विरोधी पक्ष असल्यामुळे नक्कीच आपल्या उपयोगी पडू शकेल.


टिळकांच्या मते फक्त इंग्लंडच्या मजूर पक्षावर अवलंबून राहून चालणार नाही, तर भारतीय कामगार चळवळ आणि ब्रिटीश कामगार चळवळ ह्या परस्पर पूरक बनविल्या पाहिजेत. याच काळात १९१७ मध्ये रशियन क्रांती झाली होती. रशियातील बोल्शेविक पक्षाचे विचार इंग्लंडमध्येही पसरत होते, ह्या विचारांची ओळख टिळकांना तिथे आणखीनच चांगल्या प्रकारे झाली. बोल्शेविक विचारांमुळे टिळक प्रभावित झाल्याची नोंद लंडन व मुंबई येथील गुप्त कागदपत्रातही सापडल्या आहेत. इंग्लंडमध्ये झालेल्या विविध भाषणांमध्ये टिळक भारतीय ब्रिटिश राजवटीचा उल्लेख भांडवलशाही राजवट असा करत, हे भांडवलशाही सरकार मजुरांचे शोषण करते असं टिळकांनी जाहीरपणे म्हटल्याचा उल्लेखही गुप्तचरांनी केला आहे. हा प्रभाव अर्थातच मजूर पक्षाचा होता. हाईण्डमन, सकलातवाल अशा तेथील समाजवादी, कम्युनिस्ट नेत्यांशीही टिळकांचा संपर्क वाढला होता.


नोव्हेंबर १९१९ मध्ये टिळक भारतात परतले. २९ नोव्हेंबर १९१९ मध्ये परळमध्ये एल्फिन्स्टन मिलजवळ झालेल्या सभेत टिळकांना मुंबईतील कामगारांनी टिळकांना मानपत्र दिलं. त्यात टिळक म्हणाले, मुंबई ही भांडवलदारांची नसून कामगारांची आहे, तुम्ही कामगार संघटन स्थापन करावे असा संदेश इंग्लंडमधील कामगार वर्गाने दिला आहे, हे संघटन जेव्हा सशक्त होईल तेव्हाच तुम्हाला तुमचे अधिकार प्राप्त होतील.” डिसेंबर १९१९ मध्ये मद्रासमध्ये झालेल्या सभेत कामगारांनी टिळकांना मानपत्र दिले त्यात, ‘आपल्या देशात लोकशाही स्थापन होईल तेव्हा कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होणार नाही’ असे आश्वासन त्यांनी दिले.


टिळकांना अपेक्षित कामगार चळवळ ही मजूरांना, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि हक्क मिळवण्यासाठी जागृत करणारी होती. इंग्लंडमधली किंवा रशिया मधला मजूर विरुद्ध भांडवलदार हा संघर्ष टिळकांनी बघितला होता, त्यांच्यामध्ये आणि भारतीय कामगारांमध्ये असलेला फरक, त्यांचे प्रश्न हेही त्यांच्या कामाचा विषय होते. इंग्लंडमध्ये असताना त्यांचे सहकारी डॉ. वेलकर यांच्याशी टिळकांची वेळोवेळी याबाबत चर्चा होत असे. त्यावेळी बोलताना त्यांनी आपलं म्हणणं मांडलं होते. त्यानुसार त्यांना इंग्लंडप्रमाणेच भारतातही कामगार चळवळ उभी रहावी असं वाटत होतं पण भारतातली सामाजिक परिस्थिती बघून त्यांना या चळवळीला हात घालायचा होता. पाश्चात्त्य देशांप्रमाणे त्यांना आपल्या देशातल्या मजूर आणि भांडवलदार यांच्यात तेढ निर्माण करायची नव्हती. टिळकांच्या मनात कामगार संघटन करणे हे होतच परंतु ती समाज कल्याणाच्या दृष्टीने हितावह व्हायला हवी होती, ज्यातून संघर्ष निर्माण न होता संघटन तयार होऊन, चळवळ सुरु व्हावी, प्रत्येक कामगाराच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊ शकेल. मजूर वर्ग हा कायमच दुर्लक्षित घटक राहिला आहे, त्यातूनच त्यांच्यामध्ये पसरणारी व्यसनाधीनता वाढत गेली. त्याचसाठी मद्यपाननिषेध करणारी चळवळ टिळकांनी महाराष्ट्रात सुरु केली होती पण सरकारने यात अडथळा आणला. मजुरांची स्थिती सुधारावी हीच त्यांची इच्छा होती.


फेब्रुवारी १९२० मध्ये कॉ. डांगे टिळकांना भेटायला गेले असता टिळकांनी त्यांना देशाबाहेर आणि चहाच्या मळ्यात वेठबिगारीने मजुरांची भरती आणि निर्यात करणार्‍या कंत्राटदारांच्या अड्ड्यावर निदर्शने करायला सांगितली. कामगारांमध्ये काम करून, त्यांची ट्रेड युनियन त्यांची अखिल भारतीय परिषद भरवण्याच्या दृष्टीने काम पाऊलं उचलायलाही सांगितलं. टिळक इंग्लंडच्या कम्युनिस्ट नेत्यांशी संपर्कात होते. त्यापैकीच सकलातवालयाचं टिळकांना मे १९२० मध्ये इंग्लंडहून पत्र आलं, ज्यात त्यांनी टिळकांना भारतात आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट पक्ष स्थापन करण्याबाबत सुचवलं. त्यात ते असेही म्हणाले की, तुम्ही मला या पक्षाचा प्रतिनिधी करा ज्यामुळे मी इंग्लंडमध्ये पक्षाचं काम करून आपले विचार येथे पोहोचवू शकेन.


मुळातच विदेशातील कम्युनिस्ट चळवळ किंवा सर्वच कामगार चळवळी या भांडवलदार आणि मजूर या वर्गसंघर्षावर आधारित होत्या. पण त्यामध्येही आणि भारतात असलेला मूलभूत फरक टिळक जाणून होते. कारण, पाश्चात्य देशांमध्ये वर्गसंघर्ष होता, तर भारतात प्रामुख्याने जातीसंघर्ष दिसून येत होता. त्यामुळे भारतातल्या लोकांचा विचार करताना त्यांच्यामध्ये असलेल्या या भेदाचाही विचार करणं आवश्यक होतं आणि मुख्य म्हणजे सुरुवातीपासून टिळकांचं याबाबतचं व्हिजन स्पष्ट होतं. १८९२ मध्ये औद्योगिक परिषदेत टिळकांनी एक निबंध वाचला होता, त्यात त्यांनी जातीव्यवस्थेबाबत म्हटलं आहे की, ‘पारंपरिक व्यवसाय टिकवून धरण्यासाठी आणि परस्पर मदतीचा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून आर्यवंशीयांनी निधर्मी आणि सामाजिक संघटन या दृष्टीने जातींकडे पहिले पाहिजे. कामगार वर्गाची नैतिक आणि ऐहिक स्थिती उंचावण्याची जातीव्यवस्थेचा वापर वापर हिंदूंनी केला पाहिजे,’ असं मत त्यांनी त्यामध्ये व्यक्त केलं होतं.


याच काळात दिवान चमनलाल हे गृहस्थ पुढे आले. ते मूळ पंजाबचे होते. त्यांना आयटक या कामगार संघटनेची परिषद घ्यायची इच्छा होती, ज्यात महत्त्वाच्या नेत्यांनी यावं हा आग्रह त्यांचा होता. ही गोष्ट टिळकांच्या सल्ल्याशिवाय होऊ शकत नव्हती. त्यामुळे त्यांनी टिळकांची भेट घ्यायचं ठरवलं. जुलै १९२० मध्ये टिळक मुंबईच्या सरदारगृहात होते. त्यांचं आजारपण चालू होतं. २० जुलै, १९२० ला चमनलाल हे टिळकांना भेटायला गेले. त्यांनी टिळकांपुढे अखिल भारतीय मजूर परिषदेचा विषय मांडला आणि त्याचे उपाध्यक्ष होण्याची विनंती केली. टिळकांनी तो प्रस्ताव मान्यही केला. टिळक म्हणाले, “मजूर वर्गाकडे माझं पूर्ण लक्ष आहे, दुसर्‍या राजद्रोहाच्या शिक्षेनंतर माजूरांनी माझ्याबद्दल केवढं प्रेम दाखवलं होतं.” सहज बाहेर पडून आलं तर आपल्याला बरं वाटेल असं म्हणून चमनलाल, टिळकांना घेऊन गेले व हिंडवून आणलं. त्यांच्या उघड्या गाडीमुळे लागलेल्या वार्‍याचा परिणाम झाला. टिळकाच्या आजारपणात तापाची भर पडली. अंतिमतः १ ऑगस्ट १९२० च्या मध्यरात्री टिळकांनी अखेरचा श्वास घेतला आणि कित्येक महत्त्वाची कामं सोडून टिळक निघून गेले.


- पुष्कराज घाटगे

संदर्भ
अव्यक्त लोकमान्य- प्रताप वेलकर
लोकमान्य टिळक- धनंजय कीर
लोकमान्य टिळक यांची गेली आठ वर्षे- आप्पाजी विष्णू कुलकर्णी
लोकमान्य टिळक यांचे चरित्र- खंड ३- न चिं केळकर
लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक- य दि फडके
टिळक आणि कामगार चळवळ- श्री अ डांगे
मंडालेचा राजबंदी- अरविंद व्यं गोखले
लोकमान्य टिळक- त्र्यं ग बापट
Powered By Sangraha 9.0