लोकमान्य टिळक आणि कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव

    दिनांक  31-Jul-2020 22:19:57
|


Lokmanya Tilak_1 &nbलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या देहावसानाला आज, दि. १ ऑगस्ट, २०२० रोजी १०० वर्षे होत आहेत. लोकमान्यांच्या पुण्यस्मृतीच्या शताब्दीच्या निमित्ताने कल्याणच्या सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्यावतीने त्यांना अभिवादन करणे हा या लेखाचा हेतू.
 

कल्याण हे एक ऐतिहासिक शहर. शहराला शिवकालीन, तसेच पेशवेकालीन इतिहासाचा वारसा लाभला आहे. कल्याणमधील जुनी देवस्थाने, विविध तलाव, जुने वाडे, हवेल्या इत्यादींच्याद्वारे समृद्ध इतिहासाचे दर्शन होते. कल्याणमधील सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थानांची देखील फार मोठी परंपरा आहे. सर्वच माध्यमांमधल्या विविध संस्था शहरातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची वाटचाल यशस्वीरित्या करतात.


कल्याण शहराला जी सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्थात्मक परंपरा लाभलेली आहे, त्या परंपरेचाच एक भाग म्हणजे कल्याणमध्ये साजरे होणारे सार्वजनिक गणेशोत्सव. लोकमान्यांनी पुण्यात १८९३ या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रथम सुरुवात केली. जाती-जातींमध्ये विखुरला गेलेला हिंदू समाज एकत्र यावा, गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजप्रबोधन व्हावे, त्याकाळी देश पारतंत्र्यात असल्याने नागरिकांच्या मनात देश, धर्म, स्वातंत्र्य याबद्दल अभिमान व प्रेम निर्माण व्हावे, गणेशोत्सवाच्या निमित्याने समाजाने एकत्र येऊन स्वराज्याच्या लढ्यासाठी त्याचा प्रभावी शस्त्र म्हणून वापर करता यावा, या उदात्त हेतूंनी लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर लगेचच पुढील दोन वर्षांनी म्हणजे १८९५ या वर्षी लोकमान्यांच्याच प्रेरणेने कल्याणमधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९५ या वर्षी सुभेदार वाडा या ऐतिहासिक वास्तूत झाली. गेल्याच वर्षी या गणेशोत्सवाने शतकोत्तर रौप्य महोत्सव दिमाखदाररित्या साजरा केला. या गणेशोत्सवास १८९५ या वर्षी प्रारंभ झाल्यापासून उत्सवाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी कल्याणात येऊन उत्सव पाहून त्यांस आशीर्वाद द्यावा, अशी सर्वांची फार इच्छा होती. हा योग १९०६ या वर्षी जुळून आला. त्या वर्षी मात्र लोकमान्यांनी कल्याणकरांचे आमंत्रण स्वीकारून व उत्सवप्रसंगी हजर राहून कल्याणकरांना धन्य केले.


गणेशोत्सवाकरिता लोकमान्य कल्याण येथे आले तेव्हा त्यांचे उचित असे स्वागत कल्याणकरांनी केले. राजेरजवाड्यांच्या मिरवणुकीचे वर्णन आपण वाचतो, पण या मिरवणुकींचे वर्णन फिक्के पडेल असा अपूर्व थाट लोकमान्यांच्या आगमन मिरवणुकीचा होता. दिवाळीतदेखील होणार नाही, असा दीपोत्सव कल्याणकरांनी लोकमान्यांच्या सन्मानार्थ मोठ्या आनंदाने केला. या प्रसंगाचे वर्णन ‘अरुणोदय परशुराम’च्या २६ ऑगस्ट, १९०६च्या अंकात नमूद केलेले आहे. लोकमान्यांचे कल्याणच्या रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यासाठी सुमारे दीड हजारांनी जनसमुदाय जमला होता. ठाणे जिल्ह्यातल्या विविध गावांमधून नागरिक आणि वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आले होते. रेल्वे गाडी स्थानकात येताच, शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांच्या नावांचा जयजयकार झाला. लोकमान्यांच्या मिरवणुकीला स्थानकावरून प्रारंभ झाला. मिरवणुकीत प्रचंड जनसमुदाय सामील झाला. काही अंतर गेल्यावर काही जणांनी मिरवणुकीच्या गाडीचा घोडा सोडून गाडी भारताचार्य चिंतामण राव वैद्य यांच्या घरापर्यंत स्वतः ओढून नेली. 
 
सुभेदार वाड्यात लोकमान्यांचे आगमन होताना नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारल्या होत्या. रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच दीपोत्सव केला होता. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, समर्थ रामदास स्वामी, वंदे मातरम्, स्वातंत्र्यदेवी यांच्या नावांचा जयघोष चालला होता. लोकमान्यांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. गणेशोत्सवातील लोकमान्यांच्या सभेचे अध्यक्षस्थान भारताचार्य चिंतामण राव वैद्य यांनी स्वीकारले होते. भारताचार्य वैद्य यांनी प्रास्ताविक भाषण करून लोकमान्यांना भाषण करण्याची विनंती केली. टाळ्यांच्या कडकडाटात लोकमान्यांनी आपल्या भाषणास प्रारंभ केला. लोकमान्य म्हणाले, “राष्ट्र कितीही गरीब असो, कितीही दरिद्री असो, कितीही परतंत्र असो, पण त्याला उत्सव माहिती नसेल तर ते राष्ट्र पशूच होय. वर्षातून एक दिवस तरी असा पाहिजे की त्या दिवशी संसाराची दगदग बाजूला ठेऊन माणसाने आपली सर्व तर्‍हेने स्थिती कशी आहे याचा विचार करावा. राष्ट्रात जागृती होणे फार महत्त्वाचे आहे. आपणामध्ये एकराष्ट्रीयतवाची कल्पना नव्हती, त्यामुळे आमची अशी दशा झाली आहे, मनुष्य नराचा नारायण होईल हे तत्त्व आमच्या धर्माइतके स्पष्ट कोणत्याच धर्मात सांगितले नाही. इतके सामर्थ्यवान आपण असताना हे सामर्थ्य आपणांस समजत नाही, हा आपला दोष आहे. काळ हा व्यापक आहे. त्याचा फायदा घेऊन आपण पुढे जाऊ लागलो, तर पाऊल लवकरच पुढे पडेल. शरीराप्रमाणे आपली मनेही स्वदेशी झाली पाहिजेत. आपण स्वदेशीच आहोत. त्यामुळे स्वदेशी विचारांची दृष्टी सदैव आपल्या अंतःकरणात झाली पाहिजे. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेल्या लोकमान्यांच्या या भाषणाने उपस्थित जनसमुदाय कृतकृत्य झाला. सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या १९९४ साली झालेल्या शतक महोत्सवी वर्षाच्या, तसेच २०१९ साली झालेल्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या आगमन मिरवणुकीत लोकमान्यांचा देखावा आयोजित करण्यात आला होता. लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करीत असतानाच कोरोनामुळे उद्भवलेले संकट लक्षात घेऊन या वर्षीचा गणेशोत्सव सर्व नियमांचे पालन करून अतिशय साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
 

- अ‍ॅड. सुरेश पटवर्धन

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.