कवितेतील लोकमान्य गर्जना!

31 Jul 2020 17:02:36
Lokmany 6_1  H






डोळ्यांसमोर काही भव्य-दिव्य-असामान्य दिसले की शब्दसाधकांच्या लेखणीची पहाट होते असा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांची महती कवी भूषणाने आजन्म गायली; जगभरातून त्या थोर चरणांवर काव्याची अगणित स्तुतिसुमने आजही वाहिली जातात. तेव्हा एकोणीस-विसाव्या शतकात उदयास आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या क्रांतिसूर्याला नमन करण्यासाठी, त्याच्या कीर्तीचे गोडवे गाण्यासाठी, त्याचे स्मरण करण्यासाठी कवींनी आपली लेखणी ओली केली नसती तरच ते नवल होते. या कवींनी आपापल्या प्रतिभेचा आधार घेऊन लोकमान्य साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा या लेखात त्यातील काव्याचा आस्वाद घेताना लोकमान्यांच्या चरणावर आपण पुन्हा पुन्हा लीन होऊया.



लोकमान्यांच्या प्रतिमेकडे बघताना, मला निबिड अरण्यात स्वतःच्या मर्जीत वावरणार्‍या, घनगर्द आयाळ मानेवर आणि डोळ्यात स्वाभिमानी अंगार असलेल्या केसरीचा भास होतो. अरण्याच्या गर्भातून सत्वकेसरीची एक दीर्घ गर्जना त्याच्या ध्वनी-लहारींसकट झाडा-पानांना ओलांडत वेशीपर्यंत जाते, लुप्त होते. ती ऐकून नकळत कपटाने फोफावले कोल्हे-कुत्रे कान ताठरतात, हे आव्हान आपल्याला झेपणार नाही, हे जाणून आपापल्या बिळात गुप्त होतात. भारतातही इंग्रजांचे राज्य असेच कपटाने फोफावले. त्यांविरुद्ध अनेकांनी तलवारी उपसल्या, ज्या शत्रूकडून कापून काढण्यात आल्या किंवा जमिनीचे तुकडे देऊन त्यांना शांत करण्यात आले. अशांच्या कपट्यांविरुद्ध स्वराज्याची गर्जना देणारा एक केसरी म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक! डोळ्यांसमोर असे काही भव्य-दिव्य-असामान्य दिसले की शब्दसाधकांच्या लेखणीची पहाट होते, असा आपला इतिहास आहे. छत्रपती शिवरायांची महती कवी भूषणाने आजन्म गायली; जगभरातून त्या थोर चरणांवर काव्याची अगणित स्तुतिसुमने आजही वाहिली जातात. तेव्हा एकोणिसाव्या-विसाव्या शतकात उदयास आलेल्या या क्रांतीसूर्याला नमन करण्यासाठी, त्याच्या कीर्तीचे गोडवे गाण्यासाठी, त्याचे स्मरण करण्यासाठी कवींनी आपली लेखणी ओली केली नसती, तरच ते नवल होतं. या लेखात त्या काव्याचा आस्वाद घेण्याचा आणि अनुषंगाने देण्याचा प्रयत्न मी करणार आहे.



भग्न कणांच्या भूतांभोवती
लिविलिवीत काळोख पसरला
अर्ध्यामुर्ध्या चतकोरावर
कृतार्थतेचा चिवट मसाला
तिथे तुझी घुमताच गर्जना
बाळगुटीची झिंग उडाली
धुळीतल्या कणाकणात
कोऽहंची कोडी उलगडली 



कवी वसंत बापट यांच्या ‘कण मातीचे सजीव झाले’ या कवितेतल्या या ओळी. लोकमान्यांपूर्वी आणि नंतर काय स्थिती होती आणि झाली, ते या कवितेला सांगायचे आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध तलवारी उपसल्या गेल्या, १८५७चे स्वातंत्र्य समर आपल्याला माहिती आहेच. परंतु, इंग्रज हा अंग-शत्रू नव्हता; तो मेंदूने चाल खेळणारा, स्वतःत असलेल्या बुद्धीची जाणीव असणारा आणि भारतीयांची नस ओळखलेला शत्रू होता. भारतीय हे पहिल्यापासूनच भावनिक लढले; राग-लोभ-मत्सर-फितुरी हे आपले जगप्रसिद्ध दुर्गुण. ते ओळखून अक्षरशः सत्व चेपण्याचे काम इंग्रजांनी चालवले होते. तो ‘लिविलिवीत काळोख’ भारतवर्षावर व्यापून होता, ‘मी कोण?’ या प्रश्नात देशाचा नागरिक स्वाभिमान, अभिमान विसरत चालला होता, अशातच घनगर्द अरण्याच्या गर्भातून या टिळक केसरीने गर्जना केली आणि इंग्रज पाजत असलेल्या बाळगुटीची झिंग उडून, वर भग्न झालेल्या कणांना ‘कोऽहं : मी कोण’ याची कोडी उलगडत गेली असे बापट या कवितेतून मांडतात. कवितेतील ही दोनच कडवी इथे दिली आहेत, परंतु, या कवितेतून एक प्रतीत होते की थकलेल्या-हरलेल्या-शिणलेल्या भारतीयांना पाहून डबडबले भारतमातेचे डोळे लोकमान्यांनी त्यांच्या राजकारणातील आगमनाने पुसले आणि तिला उद्याच्या सूर्याचे आश्वासन दिले.


लोकमान्य खरे कर्मयोगी-तपस्वी. आगरकर-टिळक मतभेद वाचताना कायम वाटते, त्या दोन्ही वाटा वेगळ्या असल्या तरी शेवटी त्या त्याच उद्याच्या सूर्याकडे घेऊन जाणार्‍या होत्या. आयुष्यात समोर एक ‘मिशन’ असावे लागते आणि ते गाठण्यासाठी आत्मसाधनेतून एक मार्ग स्फुरावा लागतो, तो या दोघांना वेगवेगळा गवसला. यातले सौंदर्य कुठे असेल तर मला वाटते की, दोघांनीही स्वतःच्या विचारांत जराही तडजोड केली नाही. (ती केली असती तर ते एकसंधत्व देशहिताचं होतं, परंतु) आपल्या मार्गावरील निष्ठा अशा खंबीर निर्णयांतून प्रगट होतात. कवी बा. भ. बोरकर त्यांच्या ‘प्राक्तनाचा प्रवक्ता’ या कवितेतून लिहितात-



अगा कर्मयोगेश्वरा! मोक्षदृष्ट्या! अगा निर्भया! जन्ममृत्युंजया
भयातून काढून राष्ट्राप्रती या जयारूढ आत्मस्थ केले तया!
तुला गुह्य सांगून गीताभवानी गमे त्वच्चरित्रात आली गुणा
जिथे ठेविला हस्त वा पाद तू गा तिथे दीपिका, स्वस्तिकांच्या खुणा! 


लोकमान्यांची निर्भय वृत्ती त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वातून सतत झळाळताना दिसते. टोकाचा विचार केला तर माणसाला भय कशाचे वाटते? अर्थातच मृत्यूचे! परंतु, लोकमान्यांचे चरित्र वाचले आणि समजून घेतले तर या मृत्यूवरच त्यांनी विजय मिळवला आहे, याची प्रचीती येऊ शकेल. ‘मी टरफले उचलणार नाही..’ पासून या निर्भयपणाचा प्रवास सुरू होऊन, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’, ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’, ‘देशाचे दुर्दैव’ असे म्हणत त्यांच्या शरीर रूपातून नसण्यापर्यंत तो अविरत सुरू राहतो. नंतरच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या!’ असे आवाहन साहित्य संमेलनातून साहित्यिकांना केले, परंतु त्याआधी कितीतरी वर्षं एका अक्षर योद्ध्याने त्याच्या लेखणीलाच तलवार केले, ते होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!


ज्या देशात लोकमान्यांसारख्या नेत्याला सहा वर्षं तुरुंगवास होतो, तेव्हा तो देश त्याक्षणी साठ वर्षं मागे फेकला जातो. सावरकरांच्या बाबतीतही तेच म्हणावेसे वाटते. अशा काळातही सकारात्मक राहणे ही या मंडळींची साधना. ‘माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हालपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे : असाही परमेश्वराचा संकेत असेल’ असे म्हणून १९०८ साली लोकमान्यांनी त्या लोखंडी गजांनी आच्छादलेल्या काळकोठडीत (नव्हे नव्हे प्रकाश खोलीत) प्रवेश केला. ‘मोकळा जाऊ नेदी एक क्षण’ हे समर्थांचे वचन ही पर्वताएवढी मंडळी खरोखर प्रत्यक्ष आपल्या कृतीतून प्रत्ययास आणतात याचे नेहमी मला आश्चर्य वाटत आले आहे. आपली पगडी बाजूला ठेवून, लेखन चौरंग जवळ ओढून, शाईत टाक बुडवून मशालीच्या प्रकाशात ‘गीतारहस्य’ लिहिणारे लोकमान्य मला डोळे बंद केल्यानंतर त्या अंधारात दिसू शकतात. मुळात भारतीयांची आणि हिंदूंची पंचाईत काय? तर आपला धर्मग्रंथ नेमका आपल्या नेहमीच्या बोलीभाषेत नसून तो संस्कृतमध्ये आहे. संस्कृत ही देवा-ब्राह्मणांची भाषा; त्यामुळे बहुतांश जनांकडून ती तशी दुर्लक्षितच राहिली. बरं ही धर्मगीता बालपणापासून मारून मुटकून कुणी आपल्याला शिकवली का? शाळेत तिचे शिक्षण दिले गेले का? तर नाही! आपण सहिष्णू आहोत म्हणून सगळे चालून गेले आणि आजपर्यंत देवाच्या कृपेवर सारे व्यवस्थित सुरू आहे (असे निदान आपल्याला वाटते). परंतु, ही गीता, त्या गीतेतील भाषा एक रहस्य आहे, जे आपल्याला बहुदा कळले असावे असे उमजून लोकमान्यांनी या मंडालेच्या तुरुंगात ‘गीतारहस्य’ या अभूतपूर्व ग्रंथाला जन्म दिला. बोरकर म्हणतात, “जणू या गीतेनेच लोकमान्यांच्या कानात तिचे स्वतःचे रहस्य उलगडून सांगितले आणि त्यांच्यामार्फत या रहस्याला कागदावर शब्दरूप लाभले.” कवी केशवसुतांनी लोकमान्यांवर ‘कर्मवीर’ नामक कविता रचली. त्यात या गीतारहस्यावर चरण आहे, त्यात ते म्हणतात-



हा ग्रंथ मराठी भाषा । निःसंशय भूषविणार ।
हा ग्रंथ कर्मवीराचा । स्वाभिमान वाढविणार ।
हा ग्रंथ विसाव्या शतकी । नवदासबोध बनणार ।
गीता जरी एकच बोले
कृष्णाचे सारे चेले
विविध हे फुलांचे झेले
काढून समाजा देती ते परिस्थिती नमविती ।



लोकमान्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य’ ग्रंथ विसाव्या शतकात ‘नवदासबोध’ बनेल, असे भाकीत या कवितेतून कवी केशवसुत करतात, जे अतिशय समर्पक आहे. समर्थांनी जगाला दिलेला ‘दासबोध’ हा स्वतःच्या आयुष्यातील अनुभावांतून, आत्मप्रेरणेतून निर्माण झाला. कवी केशवसुत याच कवितेत म्हणतात की-



हा ग्रंथ कर्मवीराचा
अनुभव हा आयुष्याचा
हा हिरा लाख मोलाचा



खरोखर हा लाखमोलाचा ग्रंथरूपी हिरा आहे. ‘कोहिनूर’ पळवून नेला म्हणून आज तो भारतात नाही आणि ‘गीतारहस्य’ नामक हिरा दुर्दैवाने विस्मरणात गेला म्हणून भारतीयांत नाही. ‘कोहिनूर’ परत आणणे आता अशक्यप्राय आहे, ‘गीतारहस्य’ नामक हिरा, हा ‘नवदासबोध’ गवसावा, असे वाटत असेल तर इथल्या नागरिकांनी फक्त या ग्रंथाचे पान उलटून ते वाचायचे कष्ट घ्यावयाचा इथे अवकाश आहे.


‘राजकारणातून समाजसुधारणा’ हे लोकमान्यांचे ध्येय होते. टिळक पुरोगामी की सनातनी, असा वाद अजूनही लोक घालत बसतात. दोन्ही टोकाच्या भूमिका घ्यायच्या, त्यांच्यामधले स्थानक असते याची अशांना कल्पनाच नसते किंवा असते परंतु ते जाणूनबुजून वाद उकरतात. या सज्जनांना आपल्या झोळ्या भरायच्या असतात, त्यातील काहींना आयुष्याची संध्याकाळ व्यग्र ठेवायची असते. महापुरुषांचा आपल्याकडे ३६० अंशांनी अभ्यास होत नाही, हे आपल्या इतिहासाचं दुर्दैवं. देशोन्नतीच्या विचारात व्यग्र टिळकांना ‘वेदोक्त-पुराणोक्त’ प्रकरणात असेच गोवण्यात आले. जाती-जातींमध्ये पडत चालालेली फुट जेव्हा धर्मापर्यंत पोहोचली, तेव्हा हा हिंद-केसरी पुन्हा एकदा गर्जला आणि गणेशोत्सव-शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरी करून पुढे नव्या एकोप्याची नांदी त्याठिकाणी झाली. हे लोकमान्यांचे पाऊल सर्वव्यापी, सर्वसमावेशक होते तरी त्यांना ‘तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी’ म्हणून काहींनी डिवचले. परंतु, टिळकांच्या मनात ‘आपण भारत मातेचे पुत्र आहोत’ ही धारणा अढळ होती. ‘ब्राह्मणाने शस्त्र हाती धरू नये, त्याने विद्यादान करावे’ अशा सनातनी वृत्तीचे टिळक असते, तर ‘रॅण्ड अजून जीवंत कसा?’ असा सवाल चापेकर बंधूंच्या हृदयात गोळीसारखा शिरलाच नसता. या प्रश्नातून पुढे जे घडले तो इतिहास आहे.



वज्र विजेचे वृक्षावर झेलून घेणार्‍या
सह्याद्रीच्या उंच काड्याने दिधली छाती
आणि घडवले पोलादाने मनगट त्याचे
अन्यायाच्या विटा विटा उस्कटण्यासाठी
या मातीवर उभा राहता वज्रपुरुष तो
अंधाराच्या साम्राज्याची पिचली छाती
आवाहन करण्यास उचलता हात तयाने
दलित तृणांतून उठली वर खड्.गाची पाती



‘वज्रपुरुष’ या कवितेमधल्या कवी मंगेश पाडगावकरांच्या या ओळी. लोकमान्य धार्मिक होते, सनातनी नव्हते. त्यांना हिंदू धर्म प्राणप्रिय होता; तो जणू त्यांचा श्वास होता. त्यांचा निर्धार पोलादी होता, त्यांचे विचार वज्राहून कमी धारधार नव्हते आणि संकटांना थोपवून धरण्यासाठी त्यांना साक्षात सह्याद्रीने छाती बहाल केली होती. परंतु, जिथे अन्याय आहे, दुःख आहे, स्वाभिमानाची चिरडणं आहे आणि जिथे भारतमातेच्या अस्तित्वाला धोका आहे, तिथे तिथे टिळक या कवितेतील शब्दांप्रमाणे ‘वज्रपुरुष’ झालेले आपल्या अनुभवास येतात. टिळकांनी आवाहन करताच माणूस असलेला कुणीही भारतीय पेटून एका छताखाली लढण्यासाठी जमायचा याची त्या आयुष्याची संध्याकाळ झालेल्या, फक्त वायातील आकड्यांनीच बुजुर्ग झालेल्या सज्जनांनी नोंद घेतली पाहिजे.
आज भारताचा इतिहास भयभीत झाला आहे. स्वतःची तीळमात्र योग्यता नसताना देशासाठी जगलेल्या योद्ध्यांवर बोट उगारण्याचं धैर्य आज भारतात केलं जातं, जे अतिशय दुःखदायक आहे. यातूनच इतिहासाची नाळ तुटत वर्तमान आणि क्रमाने भविष्य अनाथ होण्याची पाळी आज भारतावर येऊन ठेपली आहे. ती वस्तुस्थिती वर्णन करताना कवी अशोक नायगावकर ‘टिळक’ कवितेतून म्हणतात-



तुम्ही कोण होता टिळक?
खरंच आम्हाला माहीत नाही...
टिळक तुम्ही रत्नागिरीला परत जा
तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल दिल्लीत
तर आम्ही ते पाठवून देऊ पुढच्या पिढ्यांना...



ही संपूर्ण कविताच टिळक आणि त्यांच्या वाटेने इतिहास कसा इतिहासच जमा होतोय, याचं विचारक दर्शन घडवते. खरंच स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य फक्त वर्षातून येणारे दोन दिवस साजरे करण्यापुरते आणि पेन्शनपुरते उरलेत का, असा प्रश्न मनाला भेडसावतो. संदीप खरे त्यांच्या कवितेतून व्यक्त होतात की,



तुमच्या असंतोषाची आता गरज नाही टिळक
इथे सार्‍यांचेच हक्क आता जन्मसिद्ध झालेत..



खरोखर, इथे सगळ्यांचेच हक्क आता जन्मसिद्ध झाले आहेत. कवीने कवितेत उपरोधाने म्हटले आहे ‘तुमच्या असंतोषाची गरज नाही.’ परंतु, नेमकी आजच पुन्हा ‘टिळकां’च्या त्या असंतोषाची तीव्रतेने गरज आहे, असे दिसून येईल. व्हॅलेटांईन चिरोल भारताची पाहणी करण्यासाठी आले असता, त्यांनी टिळकांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे संबोधून अपमानकारक उद्गार काढले होते. परंतु, नंतरच्या काळात हेच अपमानाचे बोल कौतुकाचे वाटू लागले आणि आता तर ते महतीचे वाटतात. भारतीयांना अन्यायाची जाणीव करून देणारा भारतील पहिला राजकारणी नेता म्हणजे लोकमान्य टिळक. आज टिळक नाहीत, परंतु देशात कसलासा असंतोष आहे, जो चिंताजनक आहे. स्वातंत्र्य नसताना असंतोष निर्माण होतो, तेव्हा स्वातंत्र्य मिळू शकते. परंतु, स्वराज्यात जेव्हा असंतोष निर्माण होतो, तेव्हा स्वराज्य जाऊन पुन्हा पारतंत्र्य येऊ शकते, हे समजणारे मेंदू आपल्याकडे असतील अशी आशा मनात बाळगायला काही हरकत नाही. आजच्या असंतोषाची दिशा बदलणारा ‘युगपुरुष’ जन्माला यायची वाट बघण्यात काही अर्थ नाही, तो तुम्ही असू शकता तो मी असू शकतो, ज्याने त्याने आपापले खिसे तपासायची आज वेळ येऊन ठेपली आहे.


त्या घनगर्द अरण्यातून निघालेल्या केसरीच्या गर्जनेने कोल्ह्या-कुत्र्यांच्या साम्राज्याला धक्का पोहोचवला, ‘इथे पाय रुतवून उभा असलेला या भूमीचा राजा मी आहे’, असे कणखरपणे ठणकावले. पारतंत्र्यात गेलेल्या भारतमातेच्या विचारात गुंग असताना राजकारणाची समीकरणे मनात अहोरात्र सुरू असल्यामुळे टिळकांचे प्रकृतीकडे जरा दुर्लक्षच होत होते. अशातच काळाने एके दिवशी लोकमान्यत्व पेरलेले ते शरीर कायमचे अविचल केले. या लाडक्या पुत्राच्या निधनाने संपूर्ण देश शोकाकुल झाला. सत्वकेसरी भारतमातेच्या भूमीवर उंच वाढलेल्या आदिम वृक्षाखाली शांत झाला. परंतु, जाताना अरण्यातील पानापानात-कणाकणात स्वातंत्र्याचा हुंकार ठेऊन गेला. म्हणून मग सुधीर मोघे यांनी आपल्या लेखणीतील शाईला वाट करून दिली-



जगावेगळा होता तरी हा जनतेचा नेता
लोकमान्य ह्या शब्दालाही तो भूषण होता
विराट देशही होय पोरका तो गेला तेव्हा
आभाळाला फुटला पाझर तो गेला तेव्हा
सहस्त्र नयनी जणू नियंता शोकाकुल होता
नर रूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता
नर रूपे अवतरलेला तो पुरुष सिंह होता!



- आदित्य दवणे
Powered By Sangraha 9.0